हे मानवा, स्वत:ला ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 09:13 PM2019-02-07T21:13:31+5:302019-02-07T21:19:01+5:30
जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून मानव ‘मी कोण आहे’ या प्रश्नाच्या उत्तराचे शोधात आहे. या जगाशी माझा काय संबंध आहे ? हे जग कसे निर्माण झाले? आणि या जगाचा निर्माता कोण आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी मानवाने खूप शोध घेतला. परंतु या प्रश्नाचे समाधान झाले नाही. सुरुवातीपासून अनेक संत महात्मे या विश्वात आले. त्यांनी मानवाला आत्मज्ञान दिले.
जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून मानव ‘मी कोण आहे’ या प्रश्नाच्या उत्तराचे शोधात आहे. या जगाशी माझा काय संबंध आहे ? हे जग कसे निर्माण झाले? आणि या जगाचा निर्माता कोण आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी मानवाने खूप शोध घेतला. परंतु या प्रश्नाचे समाधान झाले नाही. सुरुवातीपासून अनेक संत महात्मे या विश्वात आले. त्यांनी मानवाला आत्मज्ञान दिले.
आत्मा म्हणजे काय आणि आत्म्याचा परमात्म्याशी काय संबंध आहे? या प्रश्नाचे उत्तर आत्मज्ञान. ज्याचा अनुभव आपण अंतर्मुख होऊनच करू शकतो. सर्व संत महात्म्यांनी यास पराविद्या असे म्हटले आहे. या व्यतिरिक्त बाह्य साधनेस उदाहरणार्थ जप, तप, पूजापाठ, होम-हवन, दान आणि तीर्थयात्रा इत्यादींना अपराविद्या असे म्हटले आहे. या सर्वांचा आपल्या शरीराशी संबंध आहे, आत्म्याशी नाही. संतमतानुसार पराविद्या ही पण इतर वैज्ञानिक प्रयोगावर आधारित अशी असून प्रत्यक्ष फलदायी आहे. याचा अनुभव विद्यमान पूर्ण सद्गुरूंना शरण गेल्यावरच मिळतो. आपण हिंदू असो की मुसलमान असो, शिख असो वा इसाई अशा धर्माशी पराविद्येचा काहीही संबंध नाही. गुरू जातपात व धर्म याचा भेदभाव करीत नाही. त्यांच्या दृष्टीतून सर्व समाज वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसप्रमाणे आहेत.
जसे शाळा कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणवेश आणि बिल्ले असतात परंतु त्यांची शिकवण मात्र एकच असते तसेच समाजामध्ये आपापले चिन्ह चक्र आहेत परंतु सर्वांचे ध्येय एकच आहे. या जगात मानव देह सर्वश्रेष्ठ आहे. सर्व महात्म्यांनी म्हटले आहे की आपण सर्व मानव आहोत. आपण कोणत्याही जाती, धर्म, पंथ, समाज किंवा देशाशी संबंधित असलो तरी आपण त्या परमेश्वराची लेकरे आहोत. एकमेकांचे बहीण-भाऊ आहोत. शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या मानव मोठा झालाय, परंतु शरीर आणि मन या दोघांना चालणारी जी शक्ती आहे त्या आत्म्याविषयी आपण काहीच जाणत नाही. मन आणि इंद्रिये या पलिकडील देहातीत भावनेवर जाऊन स्वाध्यायाने स्वत:ला जाणणे, त्याची अनुभूती घेणे, निजरूपाचे दर्शन घेणे यालाच आत्मानुभूती म्हणतात. ज्या परमात्म्याने ही सृष्टीची निर्मिती केली, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्याची आपण पूजा करतो त्याला पाहिले आहे का? आपण त्याच्याशी बोलू शकतो का? या सर्व प्रश्नाची उत्तरे विद्यमान गुरू देतात.
आपण देहातीत भावनेवर जाऊन मानव रूपात प्रकट असलेल्या परमपित्याला पाहू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो. या विद्येला जिवंतपणी मृत्यूचा अनुभव देणारी कला असे म्हणतात. अशी अनुभूती ही काही आश्चर्याची बाब नसून ही तर नैसर्गिक नियमानुसार आहे.
संतमतानुसार कोणत्याही ध्येय प्राप्तीसाठी एक सहज नियम असतो, एक आदर्श असतो आणि एक विधीही असते. सफलतेसाठी आपल्या प्रयत्नांनी लक्ष केंद्रित करून आपण त्यास पारखू शकतो. हीच बाब अध्यात्मिक क्षेत्रात लागू होते. सर्व धर्म ग्रंथांचा लक्षपूर्वक आपण अभ्यास केल्यास हेच तत्त्व सर्व धर्मात आहे हे समजते. यासाठी धर्मग्रंथांचे वर वाचन, कथा-कीर्तने हे पर्याप्त नाही. ज्या मार्गाने महापुरुष तेथे पोहोचले आहेत तिथपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. महापुरुषांनी आपले अनुभव धर्मग्रंथात लिहून ठेवले आहेत. कारण असे की जो एक माणूस करू शकतो ते दुसराही करू शकतो जेव्हा त्याला योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले तरच.
अध्यात्मिक मार्गात प्रगतीसाठी माणसाला प्रथम खरा माणूस व्हावे लागेल. नंतर परमात्म प्राप्ती कठीण नाही. खरा मनुष्य होण्यासाठी पूर्ण गुरूंचा सत्संग लाभला पाहिजे. असे गुरूशाळेसारखे असतात. त्यांच्या सानिध्यात गेल्यावर कळते की आपण शरीर नसून आपण देहधारी आत्मा आहोत. आत्मा परमात्म्याचा अंश असून शरीर चालवणारी शक्ती आहे. हा आत्मा मायेच्या जगात आपले मूळ स्वरूप विसरला आहे. परंतु याचा बोध पूर्ण गुरूंना शरण जाऊन दीक्षा घेतल्यावर होतो. ते आत्मज्ञान अनुभूतीसह देतात. मी कोण आहे, मी कुठून आलो यासारख्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सहज मिळते. जन्म मरणाच्या आवागमन चक्रातून आपण मुक्त होतो. स्वत:ला जाणणे व परमात्म प्राप्ती करणे हे मनुष्य जीवनाचे ध्येय या जन्मीचे पूर्ण करू शकतो.
परम संत कृपाल सिंह जी महाराज