ऊठ अर्जुना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 05:18 AM2020-01-02T05:18:17+5:302020-01-02T05:18:28+5:30

रणांगणावर दु:खाने उद्विग्न मन झालेला अर्जुन धनुष्यबाण टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. त्याचे मन करुणेने व्याप्त झाले होते. डोळे आसवांनी भरले होते. तो व्याकूळ दिसत होता.

message given to arjun by lord krishna | ऊठ अर्जुना

ऊठ अर्जुना

Next

- शैलजा शेवडे

रणांगणावर दु:खाने उद्विग्न मन झालेला अर्जुन धनुष्यबाण टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. त्याचे मन करुणेने व्याप्त झाले होते. डोळे आसवांनी भरले होते. तो व्याकूळ दिसत होता. तेव्हा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन म्हणाले,
ऊठ अर्जुना, उचल शस्त्र अन् तयार हो लढण्या,
टाकून देऊन षंढपणा, चल शत्रूस रे भिडण्या ।
परंतपा तुज शोभत नाही, रणांगणी हे होणे विव्हल,
कोठून आले मनात तुझिया, दुष्कीर्तीकर दुबळे कश्मल ।
खेद करसी अनुचिताचा, आव आणसी पांडित्याचा,
प्राण कुणाचे जावो राहो, विवेकी शोक न करती त्याचा ।
बाल्य, यौवन जरा अवस्था, जीवात्म्याला या देही,
तसाच पुढती देह दुसरा, जाणत्यास भ्रांती नाही ।
जुनाट वस्त्रे टाकून देऊन, मनुष्य घाली नवीन वसने,
जीर्ण शरीरा तसेच त्यागून, आत्मा घेतो नवीन शरीरे
जन्मरहित हा नित्य असे, क्षयरहित अविनाशी असे,
जाणतो जो पुरुष असे, कोण मारील कोणास कसे?
तुटतो ना शस्त्राने आत्मा, जळतो ना अग्नीने आत्मा,
भिजतो ना पाण्याने आत्मा, सुकतो ना वायूने आत्मा ।
अव्यक्त, अचिंत्य, अविकारी आत्मा, अनादी शाश्वत शुद्ध असे, जाणून घेऊन असे अर्जुना, शोक करणे योग्य नसे ।
जन्म ज्यास मृत्यू त्याला, मृतास निश्चित जन्म असे,
अटळ या गोष्टीकरिता, शोक करणे योग्य नसे ।
देहामध्ये जो जीवात्मा, तो सर्वदा अवध्य असे,
कुणा प्राण्यास्तव उगाच हा मग, शोक करणे योग्य नसे ।
आज इथे या रणभूमीवर, शोक निरर्थक मृत्यूचा,
क्षात्रधर्म हा तुझा सांगतो, मार्ग हितकर लढण्याचा ।
समजतील भित्रा, पळपुटा, करशील ना तू युद्ध हे जर,
दुष्कीर्ती मग तुझी निरंतर, मरणाहून जी अति भयंकर ।
जिंकलेस जर, पृथ्वी भोगशील, मृत्यू पावला,
स्वर्ग पावशील, म्हणून अर्जुना, युद्धाचा रे निश्चय करूनी, उठ तू चल ।' म्हणूनच भगवद्गीता मंत्ररूप आहे.

Web Title: message given to arjun by lord krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.