शास्त्रानुसार उभारा नववर्षाची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:55 PM2019-03-27T22:55:33+5:302019-03-27T22:59:26+5:30

नवीन ‘विकारी’ नामक संवत्सर शके १९४१ हे फाल्गुन अमावास्येच्या दिवशी म्हणजे दि. ५ एप्रिल दुपारी २ वा. १७ मि. सुरू होत आहे. गुढीपाडवा मात्र शनिवार दि. ६ एप्रिलला आहे. तसे पाहिल्यास नववर्षाची सुरुवात दि. ५ एप्रिलला दुपारीच होत आहे.

New Year's Gudhi raise according to Shastra | शास्त्रानुसार उभारा नववर्षाची गुढी

शास्त्रानुसार उभारा नववर्षाची गुढी

googlenewsNext
ठळक मुद्देगुढीपाडवा साडेतीन मुहुर्तापैकी एक : कोणतीही घटिका शुभ

नवीन ‘विकारी’ नामक संवत्सर शके १९४१ हे फाल्गुन अमावास्येच्या दिवशी म्हणजे दि. ५ एप्रिल दुपारी २ वा. १७ मि. सुरू होत आहे. गुढीपाडवा मात्र शनिवार दि. ६ एप्रिलला आहे. तसे पाहिल्यास नववर्षाची सुरुवात दि. ५ एप्रिलला दुपारीच होत आहे.
भारतीय संस्कृतीनुसार चैत्रशुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षारंभ होतो. नववर्ष साजरे करणे नैसर्गिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक सर्वच दृष्टीने श्रेयस्कर व फायदेशीर असते. गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त असून, या दिवशी कोणतीही घटिका शुभ असते. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस. म्हणून हा दिवस वर्षारंभदिन म्हणून साजरा केला जातो. श्रीरामाचे नवरात्र याच दिवसापासून सुरू होते.
प्रभू रामचंद्रांनी दुष्ट रावणाचा व अनेक राक्षसांचा पराभव, वध करून अयोध्यानगरीत प्रवेश केला. तो हाच दिवस होता. तेव्हा अयोध्यावासीयांनी गुढ्या तोरणे लावून आपला आनंद साजरा केला. तेव्हापासून आपणही त्या दिवसाची आठवण म्हणून गुढी उभारतो.
नारद ऋषींना साठ पुत्र झाले. हीच साठ संवत्सरे होत. या प्रत्येक संवत्सराचा पहिला दिवस, देवांनी गुढी उभारूनच केला असा हा वर्षप्रतिपदा दिवस अशीही एक कथा पुराणात आहे.
गुढीपाडव्याला सकाळी अभ्यंगस्नान करून गुढी उभारली जाते. शास्त्रात सांगितले आहे की या दिवशी घर, व्यवसायाच्या जागेच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचे तोरण पवित्रता येण्यासाठी बांधावे. या तोरणात विड्याची पाच पाने तरी लावावीत. वास्तूत सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी विड्याच्या पानांची मदत होते.
अशी उभारा गुढी
साधारणत: सूर्योदयाचे वेळी पूर्वेकडे तोंड करून गुढी उभारा. ती दरवाजाच्या बाहेर परंतु उंबरठ्याच्या (घराच्या आतून) उजव्या बाजूला उभी करावी. रांगोळी काढून त्यावर पाट ठेवावा. त्यावर गुढी उभारायची आहे. यावेळी पाटावर रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद, कुंकू वाहावे. यावर गुढीची स्थापना करावी, त्यामुळे गुढीच्या टोकावर असलेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्त होते. गुढीसाठी घेतलेल्या मोठ्या वेळूच्या उंच टोकास पितांबर अथवा खण दोरीने बांधून वरचे बाजूस तांब्याचे, पितळेचे, चांदीचा तांब्या (लोटा) वा भांडे उलटे ठेवावे. (काही भागात गुढीला पातळ व खण घालतात तर काही ठिकाणी कुंची घालतात.) त्यावर साखरेची गाठी, कटुनिंबाची कोवळी पाने, आंब्याची डहाळी व फुलांचा हार बांधावा. शास्त्रानुसार हिरवा किंवा पिवळा रंगाचा रेशमी खण बांधणे योग्य आहे. काठी दोरीने खिडकीच्या गजास अथवा सोयीस्कर ठिकाणी बांधावी जेणेकरून ती वाऱ्याने अथवा धक्क्याने पडणार नाही.
गुढी थोड्या झुकलेल्या स्थितीत उभी करावी. हळद कुंकू चंदनाने गुढीची मनोभावे पूजा करून आरती करावी. दुपारी कडुनिंबाची कोवळी पाने खावी म्हणजे रोग शांती होते असं शास्त्र सांगतं. शास्त्रानुसार सायंकाळी सुर्यास्तापूर्वी गुढीचे सौभाग्य द्रव्याने पूजन करून गुढी उतरवावी. गुढीपाडव्याचे दिवशी उंच गुढी उभारणे हे उच्च आकांक्षाचे द्योतक आहे. धर्मशास्त्रात गुढीला ब्रह्मध्वज म्हणतात.
गुढीपाडव्याच्या दिवशी घरात एखादे मोठे शुभकार्य असल्याप्रमाणे सर्वांनी नवीन कपडे, अलंकार घालून गुढीची पूजा करावी. गोड पक्वान्न करून गुढीला नैवेद्य दाखवावा. कडुनिंबाच्या कोवळ्या पानाबरोबर फुले, काळे मिरे, जिरे, हिंग, मीठ व ओवा एकत्र करून त्याचे चूर्ण बनवावे व ते सेवन करावे अशी पद्धत फार पूर्वीपासून प्रचलित आहे.
सर्वोत्तम मुहूर्त
दि. ६ एप्रिल शनिवारी सूर्योदय सकाळी ६ वा. १३ मि. आहे तर सूर्यास्त सायंकाळी ६ वा. ३६ मि. आहे. सूर्य मीन राशीतून भ्रमण करणार आहे. गुढी उभारण्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ८ ते ९.३० वा. आहे. (सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारावी असं शास्त्र सांगत) यावेळी चंद्र मेष राशीत अश्विनी नक्षत्रात असून तो ३ कला ३७ विकलावरून भ्रमण करेल तसेच यावेळी धनु राशीत भ्रमण करणाऱ्या ‘गुरू’चा शुभ प्रभाव वातावरणात मोठ्या प्रमाणात राहणार आहे. या दिवशी राहू काल रात्री ८ ते ९.३० वा. पर्यंत आहे.
या दिवशी काय करावे
सकाळी गुढी उभारल्यानंतर ब्राह्मणासह देवाची व गुरूची पूजा करावी. पंचांग (नवीन) आणून त्यावर असलेल्या गणपतीच्या फोटोची पूजा करावी. या दिवशी ज्योतिषाचाऱ्यांची सुद्धा पूजा करून आशीर्वाद प्राप्त करावे. त्यांच्याकडून वर्षफल ऐकावे. म्हणजे त्यायोगाने नवीन वर्ष शुभ फलदायक होते. या दिवशी याचकांना अनेक प्रकारची दाने देऊन व इच्छित भोजन घालून संतुष्ट करावे. यामुळे दीर्घ आयुष्य, यश व लक्ष्मी प्राप्त होते. ज्योतिषाद्वारे वर्षफल ऐकल्यास सूर्य आरोग्याची वृद्धी करतो, चंद्र निर्मल यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरू थोरपणाची, शुक्र कोमल वाणीची, शनि आनंदाची, राहू विरोधनाशक अशा बाहुबलाची आणि केतू कुलाच्या उन्नतीची वृद्धी करतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटीपूजन (सरस्वती पूजन) असते. पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वतीची रांगोळी किंवा प्रत्यक्ष सरस्वती काढून गंध, फुले, अक्षता व हळदकुंकू व्हावे. उदबत्तीने ओवाळावे, नैवेद्यासाठी गुळखोबरे ठेवावे.
नवीन वर्षाच्या आगमनाने नवीन संकल्पना, नवीन योजना राबवाव्यात असा संदेश या दिवशी दिला जातो.

  • ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य

Web Title: New Year's Gudhi raise according to Shastra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.