भुके नाही अन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 05:33 AM2019-08-19T05:33:43+5:302019-08-19T05:34:00+5:30
खरे तर मातृ देवो भव: पितृ देवो भव: अशी शिकवण देणारी आपली संस्कृती.
- प्रा. शिवाजीराव भुकेले
आपला देश तसा धर्मप्रवण आहे. इथे जेवढे धार्मिक सोहळे साजरे होतात, तेवढे जगाच्या पाठीवर कदाचित कोठेच होत नसतील. खरे तर मातृ देवो भव: पितृ देवो भव: अशी शिकवण देणारी आपली संस्कृती. ज्याला माता-पित्यांच्या पायाचे चरणतीर्थ मिळते, त्याला इतर कुठल्याच तीर्थाची गरज नसते. हा आदर्शवाद एका बाजूला आपली बोथट होत चाललेली संवेदना आई-बापांनाच आपला वैरी मानू लागली आहे. हा आत्मघात आहे, जो कुटुंब व्यवस्थेचा कणाच मोडून टाकणारा आहे. अशा माता-पिताद्वेषी माणसांच्याविषयी संत नामदेव म्हणाले होते -
जयाचे उदरी जन्माला जों नर । पीडी तया थोर सर्वकाळ ।
मानीली अंतरी सखी जीवलग। आत्महत्या मग घात करी ।
नामा म्हणे ऐसें पातकी चंडाळ बुडविले कुळ बेचाळीस। ज्यांच्या पोटी जन्म घ्यायचा, त्यांनाच एवढे पिडायचे की, बिचाऱ्या माता-पित्यांना या छळवणुकीपेक्षा मरण बरे वाटावे. अशा कुटुंबद्रोही दिवट्यांना संत नामदेवांनी चंडाळ म्हटले आहे. अशा नराधमास जन्म देण्यापेक्षा वांझोटे राहिलो असतो तर खूप बरे झाले असते अशी पश्चात्तापाची वेळ आज अनेक माता-पित्यांवर येत आहे. त्यामुळे घरे ओस पडत आहेत आणि वृद्धाश्रम ‘हाउसफुल्ल’ होत आहेत. आत्मा-परमात्म्याच्या मिलनाच्या गप्पा मारीत आहेत. आपल्या आई-बाबांना कडकडून भूक लागायची, तेव्हा त्यांना वेळेवर कोरभर भाकरी न देणारी मंडळी भौतिक ऐश्वर्याची सूज आल्यानंतर मोठमोठ्या तीर्थक्षेत्रात जाऊन आई-बाबांच्या नावाने पिंंडदान करीत आहेत. त्यापेक्षा हा ‘पीळदार’ देह दिला, त्यांना जिवंतपणी अन्न, वस्त्र, निवाºयाचे छत्र आणि पुत्राचे वात्सल्य देऊ या ! नाहीतर तुकोबारायांनी म्हटलेच आहे -
भुके नाही अन्न । मेल्यावरी पिंंडदान ।
हे तो चाळवा चाळवी । केले आपणीच जेवीं ।
नैवेद्याचा आळ । वेचे ठाकनी सकळ ।
तुका म्हणे जड । मज न राखावे दगड ।