महाराष्ट्राचा लोकदेव; पंढरपूरचा विठोबा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 11:27 AM2019-07-22T11:27:29+5:302019-07-22T11:28:26+5:30
पंढरपूर हे महाराष्ट्राचे धर्महृदय आहे आणि तेथे नांदणारा श्री विठ्ठल हा मराठी संतांचा प्रियतम देव आहे.
डॉ. रामचंद्र देखणे - (प्रसिद्ध प्रवचन, कीर्तनकार)
सकल संतांनी आपला श्रद्धाभाव विठ्ठलाच्या ठायी समर्पित केला आहे. महाराष्ट्राचा लोकदेव पंढरपूरचा विठोबा हा आहे. धर्म, पंथ, संप्रदायाच्या चौकटी बाजूला सारून अद्वैताच्या भूमिकेवरून या लोकदेवतेला स्वीकारले आणि आपल्या अभंगवाणीतून शब्दवैभवाने तिला सारस्वतामध्ये मिरवले. संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, ‘आनंद, अद्वय, नित्य निरामय । जे का निजध्येय योगियांचे । ।’’ आनंदरूप, नित्य, निरुपाधिक, शुद्ध आणि योगीही ज्यांचे ध्यान करतात तेच सावळे सुंदर रूप भीमातीरी विठ्ठलरूपात उभे आहे आणि हेच विठ्ठलाचे श्रुतिसिद्ध लक्षण आहे. पंढरीचा विठ्ठल हे साक्षात परब्रह्म.
ब्रह्म म्हणजे बृहत्तम होणे. व्यापक होणे. ब्रह्म म्हणजेच विश्वकल्याणाचा विचार आणि आचार, जशी ज्ञानभक्तीच्या समचरणावर ही सावळी विठ्ठलमूर्ती उभी आहे तसेच सविचार आणि सआचाराच्या समचरणावर कल्याणाचे मूर्तिमंत रूप पंढरपुरी साकारले आहे. साने गुरुजी म्हणायचे, ‘पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्रीय जनसंघटनेचा मुका अध्यक्ष. येथे सर्वांनी यायचे, भेटायचे, आपले दु:ख देवाला सांगायचे.’
‘‘जाऊ देवाचिया गावा ।
देव देईल विसावा देवा सांगू सुखदु:ख ।
देव निवारील भूक घालू देवासीच भार ।’’ देव सुखाचा सागर आपली दु:खे दुसऱ्याजवळ उगाळीत बसण्यापेक्षा विठ्ठलाच्या रूपात जी विश्वशक्ती आहे तिच्याजवळ दु:ख सांगावे आणि सुखरूप व्हावे. दु:ख विसरून हसरे व्हावे यात केवढी प्रासादिक भावना आहे. पंढरपूरचे वाळवंट म्हणजे भक्तप्रधान समतेचे प्रभावी व्यासपीठ आणि पांडुरंग म्हणजे त्या व्यासपीठाचा अध्यक्ष. ह्या अध्यक्षाला कसे पाहावे? द्रष्टा, दृश्य व दर्शन या त्रिपुटीरहित पाहावे म्हणजे त्यात आत्मतत्त्व दिसू लागेल, ते आत्मतत्त्व विठ्ठलाच्या रूपात पाहायला मिळते. मन तृप्त होते आणि वृत्ती त्याच्या ठायी स्थिरावते, पंढरपूर हे महाराष्ट्राचे धर्महृदय आहे आणि तेथे नांदणारा श्री विठ्ठल हा मराठी संतांचा प्रियतम देव आहे. ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी म्हटले आहे की, ज्या मराठी संतांनी पांडुरंगाच्या गुणरूपाचे गायन उत्कट शब्दांत केले आहे, त्यांच्या भावदृष्टीत त्याच्या रूपाचा ‘कोटी चंद्रप्रकाश’ फाकलेला आहे. निळ्या नभाला लाजविणारे त्याचे गूढ निळेपण त्यांच्या दृष्टीचे लेणे बनले आहे.