विकारावर मात करून आत्मज्ञानातूनच लाभेल शांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 04:57 PM2019-10-19T16:57:32+5:302019-10-19T16:59:38+5:30
आत्मज्ञानानेच परम शांतीपर्यंत पोहोचता येते..!
- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
आजच्या युगात आपण क्रांतीची भाषा सतत बोलत असतो पण शांतीतून देखील क्रांती निर्माण होते. संतांनी शांतीतून क्रांती केली. खलाची दुष्ट प्रवृत्ती बदलण्यासाठी कुठल्याही संतांनी हातात शस्त्र घेतले नाही. शांती याच जीवन मूल्याचा विचार त्यांनी आचारसिद्ध केला. आज सुधारलेल्या जगात बिघडलेला माणूस बघतांना या दैवी संपत्तीचा गुण आचरणात आणण्याची नितांत गरज आहे. आपल्याला सुख हवे ना..? तर मग चित्ताची शांती ढळता कामा नये. कारण
अशांतस्य कुत: सुखम्.!
अशांत माणसाला सुख लाभत नाही. आपल्या मनांत काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार, हिंसा, भीती इ. विकार निर्माण झाले की माणूस अशांत होतो. या सर्व विकारांचा त्याग करता आला की शांती आपोआप प्राप्त होते.
त्यागात् शांती निरंतरम.!
भोगात मिळणारा आनंद क्षणिक असतो. त्यागातून मिळणारा आनंद शाश्वत असतो म्हणून संयमाने आणि विवेकाने आपल्या मनाला हळूहळू शांतीच्या मार्गावर आणता येते. संत विनोबा भावे म्हणाले -
राग द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये
स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता
प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे
चित्ताची शांती ढळू न देता परमेश्वर चरणी अखंड प्रेम ठेवल्याने हे विकार बाधत नाहीत. नसत्या विकारांच्या आहारी गेल्यावर जीवाची केवढी दुर्दशा होते याचे वर्णन माऊली करतात -
तरी हे कामु क्रोधु पाही
जया कृपेची साठवण नाही
हे कृतांताच्या ठायी
मानिजे ती साध्वी शांती नागविली
मग माया मांगिन श्रृंगारली,
तिये करवी विटाळविली साधु वृंदे
इही संतोष वन खांडीले
धैर्य दुर्ग पाडिले
आनंद रोप सांडिले उघडोनिया
मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या दैवी संपत्तीवरच त्याची उंची ठरत असते. आपण समाजात कसे वागतो त्यावरच समाजात आपले स्थान ठरत असते. म्हणून जीवनात शांती तत्वांचा अंगिकार करावा. तथागत गौतम बुद्धांनी आयुष्यभर शांतीचा संदेश दिला. अशी शांती येण्याकरता आत्मज्ञान प्राप्त करावे लागेल. गीता माऊली म्हणते -
ज्ञानं लब्ध्वा परां शांती..!
आत्मज्ञानानेच परम शांतीपर्यंत पोहोचता येते..!
(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 9421344960 )