तुका झालासे कळस, भजन करा सावकाश...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 07:25 PM2019-07-19T19:25:43+5:302019-07-19T19:26:31+5:30
जीवनाला आनंदाने सामोरे जाण्याची दीक्षा ही वारी देते.
हभप. चंद्रकांत महाराज वांजळे
वारी हा एक आनंद सोहळा आहे. निसर्गातील अनुकूल प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत देत हा सोहळा मार्गस्थ होत असतो. आनंदाला सामोरे जाणे आणि आनंद घेणारा हा सोहळा आहे. कोणत्याही प्रकारचा शीण वाटत नाही़ वारकरी नामघोष करीत वारीची वाट चालत असतात. जीवनाला आनंदाने सामोरे जाण्याची दीक्षा ही वारी देते. यात लोकशिक्षण आहे. कुणी म्हणेन, महिनाभराची वारी झाली उर्वरित दिवसांचे काय? घड्याळाला चावी दिली की दोन दिवस घड्याळ चालते. त्यानुसार वारी केली की वर्षभर ऊर्जा देते. मानवी विचारांची खूप चांगल्या स्वरूपांची उधळण होत असते. ऊर्जा वाढविणारी ही वारी आहे. या संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांनी घातला आहे. अर्थात तो ज्ञानाचा आहे. संतकृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया.., हे कार्य काही एक दोन शतकात झालेले नाही. तर एकाने पाया रचावा याप्रमाणे ज्ञानदेव महाराजांनी पाया रचला. नामा तयाचा किंकर, त्यानें केला हा विस्तार,नामदेवरायांनी या मंदिराच्या भिंती बांधल्या. प्रसार केला.जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत., तो शांतीचा खांब आहे. आणि तुका झालासे कळस, भजन करा सावकाश..असे भागवत धर्माच्या मंदिराचे वर्णन संत बहिणाबाई यांनी केले आहे. परिपूर्णता तुकोबारायांनी दिली. भजन सावकाश करा, म्हणजे खूप वेळ घालविणे असा नाही तर, सावकाश. अत्यंत व्यापक भाव ठेवून हे विश्वची माझे घरे...या भावनेने भक्ती करा, असा आहे. जन-जनार्दन ही एकनाथमहाराजांनी केलेली भजनाची व्याख्या आहे. तर देवही बोलतात म्हणून माझे भजना, उचित तोची अर्जुना, गगन जैसे अंलिगणा, गगणाचिया...ह्ण गगन होण्याकरिता दुसरे गगन असावे लागते. माझे भजन करण्यासाठी मीच व्हावे लागते. मीच होऊनी पांडवा, करती सेवा.. अशी सेवा वारीची असते. म्हणून नामदेवमहाराज अशी वारी करणाऱ्यांस पंढरीच्या वाटेवर पाऊल पडण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. असे एका चरणात म्हणतात. खरे तर ही अतिशयोक्ती वाटेलही कदाचित. संत वाङ्मयाचा आपण जर थोडा आधार घेतला. तर ह्यह्यवाराणसी एक मास, गोंदावरी एक दिवस, पंढरी पाऊन परियसा ऐसा महिमा नामाचा.... याचाच अर्थ वाराणसी-गोदावरी आणि पंढरीच्या वाटेवरील प्रत्येक पावलातून मिळणारे पुण्य एकच आहे.
चंद्रकांत महाराज वांजळे