इंद्रियाते न कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 02:49 AM2019-08-05T02:49:02+5:302019-08-05T02:53:04+5:30
इंद्रियांच्या आहारी मानवाने जाऊ नये. इंद्रियांच्या कोडकौतुकात खरा आनंद नसतो.
- प्रा. शिवाजीराव भुकेले
कठोपनिषिदात एक सुंदर वचन आहे. शरीररूपी रथात आत्मा नावाचा रथी आरूढ झालेला आहे. बुद्धिरूपी सारथी आहे. मनाचे लगाम तिच्या हातात आहेत आणि नानाविध विषयांच्या वाटेने पंचज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये यांची घोडी उधळू लागलेली आहेत. या इंद्रियरूपी घोड्यांना चारा तर खाऊ घातलाच पाहिजे; पण एवढा चारा घालू नये की, चारा खाऊन घोडी माजायला लागतील अन् घोड्यांना एवढे उपाशी ठेवू नये की, चालता-चालताच ती मरून जातील. याचाच अर्थ असा, इंद्रिय पारायण भोगवाद जीवनातील सात्त्विक सुगंधाला नष्ट करतो अन् मग कस्तुरी, चंदन, कमल कुसुमांचा सात्त्विक सुगंध आवडण्यापेक्षा उंची-उंची मद्याचा दर्प तना-मनाला अधिक सुखावू लागतो अन् सुरू होतो स्वच्छंद भोगवादाचा नंगा-नाच. म्हणूनच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधाच्या अजस्र प्रवाहाबरोबर वाहवत जाणाऱ्या भोगलंपट माणसांना शुद्धीवर आणण्यासाठी संतांना इंद्रिय परायण माणसांची निंंदा करावी लागली. या पाठीमागे केवळ निंंदेचा भाव नव्हता, तर इंद्रिये शुद्धिकरणाचा भाव होता. कारण इंद्रियाचा समूह एवढा बलवान आहे की, विवेक, वैराग्य व ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारणाºया भल्या-भल्या विद्वानांची तो प्रथम शिकार करतो. म्हणून लक्षात असू द्यावे की, इंद्रियांच्या आहारी मानवाने जाऊ नये. इंद्रियांच्या कोडकौतुकात खरा आनंद नसतो. तो काही काळापुरता आनंद देतो. नंतर तो आपल्यालाच शिकार बनवतो. म्हणूनच हा आनंद आळवावरच्या पाण्यासारखा कुठे वितळून जाईल, याचा पत्तासुद्धा लागत नाही.
पाश्चिमात्य देशात भोग लालसेने बरबटलेल्या युवा पिढीवर योग्य ते संस्कार न झाल्यामुळे फक्त भोग लालसेने बरबटलेल्या स्वच्छंद समाज मनाची घातक निर्मिती झाली; पण कर्मभूमी व त्यागभूमी नावाजल्या गेलेल्या आपल्या भारतभूमीत हजारो वर्षे उदात्त जीवनमूल्यांचे संस्कार करणारे चालते कल्पतरू युगा-युगातून जन्माला आले, म्हणूनच तर पाश्चात्त्यांएवढी पोकळी आपल्या समाज जीवनात निर्माण झाली नाही. कारण शरीर व इंद्रियाचा समूह हे एक साधन आहे, ज्याचे वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात -
इंद्रियासी नेम नाहीं । मुखी राम म्हनोनि काई।
जेवीं मासीसवे अन्न । मुखी नेदी ते भोजन।
तुका म्हणे रागा संत शिवू नेदती अंगा।
इंद्रियाचा वारू स्वैर उधळून जीवनाचा रथ कोलमडून टाकत असेल, तर मुखाने केवळ राम! राम! म्हणून काहीच उपयोग नाही. म्हणून भागवत धर्मातील अनेक संतांनी इंद्रियांना ईश्वरोन्मुख केले व हात, पाय, कान, नाक, डोळे यांना संस्कारित केले; पण दुसºया बाजूला पराकोटीचे इंद्रिय दमनही केले नाही. मुला-माणसांना सोडून वैराग्याच्या गप्पाही संतांनी मारल्या नाहीत आणि मुला-माणसांच्या दोषात लिप्तही झाले नाहीत.
प्रपंचातील नानाविध रचनेचा सीमित भोग घेऊन वेळ आल्यावर त्यांचा जाणीवपूर्वक त्याग केला, म्हणूनच ते समाज जीवनास संस्कारित करू शकले. आज घड्याळाचे काटे थोडेसे उलटे फिरू लागले आहेत. इंद्रियांना कोंडून ठेवणारे तथाकथित साधू-संन्याशी नको तेवढ्या प्रमाणात त्यांना कोंडीत आहेत. त्यामुळे ते बंड करून उठत आहेत. नाहीतर कृश होऊन देहालाच नष्ट करीत आहेत, तर दुसºया बाजूला काही मंडळी एवढी भोगलंपट होत आहेत की, प्राणिमात्रांनासुद्धा त्यांची लाज वाटावी. या दोन्हीचा सुवर्णमध्य साधताना तुकोबाराय म्हणाले होते -
नरदेहा ऐंसे गोमटे । शोधिता त्रैलोकी न भेटे।
नरदेहा ऐंसे ओखटे । अत्यंत खोटे आण नाही।