गुंडेगावातील नवविध नऊ अधिष्ठात्री देवता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 02:39 PM2020-10-21T14:39:05+5:302020-10-21T14:47:06+5:30
महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी एक प्रमुख असलेले शक्तीपीठ तुळजापुरची भवानी माता आहे. या भवानी मातेचे गुंडेगावामध्ये एक जागृत स्मृतीस्थान आहे. दरवर्षी भक्तांची मनोकामना पूर्ण करणाºया या तुकाईमातेचा नवरात्र उत्सव या ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो.
अध्यात्म
गुंडेगावातील ऐतिहासिक वैभवात भर टाकणाºया नऊ देवीस्थाने या गावात पहावयास मिळतात. यामध्ये प्रामुख्याने तुकाई देवी (गावचे श्रद्धास्थान), लक्ष्मी आई (मातंग समाजाचे श्रद्धास्थान), फिरंगाई देवी, बारवेची आई, तळ्यातली आई (कुंभाराची देवी), राशिनची आई मंदिर (वडघुल रोड), कोतणची आई (कोतकर मळा), साबळाई देवी (कोळगाव रोड), भिवाई देवी (धनगरांची देवी, वाघदरा, फलटण येथील कांबळेश्वरचे देवीस्थान) याचा समावेश आहे.
गुंडेगावच्या ग्रामदेवी तुकाई देवी ऐतिहासिक माहिती एका देवीभक्ताची दंतकथा सांगितली जाते. गुंडेगावातील शिंपी परिवारातील देवीभक्त रंगनाथ बाबाजी शिंपी (आजचे चुंबळकर घराणे) यांची शेतीवाडी सांभाळत असताना ते नित्यनेमाने देवीची मनोभावे पूजा करीत असत. दर महिन्याच्या शुक्रवारी तुळजापूर या ठिकाणी देवी दर्शनास जात असत. पायी राशीन या ठिकाणी यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असत. असे त्यांचे ही देवी प्रेम वर्षानुवर्षे चालू राहिले. शिंपी बाबा यांची यमाई देवी वर अपार भक्ती होती. त्यांची पत्नी व ते पायवाटेने कर्जत तालुक्यातील राशीन या ठिकाणी मजल दरमजल पायी चालत देवी दर्शनासाठी जात. तेथील तळ्यात स्नान करून बरोबर आणलेला शिधा देवीचरणी ठेवून उरलेला प्रसाद म्हणून घेत. देवीचे दर्शनाचा हा त्यांचा वारी जवळजवळ बारा वर्षे चालू होती. पण त्यांना पोटी मूलबाळ होत नव्हते. त्यांची पुत्रप्राप्तीची इच्छा देवीने जाणली.
शिंपी बाबाच्या पत्नीला दिवस गेले. तरी सुद्धा शिंपी बाबा आपल्या भक्तीत खंड पडू देत नसत. शिंपी बाबाला पत्नीच्या बाळंतपणाची काळजी लागून होती. आपल्या पत्नीने ही चिंता त्यांना सांगूनही त्यांनी यमाईच्या इच्छेपुढे व त्यांच्या देवी भक्तीच्या पुढे चिंता कसली? हे बोलून त्यांनी यमाईच्या नामस्मरणाचा सल्ला पत्नीला दिला. त्यांनी आपली दूरची बहीण बोलवली. बाबांनी नामस्मरणातून त्यांनी देवीला विनंती केली की, माझ्या पत्नीचे बाळंतपण असल्यामुळे मी काही यावेळी तुझ्या देव दर्शनासाठी येऊ शकत नाही. मला माफ कर. अशातच देवी बाबाला दृष्टांत देऊन सांगितले की, तुला आता येण्याची गरज नाही. मी तुला भेटण्यासाठी व तुझ्या मुलाला पाहण्यासाठी तुझ्या दारी येणार आहे असे स्वप्नरूपी दृष्टांत दिला. मी तुझ्या पाठीमागे येत आहे. तु पुढे चाल. ज्याक्षणी तू वळून मागे पाहशील त्याक्षणी मी अंतर्धान पाऊन त्या ठिकाणी तांदळा रूपाने राहील. अशा रितीने दुस-या दिवशी शिंपी बाबा चालत चालत गुंडेगाव या ठिकाणी आपल्या शेतापर्यंत आले. परंतु आपल्या मनाची शांतीसाठी देवी खरोखरच आपल्या पाठीमागे आली आहे का ? हे त्यांनी वळून पाहिले. यानंतर देवी क्षणात अंतर्धान पावली. त्या ठिकाणी एका तांदळा रुपाने तयार होऊन देवी आजही गुंडेगावातील लोकांना आपल्या कृपेने रक्षण करत आहे, अशी अख्यायिका जुने जाणते नागरिक सांगतात.
या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सार्वजनिक वर्गणी करून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून सर्व गावातील लोकांना महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. नवरात्रौत्सवानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाविकांची मोठी उपस्थिती असते. परंतु यंदा कोरोनाचे सावट आहे. हे सावट लवकरच दूर व्हावे, असे साकडे भाविकांनी देवीला घातले आहे.
-दादासाहेब आगळे, सामाजिक कार्यकर्ते, गुंडेगाव, ता. नगर.