परमात्मा झाला बहुरूपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:34 AM2017-12-14T02:34:43+5:302017-12-14T02:35:06+5:30
भागवत हा भक्तिसंप्रदायाचा आत्मा आहे. भागवताने लीलासंकीर्तन घडवून भक्तीला आविष्काराच्या पातळीवर आणले आहे. हजारो श्लोकांचे महाभारत, पुराण रचूनही व्यासांच्या मनाला शांती लाभेना.
- डॉ. रामचंद्र देखणे
भागवत हा भक्तिसंप्रदायाचा आत्मा आहे. भागवताने लीलासंकीर्तन घडवून भक्तीला आविष्काराच्या पातळीवर आणले आहे. हजारो श्लोकांचे महाभारत, पुराण रचूनही व्यासांच्या मनाला शांती लाभेना. केवळ शास्त्रार्थाचा आणि तत्त्वचिंतनाचा उहापोह केला तरी भगवंताचे भावपूर्ण गुणगायन झाल्याखेरीज समाधान मिळणार नाही. हे नारदांंनी सांगितले आणि व्यासांनी भक्तिरसप्रधान, लालित्यपूर्ण भाषेतील रसाळ लीलादर्शी भागवत लिहिले. त्यात भगवंताच्या लीला असल्यामुळे त्याला आपोआपच नाट्यमयता लाभली. तेच भागवत संकीर्तनातून अधिक लोकाभिमुख झाले आणि त्याच लीला दशावतार, भारुड, गौळणी, नौटंकी, शैव नाटक, भरतनाट्यम्, वैष्णव नाटक, कीर्तनिया अशी रूपे घेऊन अविष्कृत होऊ लागले. त्यातूनच पुढे प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या लोककला जन्माला आल्या.
मराठी लोककलेचे हे स्वरूप पाहता किमान हजार ते बाराशे वर्षांची परंपरा या लोककलांना लाभली आहे. मूळ परंपरेचा बाज तसाच ठेवत कालमानाप्रमाणे त्यात बदल करीत या लोककलावंतांनी हजारो वर्षे लोकरंजन घडविले आहे. लोकधर्म जागविला आहे आणि प्रबोधनही केले आहे.
मध्ययुगीन भक्त कवींनी भक्तीच्या अभिव्यक्तीसाठी आणि लोककलावंतांनी लोकदेवतेचे भक्तिरूप मांडण्यासाठी लोकछंदांचा, लोकगीतांचा, लोककथांचा, लोकपुराणांचा आणि लोकधारणांचा स्वीकार करून प्रयोगात्मक लोककलांचा प्रभावी वापर करून कथन-नाट्याची निर्मिती केली. अशा कथननाट्याचे मराठी भूमीतील अस्सल मराठमोळे रूप म्हणजे कीर्तनाचे आख्यान; हेच आख्यान जागरण-गोंधळीतील विधिनाट्याच्या रूपात या मातीच्या लोकरंगभूमीत रुजले.
उत्तर पेशवाईतल्या तमाशात वगनाट्य नव्हते. सन १८६५ च्या सुमारास शाहीर ‘उमा-बाबू’ या मातंग समाजातील गुराखी पोराने विष्णुदास भाव्यांचे सांगलीतील नाटक पाहून असे कथानक तमाशात का नसावे, असा विचार करून ‘मोहना-बटाव’ हा पहिला वग लिहिला आणि त्यानंतर तमाशात ‘वग’ सादर होऊ लागला. पुढे तमाशाचे रूपांतर लोकनाट्यात झाले.
महाराष्ट्राच्या भूमीत विविध ठिकाणी या लोककला उदयास आल्या आणि महाराष्ट्रभर सादर होऊ लागल्या.