नवदुर्गा माहात्म्य, देवीची पूजा करून देवीसमोर दुसरी माळ बांधावयाचा दिवस

By दा. कृ. सोमण | Published: September 22, 2017 02:40 AM2017-09-22T02:40:30+5:302017-09-22T13:29:29+5:30

आज नवरात्राचा दुसरा दिवस आहे. देवीची पूजा करून देवीसमोर दुसरी माळ बांधावयाची आहे, चंडीकवचामध्ये देवीच्या नऊ अवतारांसंबंधी माहिती आहे. १) शैलपुत्री २) ब्रह्मचारिणी ३) चंद्रघंटा ४) कूष्मांडा ५) स्कंदमाता ६) कात्यायनी ७) कालरात्री ८) महागौरी ९) सिद्धिदात्री असे दुर्गेचे नऊ अवतार आहेत नवदुर्गा हा मातृदेवतांचा समूह आहे.

Navadurga Mahatmya, worshiping the Goddess and setting up a wall in front of Goddess | नवदुर्गा माहात्म्य, देवीची पूजा करून देवीसमोर दुसरी माळ बांधावयाचा दिवस

नवदुर्गा माहात्म्य, देवीची पूजा करून देवीसमोर दुसरी माळ बांधावयाचा दिवस

Next

आज नवरात्राचा दुसरा दिवस आहे. देवीची पूजा करून देवीसमोर दुसरी माळ बांधावयाची आहे, चंडीकवचामध्ये देवीच्या नऊ अवतारांसंबंधी माहिती आहे. १) शैलपुत्री २) ब्रह्मचारिणी ३) चंद्रघंटा ४) कूष्मांडा ५) स्कंदमाता ६) कात्यायनी ७) कालरात्री
८) महागौरी ९) सिद्धिदात्री असे दुर्गेचे नऊ अवतार आहेत नवदुर्गा हा मातृदेवतांचा समूह आहे.
१) शैलपुत्री - शैलपुत्री ही हिमालयाची कन्या आहे. ती भगवान शंकरांची पत्नी आहे. शैलपुत्रीचे वाहन वृषभ आहे. ही देवी द्विभुजा आहे. हिच्या उजव्या हातात त्रिशूळ असून, डाव्या हातात कमलपुष्प आहे. शैलपुत्री कामात यश देणारी देवता आहे. हिच्या उपासनेने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी उपासकांची श्रद्धा आहे.
२) ब्रह्मचारिणी - ब्रह्मचारिणी ही ब्रह्मपद प्राप्त करून देणारी देवता आहे. माणसाला मुक्तीसाठी ही वरदान देते. ही मोक्षदायिनी देवता आहे. ही जशी वेदस्वरूप आहे तशीच ती तत्त्वस्वरूप आहे. आणि तमरूपही आहे. हिने शुभ्रवस्त्र परिधान केले असून, ही द्विभुज आहे. हिच्या उजव्या हातात जयमाला असून, डाव्या हातात कमंडलू आहे. हिच्या उपासनेमुळे भक्ताला तप, सदाचार, वैराग्य, त्याग, संयम या गुणांची प्राप्ती होते अशी या देवी उपासकांची श्रद्धा आहे.
३) चंद्रघंटा - चंद्रघंटा देवीच्या उपासनेने सर्व प्रकारची पापं आणि बाधा नष्ट होतात. हिच्या कृपाप्रसादाने अलौकिक दर्शन, दिव्य सुगंध, दिव्य धनी यांची अनुभूती होते अशी तिच्या उपासकांची श्रद्धा आहे. चंद्रघंटा देवीच्या डोक्यावर घंटा आहे. किंवा तिच्या घंटेमध्ये चंद्र आहे ती चंद्रघंटा आहे. या देवीला १० हात आहेत. हिच्या हातात कमळ, धनुष्यबाण, गदा, त्रिशूळ, खड्ग इत्यादी आयुधं आहेत. तिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. ती वाघावर बसलेली आहे.
४) कूष्मांडा - कूष्मांडा देवतेच्या उपासनेने आजार, शोक आणि कष्ट नाहीसे होतात. भक्ताला आरोग्यविषयक काळजी घेण्याची बुद्धी प्राप्त होते. त्यामुळे त्याल बल, आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश प्राप्त होते. त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्याला संकटावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. कूष्मांडा म्हणजे वाईट ताप देणारा असा हा संसार जिच्या उदरात आहे ती कूष्मांडा होय. ती संसारातील संकटे गिळून टाकते अशी भाविकांची श्रद्धा आहे. कूष्मांडा म्हणजे कोहळा! या देवीला कोहळा जास्त आवडतो म्हणून नवचंडी होमामध्ये कोहळा अर्पण करतात. हिच्या हातात जपमाला, कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृतकलश, चक्र आणि गदा आहे. कूष्मांडा देवता सिंहावर आरूढ झालेली आहे.
५) स्कंदमाता - स्कंदमाता म्हणजे पार्वती! स्कंद म्हणजे कार्तिकेय. भगवान श्रीशंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र स्कंद हा देव-दानव संग्रामात देवांचा सेनापती होता. स्कंदमातेने स्कंदाला आपल्या मांडीवर घेतले आहे. स्कंदमातेला चार हात असून, दोन हातांमध्ये तिने कमलपुष्प घेतले आहे. तिसºया हाताची वरमुद्रा असून, चौथ्या हाताने तिने स्कंदाला धरले आहे. स्कंदमाता शुभ्रवर्णा असून, ती सिंहावर बसलेली आहे. जेव्हा आपण हिची उपासना करतो त्या वेळी आपण स्कंदाचीही उपासना करीत असतो. स्कंदमातेच्या उपासनेमुळे चित्त शांत राहते. आपण सर्व लौकिक, सांसारिक बंधनातून मुक्त होतो अशी साधकांची श्रद्धा आहे.
६) कात्यायनी - कात्यायनी देवी चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती करून देते अशी भाविकांची श्रद्धा आहे. कात्यायनी देवीविषयी एक कथा सांगितली जाते. महिषासूर राक्षसाने देवांचा पराभव केल्याचे ऐकून कात्यायन मुनींनी सर्व देवांना आपल्या आश्रमात बोलावले. आणि त्या सर्वांचे तेज एकत्र केले. त्यांत आपल्या तपश्चर्येचे तेज मिसळून एक देवता निर्माण केली. हीच नवदुर्गेतील ‘कात्यायनी’ होय. हिला तीन नेत्र असून, ती सिंहावर आरूढ झालेली आहे. विद्यार्णव तंत्रामध्ये ही चतुर्भुजा असल्याचे म्हटले आहे. ती शंख, चक्र, खड्ग आणि त्रिशूळ धारण केलेली आहे. मत्सपुराणात ही दशभुजा असल्याचे म्हटले आहे. पहिल्या चार शक्तिपीठांमध्ये हिचे नाव समाविष्ट आहे. महिषासुराचा शोध घेत ही देवी विंध्याचल पर्वतावर आली असे म्हटले आहे.
७) कालरात्री - कालरात्री देवीचे दुसरे नाव आहे शुभंकरी! ही देवी शुभफल दायिनी आहे अशी उपासकांची श्रद्धा आहे. ही देवता रौद्र रूप असलेली, उग्र तप करणारी, संहारक, तामसी शक्ती असलेली देवता आहे. सर्वसंहारक अशा काळालाही ही नाशकाचे भय दाखविते. म्हणूनच हिला ‘कालरात्री’ असे म्हणतात. ही देवी दुष्टांचा नाश करणारी आहे. हिच्या उपासनेमुळे माणूस भयमुक्त होतो. मात्र यासाठी उपासकाचे शरीर, मन आणि वाणी यांची शुद्धी असणे आवश्यक आहे. कात्यायनी देवी चतुर्भुज आहे. हिच्या डाव्या हातात तलवार आणि ढाल किंवा लोखंडाचा काटा आहे. उजव्या हाताची वरमुद्रा - अभयमुद्रा आहे. हिच्या गळ्यात रुद्रमाला आहे. हिच्या पाठीवर लांब वेणी असून, त्यात तिने सुवर्णफुले माळलेली आहेत.
८) महागौरी - हिमालयाची कन्या पार्वती हिने तपश्चर्येने शंकर पती मिळविला. परंतु शंकराचा रंग गोरा होता व पार्वतीचा रंग काळा होता. त्याबद्दल पार्वतीच्या सखी तिला चिडवू लागल्या. तेव्हा पार्वतीने तपश्चर्येने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवांनी दिलेल्या आशीर्वादामुळे पार्वतीचा रंग गोरा झाला. तीच ही ‘महागौरी’ होय. ही चतुर्भुज आहे. हिच्या उपासनेमुळे असंभव कार्य संभव होते. ही दु:ख, दैन्य दूर करते अशीही भाविकांची श्रद्धा आहे.
९) सिद्धिदात्री - ही देवी अणिमा-महिमा, गरीमा-लघिमा, प्राप्ती-प्राकाम्य, ईशित्व-वशित्व या अष्टसिद्धी प्राप्त करून देते अशी भाविकांची श्रद्धा आहे. ही देवता चतुर्भुज आहे. हिच्या उजव्या हातात चक्र व गदा आहे. डाव्या हातात शंख आणि पद्म आहे. वाहन सिंह असून, ही कमलासना आहे.
नवरात्रात या नवदुर्गांची उपासना केली जाते, आपण त्यांना वंदन करू या.
या देवी सर्व भूतेषु
शक्तीरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै
नमो नम: ।।

(पंचांगकर्ता, खगोल अभ्यासक)

Web Title: Navadurga Mahatmya, worshiping the Goddess and setting up a wall in front of Goddess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.