आधुनिक जग आणि अध्यात्म
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 10:39 AM2018-10-07T10:39:13+5:302018-10-07T10:39:25+5:30
सद्यस्थितीत आयुष्य फारच गतीमान झाले आहे. प्रत्येकजण काहीना काही मिळविण्यासाठी धाव-धावतोय. कोणी, नोकरी, करिअर, कुटुंब, स्वप्न, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहे.
- सचिन व्ही. काळे
सद्यस्थितीत आयुष्य फारच गतीमान झाले आहे. प्रत्येकजण काहीना काही मिळविण्यासाठी धाव-धावतोय. कोणी, नोकरी, करिअर, कुटुंब, स्वप्न, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहे. हे सर्व करत असताना मानव मनशांती हरवत चालला आहे. इच्छा हे प्रत्येक दु:खाचे कारण असते. थोर तत्वज्ञ भगवान गौतम बुद्धांनी हजारो वर्षापूर्वी सांगितले आहे. मानवी मेंदूत सतत कुठले ना कुठले विचार सुरू असतात. त्यामुळे या विचारांना विचारचक्र म्हटले आहे. हिंदू संस्कृतीत ग्रंथांमधून सांगितल्यानुसार, मानवी जीवन हे ८४ लक्ष योनीनंतर प्राप्त होते. त्यामुळे ते अत्यंत दुर्मिळ समजले जाते. मिळालेल्या जीवनाचे सार्थक कसे करावे या विचारात प्रत्येकजण असतो. काहींना संपत्ती, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी हवी असते. हे सर्व मिळविण्यासाठी तो कुठल्याही थराला जाण्याची तयारी ठेवतो. परंतु या आभासी वस्तूंपासून मानवाला दूर ठेवण्यासाठी जो विचार त्याने करायला हवा तो त्याला अध्यात्मातूनच मिळू शकतो. परंतु अध्यात्म ही अशी बाब आहे, जी सहजासहजी प्राप्त होत नाही. अध्यात्म म्हणजे स्वत:च्या दु:खाचे अध्ययन करून दु:खाचे कारण शोधणे व आत्म्याचा शोध घेणे. भारतीयांना अध्यात्माची प्रचिती ही हजारो वर्षापूर्वीची आहे. ऋषी-मुनींनी याचा पाया घालून ठेवला आहे. नंतर हेच अध्यात्म त्या त्या काळातील संतांनी सर्वसामान्यांना कळेल अशा सोप्या भाषेत सांगितले आहे.
याचे उदाहरणच द्यायचे म्हटल्यास संत कबीर, शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांनी दोहे तसेच भारूडातून अध्यात्मावर प्रकाश टाकला आहे. लौकीक आणि अलौकीक असे दोन भाग अध्यात्मात असतात. अध्यात्माकडे जाण्यासाठी तुम्हाला भक्तीमार्ग ही देखील एक महत्वाची पायरी ठरू शकते. अध्यात्मात आनंद आणि समाधानाला मोठे महत्व आहे. आनंद हा कुठे विकत मिळत नाही. तो प्रत्येकाच्या मानण्यावर असतो. अध्यात्म म्हणजे ज्याने तुमचे मन थकत नाही, ज्याच्या नुसत्या कल्पनेने सर्व दु:ख, इच्छा, आकांक्षा, वासना, द्वेष, इर्षा विसरून जातात आणि स्वत:च्या आत्म्यात विलीन होऊन जातात. स्वत:च्या शोधात ज्ञानप्राप्ती करतात, तोच खरा आत्मानंद होय. परंतु या स्थितीपर्यंत येण्यासाठी मानवाला वरवरचे ज्ञान प्राप्त करून चालत नाही, तर त्यासाठी अध्यात्मात रममाण व्हावे लागते. अध्यात्मासाठीची पहिली पायरी ज्या प्रमाणे भक्तीची आहे, त्याच प्रमणे तुमचे चित्त शांत असण्यालाही अध्यात्मात मोठे महत्व आहे. भगवत् गीतेतील तत्वज्ञानाला मोठे महत्व आहे. तुम्ही स्थितप्रज्ञ असायला हवे. कुठल्याही गोष्टीचा उन्माद अथवा अतिरेक न करण्यालाही अध्यात्मात मोठे स्थान आणि महत्व आहे. मनशुद्धीलाही येथे मोठे महत्व आहे. त्यासाठी तुमच्यात सकारात्मक उर्जा असणे गरजेचे आहे. मानवी जीवन जगत असताना सुख आणि दु:ख येतच असतात. परंतु, त्यामुळे खचून न जाता दररोज उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे ताजेतवाणे विचार तुमच्यात असलेच पाहिजे. तरच तुम्ही या भाव-भावनांच्या जगात तारूण जाऊ शकता. प्रत्येकालाच इच्छा, आकांक्षा या असतातच, परंतू, त्या पूर्ण करण्यासाठी चुकीचा मार्ग न अवलंबणे हे देखील एक प्रकारे अध्यात्मच आहे.