चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 06:46 PM2018-11-23T18:46:48+5:302018-11-23T18:46:56+5:30
मानवी स्वभावाचे अनेक पैलू आहेत. त्या त्या स्वभावानुसार आनंद, दु:ख वाट्याला येत असते.
- धर्मराज हल्लाळे
मानवी स्वभावाचे अनेक पैलू आहेत. त्या त्या स्वभावानुसार आनंद, दु:ख वाट्याला येत असते. संतांनी कर्मसिद्धांताला मोठे महत्त्व दिले आहे. आपण जसे वागू तशीच प्रतिक्रिया समोरून येते. अर्थात आपले चित्त, हेतू शुद्ध असेल तर शत्रूसुद्धा मित्र होऊ शकतो. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून कृतीला हेतूची जोड दिली आहे. आपण जे वागतो वा बोलतो त्या पाठीमागे कोणता हेतू आहे, यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. एखादे काम करीत असताना चूक झाली अथवा ते काम योग्यरीतीने पार पडले नाही तर त्याचा अर्थ सर्व चुकले असे होत नाही. कृतीच्या मागील भावना मोलाची असते. आई-वडील आपल्या मुलाला कठोर शब्दात समज देतात, याचा अर्थ त्यांच्या हृदयात कायम क्रोध असतो असे नाही. त्या कठोर शब्दांमागेही आपल्या अपत्याचे हित दडलेले असते.
स्पष्टपणे बोलणे हा गुण असला तरी अनेकदा स्पष्ट बोलणारे जवळच्यांना मुकतात. तात्कालिक कठोरतेमुळे दुखावलेली माणसे दुरावतात. खरे तर त्या शब्दप्रहाराने न दुखावता त्या मागच्या हेतूकडे लक्ष वेधले पाहिजे. मी चुकलो होतो, माझ्यात सुधारणा व्हावी म्हणून मला हे ऐकावे लागले, असे समजून घेणारा हेतूकडे लक्ष देत असतो.
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती... हे कसे घडते? चांगला विचार मनात ठेवून आपण शत्रूबरोबरही तितक्याच प्रामाणिकपणे जेव्हा वागतो तेव्हा तो शत्रूही नकळत आपला मित्र बनतो. द्वेष भावनेतून आनंद निर्माण होत नाही. ज्याच्याशी पटत नाही त्याच्याशी वाईट वागत राहिलो, त्याच्या उणिवा सांगत राहिलो तर अंतर वाढतच जाते. मात्र आपण जेव्हा सद्हेतूने सद्वर्तनाच्या मार्गावर चालत राहतो तेव्हा शत्रुत्वाचा थांबा मागे पडतो. निर्मळ मनाचा माणूस प्रत्येकात दडला आहे. त्यावर अनेक रूपांची छाया पडते. ती कशी दूर करतो आणि आपल्या निर्मळ विचारांना कसे पेरतो, यावर नात्याची वीण घट्ट होत जाते.