एका वाटसरूनं विचारलं, ‘आजोबा, हे शेत कुणाचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 09:12 AM2019-12-21T09:12:40+5:302019-12-21T09:18:12+5:30

‘सब भूमी गोपालकी!’ हे सत्य मानून जर आपण जगलो तर अखंड आनंदात, समाधानात राहू. नाही तर झगडा, संघर्ष, युद्ध ठरलेलं आहेच.’

One asked, 'Grandfather, who owns this farm? | एका वाटसरूनं विचारलं, ‘आजोबा, हे शेत कुणाचं?

एका वाटसरूनं विचारलं, ‘आजोबा, हे शेत कुणाचं?

Next

- रमेश सप्रे

एक वाटसरू चालून थकल्यावर एका शेताच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसला. त्या थंड सावलीत त्याला बरं वाटलं. समोरचं शेत गर्द हिरव्या रंगात डोलत होतं. भरघोस असलेलं पीक पाहून त्याला वाटू लागलं- ‘देवाजीने करुणा केली। शेते पिकून पिवळी झाली।।’ ही भावना मनात आली; पण मस्तकात दुसरंच वारं घोंगावू लागलं. हे शेत जर शेतक-यानं नांगरलच नसतं तर नि त्यात बी पेरलं नसतं तर? नंतर वाढलेलं तण काढून खत घातलं नसतं तर? असं गच्च पीक आलं असतं का शेतात? यात ‘देवाजीची करुणा’ कुठून आली?

हा विचार मनात घोळत असताना एक म्हातारा म्हणून तिथं आला. त्याला या वाटसरूनं विचारलं, ‘आजोबा, हे शेत कुणाचं?’ काहीशा थरथरत्या आवाजात म्हणाले, ‘अवो, ज्योतिबाचं.’ काहीतरी काम असल्यामुळे आजोबा निघून गेले. तेवढय़ात तिथं एक प्रौढ व्यक्ती आली. साधारण पन्नाशीतली. न राहवून वाटसरूनं पुन्हा त्याला विचारलं, ‘काका, हे शेत कुणाचं हो?’ काकांनी उत्तर दिलं, ‘अहो, धोंडीबाचं.’ ‘पण आता एक आजोबा म्हणाले ‘ज्योतिबाचं’ या वाटसरूच्या उत्तरावर ती व्यक्ती म्हणाली, ‘अहो, हे शेत आधी ज्योतिबाचंच होतं; पण तो गेल्यानंतर त्याचा मुलगा धोंडिबा इथं शेती करू लागला.’ ‘असं होय!’ असं वाटसरू बोलण्यापूर्वी ते काकाही निघून गेले.

मनातल्या मनात तो वाटसरू शेतीसाठी करत असलेल्या कष्टाबद्दल धोंडिबाचं कौतुक करत असतानाच एक तिशीतला तरुण तिथं आला. सहज म्हणून त्यालाही वाटसरूनं विचारलं, ‘दादा हे शेत कुणाचं?’ यावर तो तरुण म्हणाला, ‘कोंडिबाचं’ आश्चर्यानं वाटसरू विचारता झाला, ‘एका आजोबांनी सांगितलं की हे शेत ज्योतिबाचं; नंतर एक काका म्हणाले की हे शेत धोंडिबाचं नि आता तुम्ही म्हणताय कोंडिबाचं! असं कसं?’ यावर हसून तो तरुण म्हणाला, ‘अहो, आजोबांच्या आठवणीतलं शेत ज्योतिबाचंच, त्याचप्रमाणे काका म्हणतात तेही बरोबर आहे. कारण त्यांनी ज्योतिबाच्या मृत्यूनंतर धोंडिबाला शेतात राबताना पाहिलंय. माझं विचाराल तर गेल्याच वर्षी हे शेत धोंडिबानं मुलीच्या लग्नासाठी कोंडिबाला विकलं. कोंडिबाचं शेतीचं ज्ञान अलिकडचं. बघा नं त्यानं कसं झकास पीक काढलंय?’ तो दादाही त्याच्या कामासाठी निघून गेला.

वाटसरू आता शिदोरी उघडून, शेजारच्या विहिरीतलं थंडगार पाणी आणून खायला बसणार इतक्यात आणखी त्याच्या सारखाच दुसरा वाटसरू आला. त्यानंही शेजारी बसून आपली शिदोरी सोडली. एकानं आपलं कालवण दुस-याला दिलं तर त्यानं त्याची भाजी याला दिली. दोघं गप्पा करत जेवू लागले. ‘काय गंमत आहे नाही!’ या पहिल्या वाटसरूच्या उद्गारावर दुसरा आश्चर्यभरल्या चेह-यानं पाहू लागला. ‘कसली गंमत?’ या त्याच्या उद्गारावर पहिला म्हणाला, ‘एकाच प्रश्नाची तीन तीन उत्तरं’ नंतर त्यानं घडलेला सारा प्रकार सांगितला. यावर दुसरा वाटसरू म्हणाला ‘तीनच कशाला, असंख्य उत्तरं असू शकतात अशा प्रश्नांची. म्हणजे असं पाहा- ज्योतिबाच्या आधीही हे शेत कुणा सदोबाचं, त्याच्या पूर्वी कुणा मर्तोबाचं, त्याच्यापूर्वी.. अशी ही साखळी संपणारच नाही आणि आज जरी हे कोंडिबाचं असलं तरी नंतर काही वर्षानी हे शेत जयदेवाचं.. महादेवाचं असू शकतं. नव्हे असणारच! ‘मग हे शेत नक्की कुणाचं’ या पहिल्या वाटसरूच्या प्रश्नावर दुसरा शांतपणे म्हणाला- तुम्हीच विचार करा की! अहो, ज्यानं हे शेत निर्माण केलं तोच पहिला नि खरा मालक असला पाहिजे ना? थांबा तुम्हाला एका साधूनं सांगितलेली गोष्टच सांगतो.

एका कुटुंबातील वडील वारल्यानंतर त्यांच्या शेताची मालकी दोन मुलांकडे आली. वाटणी करताना शेताच्या मध्ये घातलेल्या बांधावरून दोघांच्यात भांडण सुरू झालं. दोघांचं म्हणणं एकच, शेताच्या माझ्या भागात हा बांध तू बांधलायस. हे भांडण इतकं तीव्र झालं की दोघांनी एकमेकांवर कु-हाडीनं प्राणघातक हल्ला केला. त्यात एक मेला तर दुसरा रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला. अत्यवस्थ होता म्हणून गावातल्या डॉक्टरकडे त्याला नेलं. त्याच्या रडणा:या आईला पाहून डॉक्टर म्हणाले, ‘मी  आहे ना, घाबरू नकोस, मी याचे प्राण वाचवीन.’ प्रत्यक्ष काही दिवसांपूर्वीच अपघातात जखमी झालेल्या स्वत:च्या मुलाचा जीव या डॉक्टरला वाचवता आला नव्हता.

हे सांगून तो साधू म्हणाला, ‘देव दोनदा हसला. एकदा त्या मुलांनी माझं शेत. माझं शेत’ असं म्हणत एकमेकांवर जीवघेणा हल्ला केला तेव्हा देव हसला. दुस-यावेळी देव हसला जेव्हा तो डॉक्टर ‘मी तुझ्या मुलाला वाचवीन’ असं म्हणाला तेव्हा! आपण माणसं ज्या ज्यावेळी ‘मी, माझं’ असं म्हणतो त्या त्या वेळी देव आपल्याला हसत असतो हे लक्षात ठेवायला हवं.’ ही गोष्ट सांगून दुसरा वाटसरू पहिल्याला म्हणाला, ‘कोणत्याही प्रश्नाचं मूळ नि एकच उत्तर हेच आहे. ‘सब भूमी गोपालकी!’ हे सत्य मानून जर आपण जगलो तर अखंड आनंदात, समाधानात राहू. नाही तर झगडा, संघर्ष, युद्ध ठरलेलं आहेच.’

पहिल्या वाटसरूला हे सारं पटलं नि तो म्हणाला, ‘अगदी बरोबर. देवानं सृष्टीच म्हणजे ही जमीन, पाणी, आकाश, वारा, सूर्यप्रकाश निर्माण केला नसता तर कोंडिबा काय किंवा धोंडिबा काय कोणतं शेत करणार होता नि कसलं पीक काढणार होता? म्हटलंय ते खरंच आहे. देवाजीने करूणा केली। शेते पिकुनि पिवळी झाली।।

Web Title: One asked, 'Grandfather, who owns this farm?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.