मनुष्याला योग्य मार्गाने नेणारे मन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 09:38 AM2019-08-06T09:38:05+5:302019-08-06T09:39:13+5:30
उत्तम सारथी ज्याप्रमाणे घोड्यांना हाकतो व लगामाच्या योगाने त्यांना योग्य मार्गाने नेतो, त्याप्रमाणे हृदयामध्ये राहणारे, कधीही वृद्ध न होणारे, अत्यंत शीघ्रगामी ‘मन’ संकल्प करीत असते.
उत्तम सारथी ज्याप्रमाणे घोड्यांना हाकतो व लगामाच्या योगाने त्यांना योग्य मार्गाने नेतो, त्याप्रमाणे हृदयामध्ये राहणारे, कधीही वृद्ध न होणारे, अत्यंत शीघ्रगामी ‘मन’ संकल्प करीत असते. मनाच्या जोरावर, भावनेच्या बळावर माणूस बऱ्या-वाईट गोष्टी करीत असतो. योग्य-अयोग्य मार्गाने कार्य होणे हे सर्वस्वी मनाच्या चांगले-वाईटपणावर अवलंबून आहे. घोड्याच्या लगामाप्रमाणे हे मन मनुष्याला योग्य मार्गाने नेते. मनाचा कारभार लक्षात येत नाही. कारण मनात केव्हा काय संकल्प येतील ते त्या मनालाच माहिती. मनाची स्थिती चंचल असली की शांती नाही. ज्याचे मन ताब्यात आहे त्यालाच इहपरलोक प्राप्त होतो.
मनाशिवाय कोणतेच कर्म करता येत नाही. भावना हा मनाचा अधिकार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासाला कारणीभूत मनच असते. म्हणून मनाला उत्तम संगती, योग्य आहार, विहार इतर गोष्टींमध्ये रममाण करावे. अध्यात्म विद्येशी त्याची संगती घडवावी म्हणजे राष्ट्रहित व समाजहित पदरात पडेल. व्यक्ती व्यक्ती मिळून समाज बनतो. म्हणून माणसांच्या अनुकरणाने समाजाचे मन सुधारते किंवा बिघडते. तात्पर्य कोणतेही साध्य साधायचे असेल तर मन सुदृढ केले पाहिजे. हल्ली आपल्या समाजाकडे पाहिले तर तरुण पिढी दिवसेंदिवस अत्यंत अशक्त व अल्पायुषी होत आहे. आपल्याला निसर्गाने दिलेल्या आयुष्याच्या आतच आपण संपतो आहे. सर्व समाज अल्पायुषी व रोगी झाला तर उद्धार कोण करणार?
समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
धन्य धन्य हा नरदेहो ।
येथील अपूर्वता पहाहो।।
नरदेह महत्त्वाचा आहे. आहार, निद्रा, भय, मैथून यापलीकडे काहीतरी वेगळे जग आहे. त्यासाठी मनाची क्रिया फार महत्त्वाची आहे. कार्यक्षम करणारी पिढी निर्माण व्हावी, असे वाटत असेल तर त्यांच्या मनाला शुद्ध बनवले पाहिजे. समाजाची हानी होऊ नये असे वाटत असेल तर मनाला शुद्धतेकडे वळवा. राष्ट्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. मनात देशभक्ती निर्माण करा. सामर्थ्यवान मनाला सन्मार्गाकडे लावा. मन सन्मार्गाकडे वळल्यास ‘आत्मवत्सर्वभूतानि य: पश्यति स पश्यति’ या न्यायाने सर्व समाजाची सर्वांगीण ऐहिक, पारमार्थिक उत्क्रांती होते. एवढेच नव्हे तर मनाची स्थिती मजबूत झाली की सुदृढ सुविचारी व कार्यकर्ती पिढी निर्माण होते त्यामुळे राष्ट्राचे हित जोपासता येते. लोककल्याणासाठी मार्ग अवलंबता येतात. त्या योगाने सुप्रजा निर्माण होते. म्हणून तुकोबारायांच्या शब्द आठवतात, ‘शुद्धबीजापोटी फळे रसाळ गोमटी’ शुद्ध बीज असेल आणि ते भुसभुसीत जमिनीत पेरले तर धाण चांगले येते. तसे मन शुद्ध केले की समाज चांगला निर्माण होतो. समाज चांगला झाला की राष्ट्र कल्याण होते.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)