आवडीने भावे हरिनाम घेसी..!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 10:56 AM2020-06-22T10:56:29+5:302020-06-22T11:02:50+5:30
जिथे यंदा खुद्द माऊली पंढरीची वाटचाल सोडून आपल्या आजोळी मुक्कामी आहे.. तिथे तुम्ही आम्ही कोण..?
बाबा महाराज सातारकर, प्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार..
महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वैभव म्हणजेच पंढरीची वारी होय. भागवत धर्मातील वारकरी संप्रदायातील प्रमुख आचारधर्म म्हणून पंढरीची वारी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना ७५० वर्षे तर तुकोबांना ४५० वर्षे झाली आहेत. वारी ही संत ज्ञानदेवपूर्वकालीन आहे. आमच्या कुटुंबात सुमारे सव्वाशे वर्षे वारीची परंपरा आहे.
माझ्या जन्मापासून आजपर्यंत कधीही वारी चुकली नाही. माऊलींनी न चुकता वारी घडविली आहे. यंदा कोरोनाच्या महामारीमुळे आषाढी पायी वारी घडू शकणार नाही, यापेक्षा वारकऱ्यांना दुसरे दु:ख काय असणार?
देवाने मोठ्या कौतुकाने सांगितले आहे,
‘‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज,
सांगतसे गुज पांडुरंग...’’ देवाने जर सांगितले की मला विसरू नका मज आणि देवच जर वारी चुकवतो तर आम्ही काय करायचे? खरे तर आपण आणि आम्ही सगळे माऊलींच्या मागे आहोत. माऊली जिथे आहेत. तिथे आम्ही आहोत, माऊली सध्या आळंदीत आजोळ घरी आहेत. आम्हीही आपापल्या घरी बसलो आहोत. जेव्हा पंढरपूरचा मुक्काम येइल.
अखिल मानव जातींवर मोठे संकट आले आहे. त्यामुळे पायी वारी होणार नाही. मात्र, आम्ही रोज घरी वाचिक आणि मानसिक वारी अनुभवत आहोत. घरात सर्वजण एकत्र येऊन भजन, कीर्तन त्याचबरोबर वाटचालीतील मुक्कामाची अभंग म्हणत आहोत. तसेच वारीच्या निमित्ताने तासभर निरूपण करत आहोत. माझ्या मते वारकºयांना घरी बसूनही वारी अनुभवता येते.
पालखी सोहळ्यापूर्वी अनेकांनी मला फोन केले आणि आम्हाला वारी करायची आहे, अशी इच्छा, अपेक्षा व्यक्त केली. त्या वेळेस मी त्यांना सांगितलं की महामारीमुळे आपल्याला वारी करता येत नाही. कोणीही सरकारी नियमांचे उल्लंघन करू नये, आपण प्रत्येकाने घरी बसूनच वारी करावी. माऊली जर वाटचाल सोडून आळंदीत घरी थांबले असेल, तर तुम्ही आम्ही कोण? वारी सोहळ्यात आपण सगळे माऊलींच्या मागे असतो. त्यांच्या मागे जाणे हे आपले कर्तव्य आहे.
खरे तर विठ्ठरायाची पंढरीची वारी चुकू नये? असं सर्वांनाच वाटतं, पण नाईलाज आहे. संत वचनाप्रमाणे,
‘‘हीच माझी आस,
जन्मोजन्मी तुझा दास,
पंढरीचा वारकरी,
वारी चुकू न दे हरी’’ अशी सर्वांची आस आणि भावना आहे.