नववी माळ : आदिशक्ती जगदंबा दुर्गाभवानीने महिषासुराचा केला वध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 10:48 AM2018-10-18T10:48:11+5:302018-10-18T10:48:20+5:30
Navratri 2018 : सागरात शेषशय्येवर निद्रिस्त झालेल्या श्री विष्णूला जागे करण्यासाठी ब्रह्मदेवाने महामायेची निद्रादेवीची स्तुती केल्यावर रात्री देवी विष्णूच्या नेत्र, नाक, बाहू आणि हृदयातून अव्यक्तातून प्रत्यक्ष रूपाने ब्रह्मदेवासमोर प्रकटली आणि भगवान विष्णू निद्रापाशातून मुक्त होऊन जागे झाले.
प्रा. अशोक झाल्टे शास्त्री, उंडणगावकर
ॐ नम: चण्डिकायै
श्री दुर्गा सप्तशती आधुनिकसंदर्भात
सागरात शेषशय्येवर निद्रिस्त झालेल्या श्री विष्णूला जागे करण्यासाठी ब्रह्मदेवाने महामायेची निद्रादेवीची स्तुती केल्यावर रात्री देवी विष्णूच्या नेत्र, नाक, बाहू आणि हृदयातून अव्यक्तातून प्रत्यक्ष रूपाने ब्रह्मदेवासमोर प्रकटली आणि भगवान विष्णू निद्रापाशातून मुक्त होऊन जागे झाले. समोरच असलेल्या मधू आणि कैटभ राक्षसांनी ब्रह्मदेवाला मारण्यासाठी हाती शस्त्र घेऊन चाल केली होती. भयंकर क्रोधाने विष्णूने राक्षसांशी युद्ध सुरू केले. अनेक वर्षे हे युद्ध सुरू होते. किती वर्षे तर ‘पंचवर्ष सहस्राणि बाहु प्रहरणो विभु:। तावय्पति बलोन्मतौ महामाया विमोहितो।’ मधू कैटभाशी हे युद्ध पाच हजार वर्षे सुरू होते. शेवटी महामायेने त्यांना मोहाच्या जाळ्यात अडकविले. कारण राक्षसांचा वध करणे देवालाही अशक्य झाले होते. मोहमयी झाल्यावर राक्षस विष्णूच्या पराक्रमाची स्तुती करून म्हणतात. ‘आम्ही तुझ्यावर खुश आहोत. प्रसन्न आहोत. वर मागून घे तुला हवा तो’ आणि विष्णू म्हणतात ‘तुम्ही खरेच माझ्यावर प्रसन्न असाल, तर तुमचा मृत्यू माझ्या हातून व्हावा, असा वर मला द्या.’ मोहिनी अस्त्राच्या प्रभावाने राक्षस फसले आणि म्हणाले, ‘ज्याठिकाणी पाणी नसेल अशा ठिकाणी आमचा वध करावा.’ हे युद्ध सागरात सुरू होते. म्हणून ‘आवां जहिन यत्रोर्षी सलिलेन परिप्लुता.’ कोरड्या ठिकाणी आमचा वध करा. ते ऐकल्यावर श्री विष्णूने आपल्या मांड्यांचा प्रचंड विस्तार करून त्यांना आपल्या मांडीवर घेऊन चक्राने त्यांचे मस्तक छाटून त्यांचा वध केला.
मधू आणि कैटभ या नावांचा अर्थ जर आपण बघितला, तर मधू म्हणजे मध, मधमाशा मध पोळ्यात साठवतात. मधू राक्षसाच्या नावाने लोभ व साठेबाज, या दोन गोष्टीने लोभी माणसाला वेड लावले आहे. कैटभ म्हणजे कीटक रक्त शोषून घेणारा कीटक. लोभी माणसाच्या मनातील लोभाचे हे दोन चेहरे. वाटेल त्या मार्गाने आणि मिळेल तसा पैसा हडप करण्याच्या मार्गाने जाणाऱ्या लोभींची संख्या आज सतत वाढत आहे, तर साठेबाजीचे लोभी माणसांना वेडच असते. कोटीने, अब्जावधीने पैसे मिळवून ठेवायचे जे की, समाजाच्या उपयोगात येत नाहीत, यालाच आज काळे धन म्हटले जाते. ज्याचा साठा मधू कैटभ करीत आहेत. म्हणून आजच्या समाजानेसुद्धा भ्रष्टाचाराच्या मोहमयी पैशाच्या दलदलीच्या वर उठून या भ्रष्टाचारास नष्ट केले पाहिजे. हेच या कथेचे आधुनिक तात्पर्य आहे.
सप्तशतीच्या अध्यायात महिषासुराच्या अत्याचाराने पीडित देवगण आपला राजा इंद्रासह ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेव त्यांच्यासह श्री विष्णूकडे आणि मग महादेवाकडे गेल्यावर त्यांना आपली दारुण अवस्था सांगतात. ब्रह्मा-विष्णू-महेशाला भयंकर क्रोध निर्माण होऊन त्यांच्या शरीरातून दिव्यशक्तीचे तेज बाहेर पडते. तिन्ही देव उपस्थित सर्व देवांनाही आपल्या दिव्यशक्तीची जाणीव करून देतात. ब्रह्मा-विष्णू-महेश आणि सर्व देवांच्या सामूहिक शक्तीतून एक अत्यंत तेजस्वी अशी दिव्यशक्ती प्रकटते. त्रिदेव आणि सर्व देव या शक्तीला वंदन करून आपापली अस्त्र-शस्त्र आणि उपयुक्त अशा वस्तू त्या देवीला प्रदान करतात आणि ही देवी मग महिषासुराच्या पारिपत्यासाठी सिद्ध होते. ही कथा जुलमी हुकूमशहा महिषासुराची आणि रणरागिणी दुर्गादेवीच्या उद्गम आणि विकासाची आहे. मानवी संस्कृतीत चांगल्या आणि वाईटाचा संघर्ष हा अविभाज्य भाग आहे. म्हणून सामान्य माणसाचे सर्वच सामान्य, साधारण असते. त्यांना चांगले-वाईट कळत असते. चांगले स्वीकारून वाईट त्यागावे, असे ब-याच लोकांना वाटतही असते; परंतु बहुधा परिस्थितीचे दडपण, विकारांची जबरदस्त ओढ, मर्यादित समज, तोकडी ताकद यामुळे माणसे भरकटत जातात. सर्वसामान्य माणूस देव होऊ शकत नाही; परंतु तो राक्षसही नसतो. जगरहाटीकडे त्याचा कल असतो. अशावेळी जे नेतृत्व असते ते सर्वसामान्य माणसाच्या समुदायाला चांगल्या किंवा वाईटाच्या मार्गाने घेऊन जाते. सप्तशतीच्या कथेत देवसमाजाला इंद्र राजा लाभला होता, तर राक्षसांच्या समुदायाला रेड्यासारखा माजलेला जुलमी हुकूमशहा महिषासूर राजा लाभला होता. त्यामुळे दोन्ही समाजांत चांगल्या आणि वाईट, सुष्ट व दुष्ट प्रवृतींचे प्राबल्य होते. देव सद्गुणी चांगले, तर दानव राक्षसी वृत्तीचे होते. महिषासुराचे सहायकही ‘यथा राजा, तथा प्रजा’ याच वृत्तीचे होते. अशा स्फोटक परिस्थितीत चांगल्या-वाईटामधील सनातन संघर्ष निर्माण झाला आणि देव-दानवांचे भयानक युद्ध होऊन या युद्धात महिषासुराने इंद्राचा पराभव करून देवांचे सर्व आधिकार आपल्या हाती घेऊन स्वर्गावर राज्य स्थापन करून देवांचा छळ सुरू केला. परिणामी, देवशक्ती एकत्रित होऊन त्यांनी आपल्या तेजोराशीने एक प्रखर तेजोराशी निर्माण करून जी दुर्गा नावाने संबोधित झाली, तिचा जयजयकार करून रणवाद्यांची गर्जना करून असुर शक्तीला आव्हान केले. प्रश्न असा पडतो की, हेच काम देवांनी अगोदरच का केले नाही, तर असे लक्षात येते की, समाज फुटीर प्रवृत्तीचा असला की, तो दुर्बळ होतो. एकतेअभावी देव दुर्बळ झाले होते. त्यासाठी समाज एकसंध असणे महत्त्वाचे आहे. अशा फुटीर अवस्थेत समाजातील चांगले ज्ञानी, श्रेष्ठ, विचारवंत लोक सामाजिक, राजकीय समस्यांपासून अलिप्त राहतात किंवा बाजूला पडतात. मग समाजाचे नेतृत्व चुकीच्या, गौण, क्षमतेच्या लोकांकडे जाते. त्यासाठी चांगल्यांनी याचा आज विचार करण्याची गरज आहे. कारण चांगल्याचेच, मोठ्यांचेच अनुकरण समाजात होत असते. म्हणून ‘महाजनो येन गतस्थपन्था:।’ असे म्हटलेले आहे. ‘राजा कालस्य कारणम्’ असेही म्हटलेले आहेच. पराभूत देवांना दुर्गादेवीसारखी प्रचंड शक्ती सेनानी मिळताच त्यांनी दैत्यराज महिषासुराला जो जुलमी हुकूमशहा, कुणाचे वर्चस्व सहन न करणारा, अत्यंत उन्मत्त आणि अहंकारी होता. त्याला आव्हान केले. देव-दानवांचे घनघोर युद्ध होऊन आदिशक्ती जगदंबा दुर्गाभवानीने महिषासुराचा वध केला. सर्व देवांनी आनंदित होऊन महादेवीची स्तुती केली. तिचे वर्णन चौथ्या अध्यायात आलेले आहे. ते अत्यंत समर्पक आणि मनोज्ञ असून, भक्ततारक असे आहे.