मन :शांती : तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:23 PM2019-03-25T13:23:07+5:302019-03-25T13:31:11+5:30
ज्याला आनंदाने जगायचे आहे त्याने पुर्वताप किंवा पश्चाताप न करता चुक झाली की, समोरच्या माणसाची माफी मागुन ती परत न करण्याचा दृढ संकल्प करावा.
-डॉ. दत्ता कोहिनकर-
निता अजितला घेऊन माझ्याकडे आली होती. अलिकडे अजित फारच उदास, बेचैन व निराश असतो असे तिने मला सांगितले. मी, निताला बाहेर बसायला सांगितले व अजितला बोलते केले. बोलता बोलता अजितच्या डोळयात अश्रू तरळले व म्हणाला सर २ महिन्यांपूर्वी आईची आणि माझी निताच्या वागण्यावरून निता घरी नसताना भांडणे झाली. भांडणामध्ये आई ने आम्हा दोघांवर केलेल्या आरोपांमुळे माझा राग भडकला व मी, रागाच्या भरात आईवर हात उगारला व धक्का बुक्की केली.आईसारखे जगात दुसरे दैवत नाही असे बऱ्याचदा वाचले होते त्यामुळे शांत झाल्यावर मला माझी चूक समजून आली व पश्चातापाने माझ्या मनाला घेरले. तेव्हा पासून मला रात्री झोप येत नाही व नैराश्य आलं आहे. ही गोष्ट मी कोणाला सांगू पण शकत नाही. अजित रडून शांत झाल्यानंतर मी त्याला म्हणालो, अजित कह्योध आवरता न आल्यामुळे तुझ्याकडून हे कृत्य घडलं आहे. मी देखील कह्योधाच्या भरात आईला अपशब्द वापरले होते. शांत झाल्यानंतर मात्र मी तिची पाय धरून माफी मागितली होती. ज्याला आनंदाने जगायचे आहे त्याने पुर्वताप किंवा पश्चाताप न करता चुक झाली की, समोरच्या माणसाची माफी मागुन ती परत न करण्याचा दृढ संकल्प करावा.
मनुष्य विकारांच्या अधीन झाला कि त्याच्याकडून चुका होऊ शकतात. सम्राट अशोकाने कलिंगाच्या युद्धात लाखो लोक मारली. या कृत्याचा त्याने पश्चाताप केला असता तर त्याला नैराश्याने घेरले असते व तेथेच अशोकाची कारकीर्द संपून पुढील इतिहास घडलाच नसता. सम्राट अशोकाने प्रज्ञापूर्वक विचार करून बुद्धांच्या मागार्ने जायचे ठरवले. चंड अशोक मनातील विचार बदलून धर्म अशोक झाला. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम हवाई दलात भरती होऊ शकले नाहीत, कारण निवड समितीने पहिल्या 8 विद्यार्थ्यांची निवड केली अब्दुल कलामांचा नंबर नववा होता. परंतु ते अपयश त्यांना भारत देशाचा राष्ट्रपती होण्यासाठी निती ने दिले होते.
चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन निवेदकाच्या परीक्षेत नापास झाले. जो आवाज त्यावेळी निवेदक बनण्याच्या लायकीचा मानला गेला नाही तोच आवाज चित्रपटसृष्टीत श्रेष्ठ ठरला. त्यामुळे अपयश आले तरी नकारात्मक विचार न करता, खचुन न जाता, सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांनी युक्त असे मन जीवनात दु:ख आणते. हाच विचार सकारात्मक केला असता दु:ख मुक्तीच्या रस्त्यावर आपली वाटचाल सुरू होते. गरम तव्यावर पाणी पडले तर चर-चर करून त्याची वाफ होते व हवेत उडून जाते. मात्र हिरव्या पाण्यावर पडलेले थेंब मोत्याचे रूप घेऊन डोलू लागतात. नकारात्मक विचारांनीयुक्त दु:खी मन हे गरम तव्यासारखे असते. तर सकारात्मक विचारयुक्त समाधानी मन कमळाच्या हिरव्या पाण्यासारखं असते. म्हणुन आपण आपल्या मनाला कसे घडवायचे हे आपल्या विचारांवर अवलंबुन असते.
नदीच्या किनाऱ्यावरील झाडावर एक माकड त्याच्या मैत्रिणीसह गप्पा मारत बसले होते. अचानक आकाशवाणी झाली ..जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल. आकाशवाणी संपताच माकडीण पाण्यात उडी मारते व राजकुमारी बनून बाहेर येते. माकड तिला म्हणतो वेडे आकाशवाणी खोटी ठरली असती तर, त्यावेळेस माकडीण म्हणते अरे जरी आकाशवाणी खोटी ठरली असती तरी मी पाण्यातून बाहेर येताना माकडीनच राहिले असते. पण मी त्वरित सकारात्मक विचार करून संधीचा लाभ घेतल्याने आता मी राजकुमारी झाली आहे, तू मात्र माकडच राहिलास. आपल्या मनातील आवाज ही एक आकाशवाणीचं असते. या आकाशवाणीला सकारात्मक विचारांची जोड देऊन आनंदाने जीवन जगा.. आपल्या जीवनाची उर्ध्वगती किंवा अधोगती ताकद ही आपल्या विचारांवरच अवलंबून असते. तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही व्हाल. म्हणुन नेहमी सकारात्मक विचार करा, सकारात्मक लोकांच्या संगतीत रहा, तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे बोधवचन आपल्या जीवनात खरोखर उतरवण्यासाठी सकारात्मक विचारांना सकारात्मक कृतींची जोड महत्वाची आहे.