मन:शांती- समजुन घ्या ना मला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 02:28 PM2018-11-24T14:28:16+5:302018-11-24T14:31:04+5:30

शरीराला वय असते, मनाला वय कुठे म्हणूनच काकांचे चिरतरूण मन पुन्हा एकदा आपल्याच वयाच्या महिलेशी विवाहबद्ध होऊ पाहात होते.

Peace of mind- understand me ...! | मन:शांती- समजुन घ्या ना मला...!

मन:शांती- समजुन घ्या ना मला...!

Next

- डॉ. दत्ता कोहिनकर-   
रामचंद्रकाका निवृत्त होऊन दोन वर्षे उलटली होती. सरकारी अधिकारी पदाची नोकरी म्हणून तीस हजार रुपये पेन्शन चालू होती. एकुलता एक मुलगा अभिजित अमेरिकेतील नामांकित कंपनीत अधिकारी म्हणून नोकरी करता-करता त्याच कंपनीतील अभियंता मुलीशी विवाहबद्ध होऊन तिथेच झाला होता. रामचंद्रकाका व त्यांची पत्नी मालती आपल्या अलिशान बंगल्यात मोठया खुशीत दिवस काढत होेते. एके दिवशी दुर्देवाने काळाने मालतीवर झडप घातली. हृदयविकाराने मालतीचा मृत्यू झाला. रामचंद्रकाका एकटे पडले. मुलाने अमेरिकेतील कंपनीबरोबर ५ वर्षांचा करार केला होता. त्यालाही भारतात परतणे अवघड झाले. सकाळी कामवाली शांताबाई येऊन साफसफाई व स्वयंपाक करून जायची. पण दिवसभर काय करायचे? ६ खोल्यांचा टुमदार बंगला काकांना खायला उठायचा. मालतीच्या आठवणीने काकांना व्याकुळता यायची. रात्री बंगल्यात एकटयाला भीती वाटायची. मनात बऱ्याचदा कामभावना जागृत व्हायच्या. भविष्याची चिंता मनाला अस्वस्थ करायची. मनोमन काका नैराश्याकडे जायचे. आपल्याला एकटे जगणे अशक्य आहे. कोणीतरी आपली काळजी घेणारी प्रेमळ  सहचारिणी असावी असे त्यांना मनोमन वाटू लागले. शरीराला वय असते, मनाला वय नसते. काकांचे चिरतरूण मन पुन्हा एकदा आपल्याच वयाच्या महिलेशी विवाहबद्ध होऊ पाहात होते. मुलाचे व त्यांचे संबंध मित्राप्रमाणे असल्याने त्यांनी मुलाला या गोष्टीबाबत फोनवर विचारणा केली असता, मुलाने त्यांना वय-खानदान-इज्जत-समाज यासारख्या अनेक गोष्टींना अनुसरून अपमानित केले. काकांच्या मनात स्वत:विषयी अपराधीपणाची भावना निर्माण झाली. आपले सर्वस्व असलेल्या एकुलत्या एका मुलाच्याही नजरेत आपण पडलो या भावनेने त्यांना नैराश्य आले. झोप उडाली. मानसिक दुर्बलता आली. आत्महत्येचे विचार मनात डोकावू लागले. त्यांना या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या फॅमिली डॉक्टरने दिलेल्या सल्ल्यानुसार ते ध्यान करण्यासाठी केंद्रावर आले होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना पूर्णत: बोलून मनाने हलके व मोकळे केले. त्यांच्या मुलाला फोनवरून त्यांना पितृॠण म्हणून मदत करण्यासाठी थोडं समाज-वय-प्रतिष्ठा या गोष्टी बाजूला ठेवून पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला. अभिजितने या विषयावर अमेरिकेत समुपदेशकाची मदत घेतली व समुपदेशनानंतर तो ६० वर्षांच्या आपल्या वडिलांच्या पुनर्विवाहाला तयार झाला. पेपरला दिलेल्या जाहिरातीवरून ५८ वर्षांच्या विधवा सुमती काकूंचे व रामचंद्रकाकांचे सूर जुळले. दोघांनीही एकमेकांना समजून घेत विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. अभिजित त्याची बायको अमेरिकेतून सुट्टी काढून पुण्यात आले. आम्ही तिघांनीही काका-काकूंना माझ्या कारमधून आळंदीला नेले व नोंदणी पद्धतीने त्यांचा पुनर्विवाह लावून दिला. आपल्या टुमदार बंगल्यात हे वृद्ध जोडपे आनंदाने जगत आहे. मित्रांनो, असे किती काका व काकू सामाजिक बंधनाच्या-नातलगांच्या- मुलाबाळांच्या भितीने एकटे जगायचे म्हणून जगत आहेत, नैराश्याकडे जात आहेत. आत्महत्या करत आहे. एकटेपणा त्यांना सतावतोय. म्हणून पुण्यात माधव दामले या इंजिनिअरने ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाची स्थापना करून २५ काका-काकूंना एकत्र आणून विवाहबद्ध केले आहे. वय झाले म्हणून कामजीवनाला पूर्णविराम द्या असे ज्येष्ठांना व एकाकी पडलेल्या काका-काकूंना म्हणणे व त्यांची वयानुसार चेष्टा-मस्करी-टिंगल करणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. यातून गैरप्रकार होण्याची दाट शक्यता असते. त्यापेक्षा ज्याला खरंच वाटेल त्याला पुनर्विवाहाला मान्यता देणे शहाणपणाचे वाटते. ज्येष्ठांच्या सुखसमाधानाऐवजी स्वत:च्या इगोला, समाजबंधनाला व घराण्याच्या प्रतिष्ठेला आपण जास्त महत्त्व देतो. ‘माझ्या म्हाताºया आई-वडिलांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे.’ असे सांगणाºया कर्तव्यदक्ष मुलांनी अन्न-वस्त्र-निवारा एवढीच आईवडिलांची गरज मर्यादित नसते हे समजून घेण्याची आज गरज आहे. फारच क्वचित काका-काकू आता हे सामाजिक बंधन तोडण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांची मुले त्यांना सहाय्य करत आहेत. शेवटी सरलेला अर्धा पेला भरणे हे पण आपल्याच हातात असते. प्रत्येक माणसाच्या मनात शेवटच्या श्वासापर्यंत प्रेमभावना असते. एका गीतकाराने म्हटले आहे ना, प्यार कभी मरता नही । मरते है इंसान ॥

(लेखक प्रसिद्ध व्याख्याते आहेत.)

 

Web Title: Peace of mind- understand me ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.