Navratri 2019 : असा आहे घटस्थापनेचा मुर्हुत...!
By Appasaheb.patil | Published: September 27, 2019 05:05 PM2019-09-27T17:05:01+5:302019-09-27T17:06:23+5:30
Shardiya Navratri Ghatasthapana Date & Time 2019 : शारदीय नवरात्र उत्सव
सोलापूर : अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्र रविवार २९ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. रविवारी सकाळी सूर्योदयानंतर दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत घटस्थापना करण्यासाठी शुभ मुर्हुत आहे. याच वेळेत घटस्थापना करावी असे आवाहन प्रसिध्द पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. काही वेळेस सोयर-सुतक यामुळे प्रतिपदेच्या दिवशी नवरात्रारंभ करता येत नाही. अशा वेळेस ७ दिवसांपासून १ दिवसांपर्यंतचे सुद्धा नवरात्र करता येते. वय, व्याधी आदी कारणामुळे ९ दिवस उपवास करणे शक्य नसते अशा वेळेस पहिल्या व शेवटच्या दिवशी किंवा फक्त अष्टमीचा उपवास करावा. देवीचे नवरात्र बसविल्यावर त्या देवीवर किंवा घटावर फुलाने पाणी शिंपडून अभिषेक व पूजेचे उपचार करावेत. मात्र पूजेतील इतर देवदेवतांना नेहमीप्रमाणे ताम्हनात ठेवून अभिषेक व नंतर पूजा करावी असे आवाहन मोहन दाते यांनी केले़
---------------
असे करा नवरात्र साजरा...
यावर्षी रविवार २९ सप्टेंबर रोजी घटस्थापना नवरात्रारंभ करावा़ घटस्थापना सकाळी सूर्योदयानंतर दुपारी १:४१ पर्यंत करता येईल. २ आॅक्टोबरला ललिता पंचमीचे पूजन करावे. ५ आॅक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) व सरस्वती पूजन करावे, ६ आॅक्टोबरला महाष्टमी उपवास आहे, ७ आॅक्टोबर रोजी सोमवारी नवरात्रोत्थापन असून ८ आॅक्टोबर रोजी मंगळवारी विजयादशमी (दसरा) उत्सव साजरा करण्याचे आवाहन मोहन दाते यांनी केले आहे.
-----------
महालक्ष्मीच्या पूजनाने शक्ती, विद्या व धनाचे सामर्थ्य प्राप्त होते...
आश्विन शु. पंचमीस ललिता पंचमीचे व्रत करतात. या व्रताची पूजा करंडकाचे स्वरूपात असलेल्या ललिता देवीची करावयाची असते. 48 दूर्वांची 1 जूडी याप्रमाणे 48 जुड्या वहावयाच्या असतात. ललिता त्रिशती नामावली वाचावी. तसेच नवरात्रामध्ये सरस्वतीचे पूजन करण्यास सांगितले आहे. नवरात्रामधील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे महाष्टमी (महालक्ष्मी) पूजन. या दिवशी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असतो. अशा प्रकारे नवरात्रामध्ये देवीच्या तीनही रुपांची म्हणजे महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मीची पूजा करण्याने शक्ति, विद्या व धन सामर्थ्य प्राप्त होते.