पंढरीसी जा रे आल्यानो संसारा। दिनाचा सोयरा पांडुरंग॥’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 08:49 PM2019-06-28T20:49:20+5:302019-06-28T20:49:45+5:30
आषाढी वारी सोहळा
आषाढी वारी सोहळा हा संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुरू केलेला असला तरी माऊलींना ज्या भाविकांची चिंता, तो वारकरी भाविक ऊन, वारा पाऊस, सोयीसुविधा यांची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते परब्रह्म पांडुरंगाला. पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे पायी चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाव (कर्नाटक) येथून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की, या अश्वावर कोणीही स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शुद्ध एकादशीला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि ज्येष्ठ वद्य सप्तमीला आळंदीत प्रवेश करतो.
आळंदीला इंद्रायणी नदीजवळ अश्व आले की, श्रीमंत शितोळे सरकारांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांच्या स्वागतासाठी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजत-गाजत अश्वांना उत्साहात मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात. अश्वाला आळंदीस पायी आणण्यामागे केवळ परंपराच नाही तर एक श्रद्धाही जोडलेली आहे की, हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदीला येताना ज्या-ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे श्रद्धेने दर्शन घेतात. कारण त्याची केलेली पूजा व दर्शन श्री संत माऊलींकडे आणि पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचते, अशी दृढ श्रद्धा असते. संपूर्ण वारीतील सकाळच्या वेळेस दोनच ठिकाणी आरती होते. थोरल्या पादुका (चहोर्ली) आणि पुणे येथील शिंदे छत्रीपाशी.
श्रीमंत शिंदे सरकार यांनी त्या काळात माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी हे गाव इनाम दिले होते. श्री गुरू हैबतबाबा हे शिंदे सरकार यांच्या पदरी सरदार होते. माऊलींच्या मंदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप, परिसर हे शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री येथे सकाळची आरती होते. वाखरी येथून पंढरीस पालखी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरवून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात. संपूर्ण पालखी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही आणि फक्त एकच कीर्तन सर्वांनी मिळून केले जाते. या कीर्तनाला प्रत्येक दिंडीतील प्रमुख व वारकरी उपस्थित राहतात. परंपरा सांभाळून कीर्तन करावे लागते. त्यामुळे या कीर्तनाचा मान आणि आनंद हा आगळावेगळा आहे. ‘कीर्तन चांग कीर्तन चांग।
होय अंग हरी रूप॥’
या कीर्तनसेवा श्री हैबतबाबांपासून परंपरेने चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार पाडत आहेत. कीर्तन हे समाज प्रबोधनाचे श्रेष्ठ माध्यम आहे. समाज मनावर कीर्तनाचा प्रभावही मोठा असल्याने कीर्तनकारांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये सेवाभावाचे व कलात्मक असे दोन प्रकार पाहावयास मिळू लागले आहेत. पण संप्रदायातील परंपरा विचारात घेऊन सेवाभावाचे कीर्तन स्वीकारून वारीमध्ये परंपरा सुरू केली.
- सुधाकर इंगळे महाराज