मत्सराचा उगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 05:08 AM2019-07-19T05:08:56+5:302019-07-19T05:09:00+5:30

मत्सर हा एक मानसिक आजार असू शकतो. चंचल वृत्ती, अपयशी वृत्ती, द्वेष करणारी वृत्ती मनामध्ये शिरली की आपल्यापेक्षा उत्तम व्यक्तीचा झालेला विकास त्याला त्रासदायक वाटतो.

The origin of the envy | मत्सराचा उगम

मत्सराचा उगम

Next

- विजयराज बोधनकर
मत्सर हा एक मानसिक आजार असू शकतो. चंचल वृत्ती, अपयशी वृत्ती, द्वेष करणारी वृत्ती मनामध्ये शिरली की आपल्यापेक्षा उत्तम व्यक्तीचा झालेला विकास त्याला त्रासदायक वाटतो. जे मला जमलं नाही हे याला जमलंच कसं? हा अडचणीचा प्रश्न मनात निर्माण करून माणूस स्वत:च स्वत:ला त्रास देत सुटतो. मत्सरी माणसांच्या चेहऱ्यावर कधीही तेज न दिसण्याचं कारण म्हणजे त्याच्या विचारक्षमतेशी तुटलेला संबंध... सात्त्विक विचार हा मानवाचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास कारणीभूत ठरतो. त्याउलट सतत नकारार्थी विचार करणारी माणसं आरोग्याच्या बाबतीत दुर्दैवी ठरतात. भ्रष्ट विचारसरणीमुळे ऊर्जेचा अयोग्य वापर होतो आणि शरीर थकत राहतं, याची शरीराला हळूहळू सवय लागते. त्यातून शारीरिक आजार डोकं काढू पाहतात. हजारो वर्षांपासून संत-महात्म्यांनी त्यामुळेच देवाची गाठ मारून दिली. देवाच्या भयाने तरी माणसं सुदृढ आणि उत्क्रांती घडविचारी विचारांची सवय लावून घेतील. पण त्या देवानेसुद्धा मानवी वृत्तीपुढे हात टेकले.
देवाला बाजारू रूप कुणी आणलं? देवाला मानवाकडून काहीही नको. त्याला हवा आहे मानवाच्या उत्तम जगण्याचा सुंदर मार्ग. मग देवळात जाऊनही हजारो माणसं दोषग्रस्त का आहेत? माणसाने उत्तम कसं जगावं हे फक्त एकच विद्यालय शिकवू शकतं ते म्हणजे स्वत:च्या मनाचं विद्यालय.
पूजा-अर्चा केल्यामुळे दिवसाची सुरुवात निर्मळ कार्याने होईल आणि माणूस आपल्या व्यवहारी जीवनात देवासारखा जगण्याचा प्रयत्न करेल. केवळ हा विचार पूजेअर्चेच्या मागे असण्याचे कारण आहे. मंदिर याचा अर्थ काय तर मनाला धीर देणारं मन.. मन धीर देणारं असलं की षड्रिपूच्या आक्रमणापासून माणूस आपला बचाव करू शकतो. उत्कृष्ट कर्माशिवाय देवसुद्धा आशीर्वाद देऊ शकत नाही.

Web Title: The origin of the envy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.