निसर्ग ज्ञानाचं भंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:36 AM2018-01-13T02:36:11+5:302018-01-13T02:36:25+5:30

पौष मास म्हटलं की थंडीचा गारठा, धुक्याची शाल लपेटलेली वसुंधरा नजरेसमोर येते. सूर्यनारायणाचं महत्त्व अधोरेखित करणारा पौष! प्रत्येक रविवारी दिनकराचं पूजन करणारी परंपरा. पंचमहाभूतापैकी एक तेजस तत्त्वाचा अधिपती असणारा सूर्य.

Nature Knowledge Store | निसर्ग ज्ञानाचं भंडार

निसर्ग ज्ञानाचं भंडार

Next

- कौमुदी गोडबोले

पौष मास म्हटलं की थंडीचा गारठा, धुक्याची शाल लपेटलेली वसुंधरा नजरेसमोर येते. सूर्यनारायणाचं महत्त्व अधोरेखित करणारा पौष! प्रत्येक रविवारी दिनकराचं पूजन करणारी परंपरा. पंचमहाभूतापैकी एक तेजस तत्त्वाचा अधिपती असणारा सूर्य. त्याचं दर्शन हवंहवंसं वाटणारं. भोगी असणारा सूर्यनारायण, त्याचं संपूर्ण पौष मासामध्ये दर्शन घेऊन आरोग्याची प्रार्थना करणारी आपली संस्कृती ! निसर्गपूजनात रमणारी, निसर्गाशी जवळीक साधणारी संस्कृती. पंचमहाभूतं म्हणजे निसर्ग, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याची तयार झालेली सृष्टी. सृष्टीमधील ८४ लक्ष योनींची निर्मितीही पंचमहाभूतांची.
सर्वत्र फळा, फुलांनी बहरलेल्या बागा. तिळासारख्या स्निग्ध धान्यांची रेलचेल. मानवाच्या देहाला ऋतूनुसार आवश्यक ते प्रदान करणारा निसर्ग, त्याला अनुरूप असे सण, उत्सव. देहाचं आरोग्य, मनाची प्रसन्नता प्रदान करणारा पौष मास. दानाचं महत्त्व स्वआचरणातून शिकविणारा निसर्ग. दातृत्वाचा देखणा अलंकार ल्यालेला निसर्ग. निसर्गातून प्राप्त होणारं ज्ञान. ‘मधुमती विद्या’ प्रदान करणारा निसर्ग. मधुमती विद्येशी, निसर्गाशी मैत्रभाव जपणारा दत्तसंप्रदाय. भगवान दत्तात्रेयांनी निसर्गाला गुरू केलं. प्रत्येक घटकाकडून गुणांचं ग्रहण, आचरण करणारे दत्तात्रेय. निसर्गाकडून घेण्याजोगं अफाट!
दत्तसंप्रदाय, दत्तपरंपरा जपणारे, जोपासणारे संत. निसर्गाकडून ज्ञान प्राप्तीचा उपदेश देणरे प्रज्ञानंद सरस्वती. उपदेश शिरोधार्ह मानून निसर्गाच्या सानिध्यात अनुष्ठानं, तप करून ज्ञानप्राप्ती प्रयत्नपूर्वक करून घेणारे त्यांचे सत् शिष्य विष्णुदास महाराज!
निर्मोही असणारे गुरू-शिष्य !
दत्तात्रेयांनी संत एकनाथ महाराजांना दर्शन देऊन कृतार्थ केलं. दत्ताचा आशय म्हणजे अखंड देणारा ! निसर्गदेखील भरभरून देतो. भगवान दत्तात्रेय भक्तांना सदैव भोग आणि योग दोन्ही प्रदान करत राहतात.
संकुचित वृत्तीचा त्याग करून, विशालतेचा, व्यापकतेचा अंगीकार करण्यास प्रवृत्त करणारा निसर्ग! ‘मी’पणाचा लय होऊन अहंकार नाहीसा करण्यास सहाय्यभूत होणारा निसर्ग. विविध गुणाचं प्रगटीकरण अनेक रूपातून करणारा निसर्ग. पौष मांसात निसर्गाच्या सहवासात रमलं की त्याच्याकडून गुण ग्रहण करावेसे वाटणं स्वाभाविक! अवगुणांचा त्याग आणि गुणांचा अंगीकार हा मूलमंत्र कथन करणारी आपली संस्कृती. मानसिक आरोग्याला प्राधान्य देणारी संस्कृती निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी. पंचमहाभूतांची पाच तत्त्वं सहजपणानं सांगणारी आणि संवर्धन करणारी संस्कृती!
प्रत्येक मांसाचं, महिन्याचं महत्त्व वेगवेगळं.
प्रत्येक ऋतूचा सोहळा आगळा. त्याचा आस्वाद घेणारं मन आणि त्यासमवेत नांदणारी संस्कृती, या सगळ्यांमधून जगा आणि जगू द्या याचं सुरेल गान गायल जातं. शिका आणि शिकवा हा संदेश सुंदरपणानं, सहजपणानं दिला जातो. आपण जीवन ओंजळ कशाने भरतो हे महत्त्वाचं आहे.

Web Title: Nature Knowledge Store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.