पंढरपुरा नेईन गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 04:21 PM2019-07-06T16:21:02+5:302019-07-06T16:21:08+5:30
वारकरी होऊन पंढरीला जाण्यात जो आनंद आहे तो तसे जाण्यात नाही. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज सांगतात,
वारकरी होऊन पंढरीला जाण्यात जो आनंद आहे तो तसे जाण्यात नाही. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज सांगतात, ‘होय होय वारकरी’ ‘पाहे पाहे रे पंढरी १ ‘काय करावी साधने, फळ अवघेची येणे २ ‘अभिमान नुरे’ ‘कोड अवघेची पुरे’ ३ ‘तुका म्हणे डोळा’ ‘विठो बैसला सावळा ४ हा तुकाराम महाराजांचा मोलाचा उपदेश आहे. वारी म्हटले कि एक वेगळाच आनंद सोहळा असतो वारी या शब्दाचा अर्थ होतो. येरझरा करणे इतरही काही देवांच्या त्यांचे भक्त वारी करीत असतात. अगदी खंडोबाची वारी असते, कुलदैवताची सुद्धा वारी असते. हल्ली तर साईबाबाची सुद्धा वारी आणि पालखी निघत असते. अनंत काळापासून वारी म्हटले कि पंढरपूरचीच असे रूढ झाले आहे. पांडुरंग आणि वारी एक समीकरण आहे. पाण्यात मासा झोप घेतो कसा ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ याप्रमाणे असे सहज पंढरपूरला जाण्यात जेवढा आनंद नाही तेवढा आनंद वारकरी होऊन जाण्यात आहे. एखादी सासुरवाशीण जेव्हा आपल्या माहेरी जाते तेव्हा तिला जो आनंद होतो तेवढा आनंद नव्हे त्यापेक्षा जास्त आनंद वारकरी होऊन जाण्यात आहे. संतांनी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी’ ‘बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. पुंडलीक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण. अर्थात वारकरी होणे म्हणजे एक व्रत आहे. एक साधना आहे. पतिव्रता जशी आपल्या पतीशी एकनिष्ठ असते तसे वारकरी विठ्ठलाशिवाय दुस-या दैवताची भक्ती करीत नाही.
एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. या न्यायाने आचरण करीत असतो. वारकरी होण्याकरिता काही महत्वाच्या बाबी असतात. गळ्यात १०८ मण्यांची तुलसीची माळ धारण करावी लागते. कपाळाला ऊर्ध्व पुंड्र, गोपीचंदन व बुक्का लावावा लागतो. पवित्र तुलसीची माळ वारकरी संप्रदायातील एखाद्या संत पदावर पोहचलेल्या, शाब्दे परेच निष्णातम, अशा महात्म्याला शरण जावून ती माळ धारण करावी लागते. जेव्हा माळ गळ्यात घालतो तेव्हा तो महात्मा त्या वारक-याला सांगतो कि, ‘येथून पुढे खोटे बोलायचे नाही, गळ्यातून माळ काढायची नाही. हि माळ आता मरेपर्यंत गळ्यातच राहणार, परस्त्री मातेसमान मानावी, चोरी, लबाडी करायची नाही. आषाढी, कार्तिकी एकादशी पंढरीची वारी करायची. देहू, आळंदी, पैठण व इतर संतांच्या स्थानाकडे आवर्जून जायचे असा थोडक्यात वारकरी संप्रदायाचा आचार धर्म असतो.
भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागवाताश्रम, चिचोंडी(पाटील)ता. नगर
मो. ९४२२२२०६०३