नीरा स्नान अन् आत्मावलोकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:52 PM2018-07-12T23:52:47+5:302018-07-12T23:53:26+5:30
आनंदाचे डोही आंनद तरंग । आंनदची अंग आनंदाचे।। ही अनुभूती घेत माउली ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा आज वाल्हे सोडून पिंपरे खुर्द मार्गे नीरा स्नान करून
आनंदाचे डोही आंनद तरंग ।
आंनदची अंग आनंदाचे।।
ही अनुभूती घेत माउली ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा आज वाल्हे सोडून पिंपरे खुर्द मार्गे नीरा स्नान करून लोणंदला विसावणार आहे. तर आमचे तुकोबाराय आज उंडवडीतून निघून बºहाणपूर मार्गे बारामतीत विसावणार आहेत. ‘ब्रह्मांनदी लागली टाळी’ या अवस्थेत वास करू पाहणारे मन आणि या दोन्ही सोहळ्यांच्या वाटचालीमुळे वातावरणात आलेली पवित्रता यामुळे हा सारा परिसर अक्षरश: अमृतात न्हाऊन निघालाय असं वाटतं.
तसंं पाहिलं तर त्या कर्मठ व्यवस्थेतील नको असणाऱ्या चुकीच्या समजुतींना शिष्टाचार समजून जगणाºया व्यवस्थेत इंद्रायणीच्या पाणवठ्यावर स्नानाला गेलं की माझ्या माउलीच्या अंगावर दगड फेकले जायचे. ज्यांच्या दृष्टीच्या एका कटाक्षात सारं चराचर पवित्र करण्याचं सामर्थ्य आहे. त्या या दिव्य भावंडांना पाणवठा बाटवला म्हणून मारलं जायचं. सहानुभूतीच काय, तर या चार भावंडांच्या बाबतीत सहानुभूतीचा एखादा वैचारिक कवडसा सुद्धा त्या समाजाच्या मनात येत नव्हता. आणि म्हणूनच सगळं गाव अंघोळ करून गेलं की कुठेतरी एखाद्या सहज लक्षात न येणाºया जागी या चार भावंडांना स्नान करायला लागायचं. अत्युच्च दर्जाची योग्यता असताना,
‘उभारीला ध्वज तीही लोकवरी।
ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची।।’
हा अधिकार अंगात सामावलेला असताना, या चार भावंडांची झालेली ती परवड ती परमपावनप्रयोजिनी इंद्रायणी अजूनही लक्षात ठेवून आहे, असं वाटतंय. माउलींच्या जीवनातील ती परवड आणि आजचा सोहळा यांचा मेळ घालताना माझं मन गलबलून जातंय. आणि जगाकडून मिळालेले खूप आघात सोसतात तेच संतत्वाला पोहोचतात. ‘तुका म्हणे संत । सोसी जगाचे आघात।’ आणि त्यांचेच पुढे या जगात सोहळे संपन्न होतात, हा सिद्धांत मला गवसतो.
आज माउलींच्या नीरा स्नानाचा सोहळा म्हणजे निव्वळ स्नान सोहळा नाही, तर तो या वारकºयांंचा आत्मावलोकन सोहळा म्हणावा लागेल. नामदेव महाराजांनी आपल्या तीर्थावलीच्या अभंगात स्नानाचे पाच प्रकार सांगितले आहेत. त्यातील सगळ्यात पहिल्या प्रकारचं स्नान म्हणजे सत्यवचन. वाणीनं खरं बोलणं हे पहिलं स्नान. यामुळे जो पवित्रपणा आपल्याला लाभतो तो खूपच उंच दर्जाचा असतो. याचसाठी तुकोबारायसुद्धा एके ठिकाणी सांगतात -
‘सत्य बोले मुखे।
दुखवे अनिकांच्या दु:खे।
तुज व्हावा आहे देव।
तरी हा सुलभ उपाय।।’
दुसरं स्नान म्हणजे अंतरबाह्य निर्मळ होणं. जो ही निर्मलता धारण करतो त्याला इतर साधना करावी लागत नाही. नव्हे तर जगातील सगळ्या साधना अंतर्बाह्य शुद्धता येण्यासाठीच करायच्या असतात. म्हणून तर महाराज म्हणतात-
‘वाचेचा रसाळ मनाचा निर्मळ।
त्याचे गळा माळ असो नसो।।’
नामदेवराय स्नानाचा तिसरा प्रकार सांगतात की, इंद्रियांचा निग्रह आणि वासनेचा विग्रह करणं याचा अर्थ इंद्रियांच्या माध्यमातून घेता येणाºया सर्वच भोगांचा त्याग करणे असा अजिबात नव्हे, तर इंद्रियांद्वारे घ्यावयाच्या भोगांचा मर्यादित भोग घेणं होय. निग्रह याचा अर्थ त्या भोगांचा आग्रह न धरणे होय. हे झालं की वासनेचा विग्रह होतोच. यासाठीच महाराज सांगतात की,
‘विटले हे चित्त प्रपंचा पासोनी।
वमन ते मनी बैसलेसे।।’
नामदेवराय चौथे आणि खूप महत्त्वाचे स्नान सांगतात आणि ते म्हणजे सर्वांभूती करुणाभाव ठेवणे होय; पण हे जमायला खूप कठीण आहे. या वृत्तीत जगणं म्हणजे संतत्वात वास करणं होय. अशा दयाळू व्यक्तीचं दर्शन सहज आपल्याला झालं तर,
‘तयाच्या चिंतने तरतील दोषी।
जळतील राशी पातकांच्या।’
या न्यायाने तो आपल्याला पावन करीत असतो. तो सगळ्या तीर्थांना तीर्थरूप असतो आणि म्हणूनच पांडुरंगाला पंढरीत यायला लावणाºया आपल्या पुंडलिकदादाबद्दल महाराज म्हणतात-
‘सर्व तीर्थे मध्यांन काळी।
येति पुंडलिका जवळी।
करती अंघोळी।
होती पावन।।’
नामदेवराय पाचवं स्नान सांगतात ते म्हणजे, पाण्यानं शरीर स्वच्छ करणं. हे तर आपण दररोज करतो. मात्र, यामुळे निव्वळ शरीर स्वच्छ होत असतं. आंतरिक स्वच्छतेसाठी वरील चार ही स्नाने आपण करणं खूप गरजेचे आहे अन्यथा,
‘एरवी तरी पांडुसूता।आत शुद्ध नसता।
बाहेरी करमु तो तत्त्वत:।वितंबू गा।’
अशी आपली अवस्था होऊ शकते.
माउलींच्या नीरा स्नानाच्या सोहळ्याकडे पाहून आमच्यात नामदेव महाराजांनी सांगितलेली ही पाचही प्रकारची स्नाने करण्याची वृत्ती निर्माण व्हावी एवढीच अपेक्षा.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)