पाचवी माळ - सर्व देवांची निर्मित्ती आदिशक्तीनेच केली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 12:47 PM2018-10-14T12:47:24+5:302018-10-14T12:48:03+5:30

गोलमन नावाच्या मन संशोधकाने अत्याधुनिक संशोधनावर या विषयासंबंधी ‘इमोशनल इंटेलिजन्स’, म्हणजे ‘भावनिक बुद्धिमत्ता’ नावाच्या

Navratri Festival - all the gods were made by Adashakti | पाचवी माळ - सर्व देवांची निर्मित्ती आदिशक्तीनेच केली

पाचवी माळ - सर्व देवांची निर्मित्ती आदिशक्तीनेच केली

googlenewsNext

प्रा. अशोक झाल्टे शास्त्री, उंडणगावकर

ॐ नम: चण्डिकायै-
- श्री दुर्गा सप्तशती आधुनिक संदर्भात -

श्री देवी भागवत हे या जगदंबेचे चरित्र, महर्षी व्यासांनी लिहिले आहे. या देवी पुराणाच्या अगोदर व्यासांनी १७ पुराणांची रचना केलेली आहे. त्यांच्या इतर पुराणांत ज्या देवांचे वर्णन आलेले आहे, त्या सर्व देवांची निर्मिती या आदिशक्तीनेच केलेली आहे. एवढेच नव्हे, तर ब्रह्मा-विष्णू-महेश यांनादेखील निर्माण करून या विश्वाचे संचालन, निर्माण आणि विनाशाचे कार्य त्यांच्यावर सोपवून या कालचक्राला गतिमान ठेवले असल्याचे व्यासांनी स्पष्ट केलेले आहे. त्याचबरोबर ही आदिमाया स्वयं कशी निर्माण झाली, याचे विवेचनही या देवी भागवतात आहे.
आपण सप्तशती ग्रंथातल्या कवचाचा विचार करीत आहोत. नवदुर्गाची ओळख आपण करून घेतली. ही देवीची नऊ नामे म्हणजे दुर्गेचे नऊ आविष्कार. त्यामुळे नवरात्र. या नवरात्रीत तीन-तीन दिवस महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वतीचे पूजन करावे, असे सांगितलेले आहे. पहिले तीन दिवस महाकालीची, म्हणजे दुर्गेची पूजा करावी. तिला आपली मनोमालिन्यता, दुर्गुण आणि दोष नष्ट करण्याची प्रार्थना करावी, म्हणजे मग ही दुर्गा आपल्यातील असुरीवृत्ती व असुरी गुणांशी संग्राम करून त्यांना नष्ट करील. दुसऱ्या तीन दिवसांत श्री महालक्ष्मीचे पूजन करावे. यात वरील दुर्गुणांचा नाश झाल्यावर सात्त्विक गुणवृत्ती आपल्यात यावी, आली पाहिजे. तसे न झाल्यास जुन्या असुरी वृत्तींचा प्रभाव अजूनही आहे. त्यासाठी उपासकाने अत्यंत साधपणे सद्गुणांची वृद्धी करावी. तेव्हाच महालक्ष्मी आपल्या भक्ताला दैवी संपदास्वरूप अक्षुष्ण द्रव्य प्रदान करते. लक्ष्मीही सात्त्विक शक्ती आहे आणि पुष्टी-तृप्ती प्रदान करणारी आहे, म्हणून श्रीसुक्तात लक्ष्मीम आवाह्यम आणि अलक्ष्मी नाशयाक्यहम असे म्हटलेले आहे. आता शेवटच्या तीन दिवसांत ब्रह्यज्ञान स्वरुपिणी महासरस्वतीचे पूजन सुरू होते. साधकात जेव्हा सात्त्विक गुणांची वृद्धी होते तेव्हा ज्ञान प्राप्त करण्यासाठी तो योग्य होतो. श्री सरस्वतीचे हे पूजन नादब्रह्म, तथा आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी चांगले व उपयोगी मानले गेले आहे. सप्तशतीत या त्रिगुणात्मक त्र्यंबकेचे पूजन मानसिक, भावनिक स्तरावर व्हावे, असे प्रतिपादित केलीले आहे. बुद्धिमत्तेसंबंधी आपला दृष्टिकोन अत्यंत मर्यादित आहे. यात आपण जीवनात जे करू शकतो त्या विविध क्षमतांच्या संपूर्ण आवाक्याकडे दुर्लक्ष झाल्याचे संशोधकांचे संशोधन आहे. डॅनियल

गोलमन नावाच्या मन संशोधकाने अत्याधुनिक संशोधनावर या विषयासंबंधी ‘इमोशनल इंटेलिजन्स’, म्हणजे ‘भावनिक बुद्धिमत्ता’ नावाच्या ग्रंथात भावनिक बुद्धिमत्ता बुद्ध्यांकापेक्षा जास्त महत्त्वाची असू शकते, असे प्रतिपादन केलेले आहे. म्हणून सप्तशती ग्रंथाला केवळ बुद्धिमत्तेच्या आधारे न घेता त्यात भावनिक बुद्ध्यांकाची जोड दिल्यास या ग्रंथाच्या उपासनेने अध्यात्मातील गूढता सहज गम्य होईल आणि म्हणून त्यादृष्टीने हे कवच आपण पाहत आहोत. कवचापूर्वी नवदुर्गांची ओळख झाल्यावर दुर्गादेवीला जीवनातील आलेल्या आणि येणाºया विविध संकटांपासून वेगवेगळ्या रूपाने, नावाने आपले रक्षण कर, अशी भक्त प्रार्थना करतोय. कारण केवळ भक्ताने तिचे स्मरण करताच ती शक्ती देवता नि:संशय त्यांचे रक्षण करते. ‘येत्वां स्मरान्ति देवेशिरक्षते तान्न संशय:’ पुढे या शक्तीदेवीची अनेक नावांनी ओळख करून दिलेली आहे. ती कशी, कोण आणि काय आहे, हे सांगितलेले आहे. त्यापैकी चामुण्डा, वाराही ऐन्द्री, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, लक्ष्मी, हरिप्रिया, ब्राह्मी या नावांनी तिला तिच्या वाहनांनी, मंडीत केलेले असून, या सर्व प्रकारच्या माता योगशक्तींनी संपन्न असून, त्यांनी क्रोधाने हाती शंख, चक्र, गदा, शक्ती, नांगर, मुसळ आदी आयुधांसह खेटक, तोमर, परशू, पाश, अंकुश, त्रिशूळ, धनुष्य इत्यादी शस्त्रे धारण केलेली आहेत. भक्त रक्षणासाठी आणि दैत्य नाशासाठी व सृष्टीच्या कल्याणासाठी ती आहेत. नंतर भक्त प्रार्थना करतो की, ‘नमस्तेऽ स्तु महारौद्रे महाघोर पराक्रमे। महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी त्राहिमां देवि दुष्प्रेक्ष्येशत्रुनां भय वर्धिनी’ प्रार्थनेच्या अर्थावरून लक्षात येते की, ती शक्ती देवी महान उग्र पराक्रमी, प्रचंड उत्साही, अत्यंत बलशाली, महाभयनाशिनी अशी आहे. म्हणून तिला नमस्कार असो; परंतु केवळ तिला नमस्कार करून तिचे रूप गुणवर्णन करून भक्त जर काहीच करणार नसेल, तर त्याचे रक्षण कसे होईल? म्हणून शक्ती देवतेच्या वरील सर्व रक्षणकारी गुणांची आवश्यकता भक्तांत निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मानसिक व भावनिक स्तरावर या स्तोत्र पठनामुळे एक अपूर्व साहस, आत्मविश्वास, निर्भयता ती शक्ती देवता निर्माण करते, म्हणून या ‘देविसर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता: नमस्तेये, नमस्तयै नमस्तयै नमो न महा:’ असा त्रिवार नमस्कार तिला केलेला आहे. केवळ बुद्धीने संकटाचे निवारण होणार नाही. मेंदूने जरी आज्ञा दिली तरी भावना, मन उचंबळून आल्याशिवाय संकटाचा सामना करण्यासाठी मनुष्य तयार होत नाही, म्हणून उपासनेत बुद्ध्यांकापेक्षा भावनांक महत्त्वाचा असतो. ‘भाव धरारे आपलासा, देव करारे’ ते याचसाठी केवळ शस्त्राअस्त्रानेच आम्हाला संरक्षण असू नये, तर शरीराच्या आणि शरीरांतर्गत सर्व अवयवांचे, शरीरातील सर्व धातूंचेही स्वास्थ्य आणि संरक्षण कवचात आलेले असल्यामुळे त्याने आंतरबाह्य अत्यंत सूक्ष्मपणे आपले संरक्षण करावे, असा भाव त्यात आलेला आहे. म्हणून दाहीदिशा, डाव्या-उजव्या बाजू, शरीराच्या सर्व अवयवांचे, नखे, रक्त, मज्जा, घसा, मांस, हाडे, कातडी, मेद, आतडे, पित्त, कफ, शुक्र, रज, वात, शरीरातील अहंकार, मन, बुद्धी, पंचप्राण, रस, रूप, गंध, शब्द, स्पर्श, सत्त्व, रज, तम, कीर्ती, धर्म, गोत्र, पत्नी, पुत्र, धन आणि जी जी कामना आम्ही करू, त्या सर्व मनोकामनांचेही रक्षण व्हावे, असा भाव त्यात आलेला असून, तो निरामय, स्वास्थ्य, आरोग्यदायी, शांती, समाधान प्रदान करणारा आहे. असे हे कवच भक्ताने नित्य पठन करावे, त्यामुळे सर्वच वाईट शक्तींपासून त्याचे रक्षण होईल आणि शेवटी जो आशीर्वाद आलेला तो तर अत्यंत कल्याणकारी आहे. तो असा ‘यावर भूमण्डलम धत्ते सशैल वतकामनं। तापतिष्टातिमेदि न्यां संताति: पुत्र-पौत्रिकी, देहान्ते परंस्थान यत सुरैअपिदुर्लभं। प्राप्नोति पुरुषो नित्यम् महामाया प्रसादित:’

Web Title: Navratri Festival - all the gods were made by Adashakti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.