आर्थिक श्रीमंती म्हणजे सर्वस्व का.?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 09:55 PM2019-12-07T21:55:38+5:302019-12-07T21:57:16+5:30
नाती-मैत्री व धन यांचा सुरेख संगम साधा..
डॉ. दत्ता कोहिनकर
पुणे : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या कोचिंग क्लासच्या निरोप समारंभाला मी व कलेक्टर मारूतराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो. तणावमुक्ती या विषयावरचं माझं मार्गदर्शन संपलं व मारूतराव बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, मित्रांनो ग्रेज्युएशन झाल्यावर लगेचच आई-बापानं माझं लग्न लावून दिलं. मी एमपीएससीच्या तीनदा परीक्षा दिल्या. त्यात अपयश आलं. मग मी युपीएससीच्या दोनदा परीक्षा दिल्या. त्यातही नापासच झालो. घरातील लोकं, आता बसं कर तुझे नाटक - गुपचूप मिळेल ती नोकरी कर किंवा शेती कर म्हणून हिणवू लागली. दोस्तांमध्ये चर्चा, गावात अपयशाची दवंडी, सगळीकडे लोकं टर्र् उडवू लागली. चर्चेचा विषय नातेवाईकांमध्ये रंगू लागला. बायको पण धुसफूस करू लागली, आदळआपट करून स्वतःच्या नशिबाला वारंवार दोष देवून माझी इज्जत काढू लागली. मित्रांनो दैव बलवत्तर म्हणून यु.पी.एस.सी.च्या तिसर्या वेळेस बसलेल्या परिक्षेत पास झालो. सगळया प्रक्रिया पूर्ण केल्या. कलेक्टर म्हणून जिल्हयावर माझी नेमणूक झाली. सरकारने बंगला,दारात दिव्याची गाडी दिली. मोठी केबीन, पी.ए., हाताखाली माणसे. त्या दिवसापासून माझी बायको पण माझ्याशी खूप चांगली वागायला लागली आहे. मला इज्जत दयायला लागली आहे.
भाषणाचा शेवट करताना मारूतराव म्हणाले, मित्रांनो जे ध्येय निवडताल त्यात पूर्णतः स्वतःला झोकून दया, कितीही वेळा अपयश आलं तरी खचून जाऊ नका. लोकांच्या टिकेकडे दुर्लक्ष करा. रात्रंदिवस बसता, खातापिता त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा व विजयश्री खेचून आणा. तुम्ही जर स्वतःला सिध्द नाही केलं तर लक्षात ठेवा जिला तुम्ही अर्धांगीनी म्हणता ती बायकोपण तुम्हाला विचारणार नाही. म्हणून स्वतःला सिध्द करा.
मित्रांनो भरपूर पैसा पण कमवा . तो कमावताना त्याला नैतिक मुल्यांची जोड द्या.
कमावत्या व श्रीमंत माणसाला घरात व समाजात किंमत असते.पैशामुळे जीवनातल्या बऱ्याचशा अडचणी सोडवता येतात . फक्त पैसा कमावताना आपले आरोग्य , नातीगोती , भावना यांचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करा .पैशांनी आपण घर घेऊ शकतो. पण घराला घरपण आणू शकत नाही. पैशांनी औषध आणू शकतो, पण आपण आपले वय वाढवू शकत नाही. पैशांनी घडयाळ मिळते, पण गेलेली वेळ मिळवू शकत नाही. पैशांनी मोठे पद मिळते पण मनापासूनचा आदर मिळवू शकत नाही. पैशांनी आपण मखमली गादी घेऊ शकतो, पण शांत झोप नाही. पैशांनी पुस्तके आपण घेऊ शकतो, पण विदया नाही. पैशांनी रक्त पण विकत मिळते पण कोमजून गेलेले जीवन नाही. म्हणून पैसा अवश्य कमवा पण चांगल्या मार्गाने. आणि सत्मार्गाने कमावलेल्या पैशाच्या 10 % रक्कम ही दानधर्मासाठी खर्च करा व नाती-मैत्री व धन यांचा सुरेख संगम साधा व यांचा समन्वय साधताना लक्ष्मीकडे देखील दुर्लक्ष करू नका. नाहीतर तुम्ही इतरांपासूनही दुर्लक्षित व्हाल...