ज्ञाता व ज्ञान हे ही जिथे नाहिसे होतात ती शांती सर्वश्रेष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 05:34 PM2019-10-12T17:34:58+5:302019-10-12T17:39:39+5:30
ज्या सुखासाठी आजचा माणूस रात्रंदिवस धडपडत आहे, ते सुख त्याला एवढी धडपड करून मिळते का. ..?
- हभप भरतबुवा रामदासी (बीड )
विकार विवशतेचे ग्रहण लागलेल्या वर्तमान काळात मानवी मनाची शांती हरवली आहे. त्यामुळे बहुतांशी लोकांच्या जीवनात सुख ,समाधान, आनंद दिसतच नाही. जीवनाची प्रतिष्ठाच ज्या आध्यात्मिक मूल्यांवर आधारित आहे, ती मूल्यें व त्या मूल्यांचे संस्कार जर मानवी जीवनावर बिंबवले गेले तर आत्मशांतीपासून विश्वशांतीपर्यंतचा टप्पा सहज गाठता येईल. ज्या सुखासाठी आजचा माणूस रात्रंदिवस धडपडत आहे, ते सुख त्याला एवढी धडपड करून मिळते का. ..? डनलॉपच्या गादीवर झोपल्यानंतर जर झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत असतील तर त्या झोपेला सुख समजावयाचे का. ? सुखाचा मार्ग सांगतांना तुकोबा म्हणाले;
शांती परते नाही सुख! येर अवघेचि दु:ख!!
म्हणवुनि शांती धरा! उतराल पैलतीरा!!
अध्यात्म शास्त्रात शांतीला विशेष महत्त्व आहे. आपण म्हणाल; शांती म्हणजे तरी काय. ? याचे उत्तर देतांना अध्यात्म शास्त्र सांगते की. ...जो मनुष्य निरिच्छ, विकार रहित जीवन जगतो, त्यालाच शांतीची प्राप्ती होते. विकार रहित व निरिच्छ जीवनाची जी अवस्था, त्यासच शांती असे म्हणतात. जो माणूस सर्व इच्छांचा त्याग करून काम, क्र ोधादिक षड्विकारांचा त्याग करून जीवन जगतो, तोच शांती सुखाचा अनुभव घेऊ शकतो. संतांनी विकारांवर विजय मिळविला होता. संत तुकाराम महाराज लिहितात;
काम क्रोध लोभ निमाले ठायिची !
अवघी आनंदाची पुष्टी झाली!!
संत एकनाथ महाराजांचे जीवन चरित्र बघा... नाथांची कीर्ती ऐकून एक ब्राह्मण पैठणमध्ये आला. त्याला त्याच्या मुलाच्या उपनयन संस्कारासाठी द्रव्याची गरज होती. कांही टवाळ खोर मंडळी गावातील चौकात बसली होती. त्या ब्राह्मणाने या टवाळखोर मंडळींना आपली कर्मकहाणी सांगितली व द्रव्याची भिक्षा मागितली. ते म्हणाले; आम्ही द्रव्य देतो, पण आमच्या गावात नाथ बाबा राहतात, त्यांना राग आणून दाखवायचा. ..? या विप्राला वाटले, हे काम तर अगदीच सोपे आहे. तो नाथांच्या वाड्यात आला व सोवळ्यात पुजा करीत असणाऱ्या नाथांच्या मांडीवर जाऊन बसला. त्याला वाटले, आता मी कपड्यासह, पायातल्या चपलासह नाथांना शिवल्यामुळे बाबांना नक्की राग येईल. पण, एकनाथ महाराज स्मितहास्य करीत म्हणाले, वा...वा. .! आपण मला भेटण्यासाठी इतके अधीर झाला की, कपडे व पायातल्या चपला काढण्यालाही आपल्याला वेळ मिळाला नाही. आपल्या रुपाने आज मला प्रत्यक्ष पांडुरंगाचेच दर्शन झाले. नाथांची ती अमृत वाणी ऐकून तो नाथांना शरण आला. केवढी ही शांती. ...! संतांचा हा आचार विचार किती उच्च दर्जाचा होता. शांती तत्वांचा विचार मांडताना माउली वर्णन करतात;
तरी गिळोनि ज्ञेयाते ! ज्ञाता ज्ञानही माघौते ! हारपे निरूते ! ते शांती पै गा!!
ज्ञेय स्वरूप परमात्मा, त्याच्याशी तदरूप होऊन, नंतर ज्ञाता व ज्ञान हे ही जिथे नाहिसे होतात ती शांती सर्व श्रेष्ठ होय. अशा शांतीशिवाय जीवाला खरे सुख मिळणार नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात;
शांती परते नाही सुख! येर अवघेचि दु:ख!!
(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.त्यांचा संपर्क क्रमांक मोबाईल नंबर 8329878467 )