कण, क्षण, प्राण नि पैसा!, नव्या वर्षासाठी संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 07:48 PM2019-12-26T19:48:32+5:302019-12-26T19:48:51+5:30

आज इतकी वर्षं गेल्यावर तर हा संदेश अधिकच कालसंगत नि महत्त्वाचा झालाय.

Particles, moments, souls and money !, Resolutions for the New Year | कण, क्षण, प्राण नि पैसा!, नव्या वर्षासाठी संकल्प

कण, क्षण, प्राण नि पैसा!, नव्या वर्षासाठी संकल्प

Next

-  रमेश सप्रे

वर्गात गुरूजी शिकवत होते. संस्कृतमधली अर्थपूर्ण नि संदेशयुक्त सुभाषितं हा विषय चालू होता. विचारासाठी सुभाषित घेतलं होतं-
क्षणश: कणशश्र्वैव विद्यामर्थांच साधयेत।
क्षणो नष्टे कुतो विद्या, कणो नष्टे कुतो धनम्।।
बापट गुरुजींचा शिकवण्यात हातखंडा होता. त्यातही संस्कृत म्हणजे त्यांचा जीव की प्राण! डाव्या हाताचा अंगठा खूप वाकवत ते जे शिकवायचे किंवा सांगायचे ते मुलांच्या मनात वज्रलेप होऊन राहायचं. आम्ही एकलव्याच्या एकाग्रतेने शिकायचो; पण गुरुजी अंगठा एवढा का वाकवतात हे मात्र आम्हाला कधीही समजलं नाही. ती त्यांची लकबही असू शकेल असो.
सुभाषिताचा अर्थ सरळ मनामेंदूत घुसणारा होता. ज्याला ज्ञान मिळवायचं त्यानं एक क्षणही वाया घालवता कामा नये आणि ज्यांना धनसंचय करायचाय त्यानं एक कणही वाया घालवू नये. काळाचा नि साधन सामग्रीचा अतिशय विचारपूर्वक उपयोग करण्याचा संदेश ते सुभाषित आमच्या मनावर कोरून गेलं.
आज इतकी वर्षं गेल्यावर तर हा संदेश अधिकच कालसंगत नि महत्त्वाचा झालाय.

काही दृष्यं पाहूया..
* घरातील तसेच सार्वजनिक ठिकाणचे गळणारे नळ
* पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून गाडीच्या टाकीतून बाहेर काढलेल्या पंपातून सांडणारे पेट्रोलचे थेंब.
* फुलके भाजत असताना दोन फुलक्यांच्या मध्ये चालू असलेला नि वाया जाणारा स्वयंपाकघरातील गॅस
* टराटर कोरे कागद फाडून त्याच्या होडय़ा, विमानं, चक्रं बनवणारी मुलं
* तीन शिट्टय़ांनंतरही होत राहाणा-या कुकरच्या शिट्टय़ा.
* ताटात टाकलेलं तसंच उकीरडय़ावर फेकलेलं अन्न
अशा शेकडो दैनंदिन जीवनातील गोष्टी आपल्या लक्षात येतील. अशा कणकण नष्ट होणा-या नव्हे वाया जाणा-या गोष्टी आपल्या देशाला श्रीमंत कशा बनवतील?

दुसरं म्हणजे क्षणाचं महत्त्व :
* सेकंदाचं महत्त्व एक शतांश सेकंदानं ऑलिपिंक पदक मिळवणं चुकलेल्या पी. टी. उषाला कळलं.
* मिनिटा मिनिटाचं महत्त्व महत्त्वाची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना कळतं.
* तासाचं महत्त्व ट्राफीक जॅममध्ये अडकून इंटरव्ह्यू चुकून संधी गमावलेल्या व्यक्तीला समजतं.
* सप्ताह महिन्यांचं महत्त्व अभ्यास करून परीक्षेची पूर्वतयारी करणा-याला कळतं
एक कवी म्हणतो ना.. घटिका गेली, पळे गेली, तास वाजे घणाणा
आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणा ना? (किंवा काम का रे करा ना?)

प्राणाचं म्हणाल तर तो गेल्याचं आपल्या लक्षातच येत नाही. बाजूला ठेवलेला कापूर जसा काही काळानंतर उडून जातो तशी वर्षानुवर्षे उडून चाललीयत. एखाद्यावेळी वाढदिवसापूर्वी किंवा नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला स्वत:च्या भावी काळाबद्दल विचार अनेकांच्या मनात येतो; पण अनेक चांगल्या विचारांप्रमाणे आपला प्राणही क्षणभरच टिकतो. गेलेला प्राण तर काहीही म्हणजे अगदी काहीही केलं तर परत येत नाही हे सत्य आहे. म्हणून शेवटचा प्राण जातानाच प्राणाचा विचार करणं वेडेपणाचं ठरतं. गीतेत तर भगवंत सांगून राहिलेयत ‘मच्चिता मद्गतप्राणा बोधयन्त: परस्परम्।’ याचा अर्थ प्रत्येक जातोय जाणारच आहे ही जर वस्तुस्थिती आहे तर आपल्या अनुभवांची परस्पर देवाण घेवाण करून एकमेकाचं शिक्षण करत राहिलं पाहिजे. दुस:याला संपन्न समृद्ध केलं पाहिजे. अशा प्राण सांभाळणा-या, प्रत्येक प्राणाचं चीज करणा-या व्यक्तीला जीवनात समाधान आनंद मिळालाच पाहिजे.

शेवटी पैसा. एखाद्या कंजूस शेटजीसारखं ‘चमडी दूँगा, लेकीन दमडी नही दूँगा’ म्हणणा-या लोकांकडे कितीही पैसा साठला तरी लोक त्यांना धनवान, श्रीमंत, लक्ष्मीपुत्र म्हणून मान देत नाहीत तर पैसेवाला म्हणतात. पैसेवाल्याला समाजात मिळणारा मान हा त्याच्या पैशासाठी असतो. प्रत्यक्षात त्याचा सन्मान तेव्हाच केला जातो जेव्हा तो आपला पैसा दानधर्मासाठी इतरांच्या कल्याणासाठी खर्च करतो.
‘सर्वे गुणा: कांचनं आश्रयान्ते’ म्हणजे सोन्यात (पैशात) सर्व गुणांचा समावेश होतो. हे मर्यादित अर्थानंच खरं आहे. कारण लोक एखाद्या धनवंताची स्तुती करतात, कीर्ती गातात ही त्याच्या गुणांसाठी नसते तर तो त्याच्यापाशी असलेल्या सोन्याचा महिमा असतो.
समर्थ रामदास म्हणतात ‘प्रपंची पाहिजे सुवर्ण’ म्हणजे उदरनिर्वाहासाठी, प्रपंचाच्या गरजा भागवण्यासाठी पैसा हवा; पण या गरजा भागल्यानंतर काय? समर्थाचं सांगणं आहे ‘परमार्थी पंचीकरण’ म्हणजे अध्यात्म चिंतन, स्वत:चा, जग-जगत्-जगदीश यांच्यातील संबंधाचं त्यांच्या स्वरुपाचं चिंतनही आवश्यक आहे.

एकूण काय कोणतीही महान गोष्ट लहान लहान गोष्टीतून बनलेली असते; पण महान वस्तू काही लहान नसते. या सरत्या वर्षात आपण खोल विचार करून नव्या वर्षासाठी संकल्प करूया. चार गोष्टींविषयी संकल्प.. कण, क्षण, प्राण नि पैसा!

Web Title: Particles, moments, souls and money !, Resolutions for the New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.