नामस्मरणच खरा यज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 05:46 AM2018-12-31T05:46:55+5:302018-12-31T05:47:11+5:30
भारतीय संत परंपरा आणि विविध धर्म संप्रदायांनी नवविधा भक्ती प्रकाराचेच वर्णन येनकेन प्रकारे केले आहे. या नवविधा भक्ती प्रकारातील भगवंताच्या सत्यस्वरूपास जाणून घेण्याचा सुलभ प्रकार म्हणजे नामस्मरणाची भक्ती होय.
-प्रा. शिवाजीराव भुकेले
भारतीय संत परंपरा आणि विविध धर्म संप्रदायांनी नवविधा भक्ती प्रकाराचेच वर्णन येनकेन प्रकारे केले आहे. या नवविधा भक्ती प्रकारातील भगवंताच्या सत्यस्वरूपास जाणून घेण्याचा सुलभ प्रकार म्हणजे नामस्मरणाची भक्ती होय. नामस्मरणाच्या भक्तीत जात, धर्म, वर्ण, प्रांत यापैकी कशाच्याही कुबड्या वापराव्या लागत नाहीत. स्वत:च्या पायावर, हातावर, मुख आणि मस्तकावर विश्वास ठेवून ईश्वरी भक्तीसमोर आपल्यास आहे तसे प्रस्तुत केले की, नामघोषाची गंगा धो-धो वाहू लागते. भावाचा खुंट जेव्हा नामस्मरणासारख्या साधनाने हलवून बळकट केला जातो, तेव्हा भक्तीच्या भूमीला सुख-दु:खाचे व हर्ष-विषादाचे तडे जात नाहीत म्हणून परमार्थाच्या क्षेत्रात नामस्मरणाची भक्ती जसे प्रारंभिक साधन आहे तसे अंतिम साध्यसुद्धा आहे. नामधारक भक्त नामस्मरणाच्या अव्यभिचारी भावनेवर दृढ राहतो. कारण त्याला माहीत असते पुढे नामभक्तीच्या माउलीने भक्त नावाच्या बालकाला आपली करंगळी दिली की, ज्ञान, वैराग्य, योग, शास्त्र, वेद, वेदांत हे आपोआप त्या भक्ती माउलीच्या पाठीमागे चालू लागतात. शिवाय साधनांच्या भाऊगर्दीत जेव्हा जीवन गुदमरू लागते तेव्हा आत्मसुखाचा आनंद आपोआपच दूर जाऊ लागतो. म्हणूनच तर नामस्मरणासारखे एकमेव साधन भक्तांच्या हाती देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
नाम जप यज्ञु तो परम । बाधु न शके स्नानादी कर्मे
नामे पावन धर्मा धर्म । नाम परब्रह्म वेदार्थे।।
नाम हाच या विश्वातील फुकाचा यज्ञ आहे. इतर याज्ञिक प्रक्रियेत वेळ, श्रम, धन तर खर्च होतेच; पण हाती मात्र काहीच लागत नाही. सोवळ्या-ओवळ्यांच्या भाऊगर्दीत कधी-कधी नामस्मरणाकडे दुर्लक्ष होऊन नको त्या कर्मकांडाला महत्त्व येते. खरे तर निरागस बालकांचे हास्य, चांदण्याचा पिठूर प्रकाश, चंद्रकिरणातून स्रवणारे अमृतकण, सूर्य नारायणाच्या सहस्रावधी किरणांतून मिळणारी ऊर्जा ही जशी निसर्गदत्त प्रक्रिया आहे तसे नामस्मरण आहे. नाम कुणाचेही घ्यावे, नाम कुणीही घ्यावे व नाम कोठेही घ्यावे, ते फक्त आंतरिक सद्भावाने आणि आत्यंतिक सहजतेने घ्यावे तेव्हा ते सद्भक्ताला द्यायचे ते फल योग्यवेळी देणारच. सचैल स्नान न करता भाकरी खाल्ली व पाणी प्याले तर भूक, तहान भागू शकत नाही, असे कधीच होऊ शकत नाही. तसे नामस्मरण घेणाऱ्यांच्या देहाची औपचारिकता महत्त्वाची नसून, त्याची भक्ती, भावना महत्त्वाची आहे.