रात्र वैऱ्याची आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:20 AM2020-03-25T00:20:46+5:302020-03-25T00:26:36+5:30
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो २० व्या शतकाच्या अखेरीस भारतासह जवळजवळ संपूर्ण जगाने मुक्त अर्थव्यवस्था, खासगीकरण आणि जागतिकीकरण या नव्या ...
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो
२० व्या शतकाच्या अखेरीस भारतासह जवळजवळ संपूर्ण जगाने मुक्त अर्थव्यवस्था, खासगीकरण आणि जागतिकीकरण या नव्या एल़ पी.जी. ़चा स्वीकार केला़ म्हणता म्हणता विशाल जगाला छोट्या गावाचे स्वरूप प्राप्त झाले. फेसबुक, व्हॉट्सअॅप, फेसटाइम यासारख्या ‘अॅपनी’ तर ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ ही जाहिरात खरी करून दाखवली. जाहिरात आणि वास्तव यांचा मेळ बसणारी ही जगातील एकमेव जाहिरात असावी़ या मोबाईल क्रांतीने जगाच्या दोन ध्रुवांमधील अंतर कमी झाले. जगाच्या एका टोकाला कुणी शिंकला तरी त्याचे पडसाद दुसºया टोकाला उमटू लागले. जगातील काही झाकून राहिनासे झाले़ दुसरीकडे वाहतुकीची साधनेही मोठ्या प्रमाणात वाढली, नव्हे ती वेगवान काळाची गरज झाली़ उच्चभ्रू, उच्चशिक्षित आणि गर्भश्रीमंतांची मक्तेदारी असलेला विमान व परदेशप्रवास सामान्य जनांच्या आवाक्यात आला़ परदेशी जाणारी विमाने विद्यार्थ्यांनी खचाखच भरू लागली़ अमेरिका, युरोपस्थित लाडक्या लेकीला आवडते मोदक, पुरणपोळ्या, लोणची पापड पाठविण्याची सोय सहज उपलब्ध होऊ लागली. फेसटाइम, व्हिडिओ कॉलने भावनिक अंतरही मिटवून टाकले ‘वसुधैवकुटुंबकम्’ किंवा श्री़ ज्ञानदेवांचे ‘हे विश्वची माझे घर ’ ही संकल्पना वेगळ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरली़
पण गेल्या काही दिवसापासून ‘कोरोना’ व्हायरसने जगभर घातलेला धुमाकूळ पाहिला की वाटते जगाचे हे जवळ येणे, जागतिकीकरणच्या जगाच्या मुळावर उठू पाहते आहे की काय? जगाची बाजारपेठ काबीज करणाºया ‘मेड इन चायना’ च्या मालाप्रमाणे चायनाचेच लेबल लागलेल्या कोरोनाने सारे जग चिंताक्रांत बनावे हा एक दुर्दैवी योगायोगच म्हणावा लागेल. जागतिकीकरणामुळे जगातील नवनवे शोध, नव्या फॅशन्स जगाने ‘जुने जाऊ द्या मरणालागूनी’ या न्यायाने जेवढ्या झटकन स्वीकारल्या, त्याहीपेक्षा अधिक वेगाने कोरोनाचाही स्वीकार नाईलाजाने करावा लागत आहे़ अमेरिका, इटली, स्पेन सारखी प्रगत राष्ट्रेही त्याला नकार देऊ शकलेली नाहीत़
आपला भारत देश तर चीनच्या पाठीला पाठ लावून बसलेला! त्यात चीनची मोठी बाजारपेठ! कच्चा, पक्का माल आणि माणसे सोबत कोरोनाचे व्हायरस न आणते तरच नवल! व्हाया इटली, दुबई चीनचा हा ‘माल’ भारतातही पोहोचला़ पसरू लागला़ भारतभर हातपाय पसरण्याच्या आधीच त्याला रोखणे हे भारतवासीयांच्या पुढील मोठे आव्हान आहे़ सारे काही शासनावर सोपवून चालणार नाही़ ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या न्यायाने आपण प्रत्येकाने शहाणपण दाखवणे गरजेचे आहे़ निष्काळजीपणाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल़ सर्वांना एकत्र येऊ न लढाई लढावी लागेल. कदाचित ही लढाई आमच्या राजकीय, धार्मिक नेत्यांना आणि माझ्या देशबांधवांना खूप काही शिकवून जाईल़
वेळीच सावध होऊ या़ अन्यथा रात्र वैºयाची आहे़