भक्ती नऊ दिवसांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 05:46 AM2020-02-12T05:46:03+5:302020-02-12T05:46:06+5:30
आपल्या देशात भक्तीची परंपरा आहे. कॅथोलिक ख्रिस्ती धर्मातही भक्तीचे विविध प्रकार आहेत. नऊ दिन (नोव्हेना) हा त्यातला एक प्रकार. ...
आपल्या देशात भक्तीची परंपरा आहे. कॅथोलिक ख्रिस्ती धर्मातही भक्तीचे विविध प्रकार आहेत. नऊ दिन (नोव्हेना) हा त्यातला एक प्रकार. येशुमाता मरियेची भक्ती त्या दिवसात केली जाते. त्या भक्तीत सामुदायिक प्रार्थनेनंतर मूकपणे वैयक्तिक प्रार्थना केली जाते. मरियेच्या तसबिरीसमोर फुले, मेणबत्त्या वाहतात. मुंबईत माहीमला संत मायकल चर्चमध्ये दर बुधवारी पवित्र मरियेच्या भक्तीला सर्वधर्मीय श्रद्धावंत हजेरी लावतात. अशीच भक्ती सप्टेंबर महिन्यात वांद्र्याला मोतमावलीच्या समोरही पाहावयास मिळते. या नऊ दिन भक्तीसाठी स्त्रियांचा सहभाग अधिक असतो. याचे कारण स्त्रीच्या विशिष्ट मानसिकतेत आहे. स्त्री जणूकाही संपूर्ण कुटुंब आपल्या हृदयात वागविते. आपला पती, आपली मुले, सासू-सासरे, कुटुंबाचे विविध प्रश्न या सगळ्यांचा भार ती मनात वाहते. त्यात मनाने ती गुंतलेली राहते. त्या प्रत्येकाचे हित ती पाहते. घरातील लेकराबाळांसाठी तिचा जीव तुटत राहतो. हे सगळे तिला सुरळीत व्हायला हवे असते. हा सर्व भार ती माऊलीच्या पायाशी वाहते. थोडा विचार केला तर तिचे हे समर्पण तिच्या नकळत तिला मानसिक, शारीरिक आरोग्यही पुरवत असते. स्त्री भावनिक असते. लहानसहान प्रसंगांनी तिला वेदना होतात. तिचे डोळे भरून येतात. मात्र पुरुषाप्रमाणे तो कढ दाबून न टाकता ती तो वाहू देते. स्वत:ला मोकळे करते. मनावरचे मळभ उतरते. मन नितळ होते. त्यामुळे शरीरही निकोप राहते. मरिया माऊलीपुढे आपल्या व्यथावेदना ठेवताना हेच होत असते. ती भारमुक्त होत असते. मरिया माऊलीला स्त्रिया आईच्या रूपात पाहात असतात. कोवळ्या तारुण्यात लग्न झालेले असते. आईच्या पदरात सुरक्षित ऊबेतून ती सासरच्या घाण्याला जुंपलेली असते. भक्तीचे नऊ दिवस मायभगिनी व्यथा वेदनांचा भार माऊलीच्या पुढ्यात ठेवतात. त्या भक्तीतून स्त्रिया स्वत:साठी बळ एकवटतात आणि पुन्हा संसाराच्या रहाटगाडग्याला जुंपतात. जणू श्रद्धा जगत असतात.
- फा. फ्रान्सिस दिब्रिटो