सृष्टीचे मन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 07:52 AM2018-11-05T07:52:50+5:302018-11-05T07:53:04+5:30

संपूर्ण सृष्टीचा विचार केला तर तो मनावरच आहे. कारण विचार मनच करते. ओमकाराच्या बीजतत्त्वाने बनलेल्या पृथ्वीलाही एक मन असते. ...

The mind of nature | सृष्टीचे मन

सृष्टीचे मन

Next

संपूर्ण सृष्टीचा विचार केला तर तो मनावरच आहे. कारण विचार मनच करते. ओमकाराच्या बीजतत्त्वाने बनलेल्या पृथ्वीलाही एक मन असते. कारण समुद्राचे मन, पृथ्वीचे मन, आकाशाचे मन, चंद्र-सूर्याचे मन यावरच सृष्टीचे मन अवलंबून असते. या सृष्टीचे मन बिघडले की भूकंप येतो. पृथ्वी खवळली की जमिनीला भेगा पडतात. समुद्राचे मन आनंदी झाले की ते मोठमोठ्या लाटांच्या रूपाने उसळ्या घेते. सूर्याचे मन आनंदी झाले की तो शीघ्र गतीने न चालता मध्यम स्वरूपात चालतो. मग तोच सूर्य जर कोपला तर अनेक जीव गुदमरून जातात. चंद्राचे मन आनंदी झाल्यावर आपल्याला शरद पौर्णिमेचा आनंद बघावयास मिळतो. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, तापी या नद्या कोपल्या की सीमोल्लंघन करतात. आनंदरूपी मन, दु:खरूपी मन या सृष्टीलाही असतेच ना!


खरोखर या मनाचा विचार केला तर याला रंग नाही, रूप नाही. ते खात-पीत नाही. त्याला जात नाही, धर्म नाही. ते अल्पही नाही. या मनाचा ठावठिकाणाच लागत नाही. सर्व सृष्टीचा खेळही मनावरच अवलंबून आहे.


मन सगुण-निर्गुण अवस्थेत असते. मनाचे भाव, स्पंदने, ऊर्जा ही कल्पनातीत आहे. कितीतरी युगापासून या मनाचा शोध सुरू आहे. मनानेच प्रभूचे मीलन होते. तसेच मनानेच आपण प्रभूपासून लांब जातो. मनासोबत कधी शरीर जाते तर कधी जात नाही. कारण मन अर्ध्या क्षणात सर्व सृष्टी फिरून येईल; पण शरीर जाऊ शकत नाही. शरीरामध्ये असणाऱ्या तत्त्वांचा मनाशी परिपक्व संबंध आहे. तसेच मनाचा समतोलपणा शरीरावर अवलंबून आहे, असे म्हणणे कितपत योग्य ठरेल?


संत कबीर म्हणतात, ‘मन गया तो जाने दो, मत जाने दो शरीर
ना खींचे कमान तो कहा लगेगा तीर’
कधी मन जाईलही पण आपल्या ताब्यात आल्यास ते गेलेले मनही परत येते. मनाचा मेळ मनच जाणे. भल्या भल्यांना उजळवणारे व फसवणारेही मनच आहे. सृष्टीच्या मनाचा विचारच मानवी मनाचा विचार आहे.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

Web Title: The mind of nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.