नाममात्र कर्म आपुलियाच हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 07:31 PM2019-07-19T19:31:55+5:302019-07-19T19:33:12+5:30

वास्तवाचे भान ठेवत स्वत्वाची ओळख करुन घेतल्यास प्रगती साधली जाते.

Nominal work is in our hand | नाममात्र कर्म आपुलियाच हाती

नाममात्र कर्म आपुलियाच हाती

Next

- डॉ भालचंद्र ना. संगनवार

उत्कटतेतून उन्नतीकडे आणि सदाचारातून सद्गतीकडे मार्गक्रमण सहज शक्य आहे. माणसाच्या प्रगतीआड येणारे षडरिपू ईश्वरभक्तीने कमी केले जाऊ शकतात. दांभिकपणा कमी करुन वास्तवाचे भान ठेवत स्वत्वाची ओळख करुन घेतल्यास प्रगती साधली जाते. स्वत:मधील न्यूनगंड कमी करुन ओळख निर्माण केली जाऊ शकते ग.दि. माडगूळकर यांनी याचे वर्णन अत्यंत बोलक्या शब्दात केले आहे, 
एके दिनी परंतू पिल्लास त्या कळाले 
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले, 
पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक 
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक 

स्वत:च्या मर्यादा लक्षात घेऊन कामास सुरुवात केली़ तर निराशा हाती येत नाही. प्रत्येकात बहूतांश चांगले तर काही प्रमाणात अवगूण असतात. ईश्वरभक्तीने अवगूण कमी होऊन सदगूणात वाढ होते हे नव्याने सांगणे नको. ममत्व आणि समत्व गूणांची वाढ झाल्यास सूखी समाज निर्माण होण्यास वेळ लागत नाही. निर्जीव वस्तूत देखील सजीवांच्या प्रतिकृतींची अनूभूती घेणे हे आपले संस्कार आहेत यालाच श्रद्धा असे म्हटले जाते. तूच कर्ता आणि करविता या विश्वासातून भगवंताला समर्पित होणारे आत्मीक सूख उपभोगताना दांभिकतेने केलेले काम हे केव्हाही आत्मसूख अथवा प्रगती साध्य करु देत नाही.

निष्काम कर्मभोग हा मानवाला प्रगतीकडे घेऊन जातो असे म्हटले जाते परंतू सद्यस्थितीत इच्छेखातर कार्य आणि कार्यांतुन निर्वाह असे सूत्र अवलंबिले जात आहे. त्यामूळे इच्छेने फळ प्राप्त झाली नाही तर निराशेच्या प्रवृत्ती बळावत आहेत. त्यामूळे अल्प कालावधीत उत्तुंग व कोटीच्या कोटी उड्डाने मारण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. त्यामूळे आनंदाचा उपभोग घेण्याऐवजी दूखा:चे वातावरण निर्माण होते. त्यास्तव संताचा उपदेश अत्यंत योग्य असून ते सांगतात,
करु नको खेद कोणत्या गोष्टीचा 
पती लक्ष्मीचा जाणतसे

सर्व काही विधात्याच्या अधिन असले तरी नाममात्रे कर्म हे आपल्या हाती ठेवले आहे. निष्ठेने कर्म करणे म्हणजेच ईश्वरनिष्ठा होय. अगम्य ज्ञानाची प्रचीती घेऊन समाजाचे देणे फेडले जाऊ शकते परंतू तशी आंतरिक तळमळ आवश्यक आहे. विविध क्षेत्रात उत्तूंग शिखर गाठणारा आधूनिक कित्येक ज्ञानराज या समाजात वावरत आहेत. निष्ठेने केलेले कार्य हे देशकार्यच असून या मातेची सेवा केल्याचे समाधान यातून लाभते. आपणास बोध घेता येईल असे कित्येक महानुभव या भूमीत निर्माण झाले. त्यांचा वारसा चालविणे ही काळाची गरज आहे. भागवत धर्माची पताका उंच ठेवत सन्मागार्ने कार्य करणाऱ्याची गरज जास्त आहे. ईहलोकांचा प्रवास हा भौतिकवादास चिकटून न राहता विशेष कार्यास अर्पण करण्यासाठीचा आहे. निसर्ग, प्राणी, पक्षी याचे हे उत्तम उदाहरण आहे.

( लेखक हे लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत )

Web Title: Nominal work is in our hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.