उपनिषदातील शांतिमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 04:43 AM2019-01-23T04:43:11+5:302019-01-23T04:43:16+5:30
उपनिषद म्हणजे काय, तर उप+निष म्हणजे जवळ जाणे ..सत्याच्या जवळ जाणे, उपनिषद म्हणजे जवळ बसणे.
- शैलजा शेवडे
उपनिषद म्हणजे काय, तर उप+निष म्हणजे जवळ जाणे ..सत्याच्या जवळ जाणे, उपनिषद म्हणजे जवळ बसणे. अत्यंत भक्तिभावाने गुरूच्या जवळ बसून शिष्य जी परामार्थ विद्या संपादन करतो, त्या विद्येला ‘उपनिषद’ असे म्हणतात. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘शक्तीची उपासना हाच सांगावा मला उपनिषदांच्या पानोपानी दिसतो. आपण शक्तीची उपासना केला पाहिजे. उपनिषदे म्हणजे सामथ्यार्चा अक्षयकोषच आहेत. सर्व विश्व गदगदा हलवील, असे सामर्थ्य उपनिषदांमध्ये भरलेले आहे. सारे विश्व त्यांच्या संदेशाने चैतन्यमय होईल, सामर्थ्यमय होईल.’
इतरा नावाची तपस्विनी होती. तिचा पुत्र ऐतरेय. त्याने रचलेले उपनिषद ते ऐतरेय उपनिषद! हे उपनिषद ऋग्वेदावर आधारलेले आहे. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ. ऋषींनी जे पाहिले, अनुभवले, त्यावर त्यांनी विचार केला. त्याचा अनुभव घेऊन जीवनावर होणारा त्याचा परिणाम पाहिला. त्या वेळी त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले मंत्र... मंत्र लिहिले जात नाहीत, ते रचले जातात. ते रचणाऱ्या ऋषींना मंत्रद्रष्टेच म्हणतात.
उपनिषदात शांतिमंत्र असतात. शांतिमंत्र म्हणजे शांतीची इच्छा करणारे मंत्र असतात. शांतिमंत्राचा उद्देश हा पठण करणाºयाचे मन आणि तेथील वातावरण शांत करणे हा असतो. असे मानले जाते की, शांतिमंत्र सुरुवातीला म्हणल्यावर कार्यात बाधा येत नाही. हा मंत्र समाप्त करताना तीनदा ‘शांति शांति शांति’ असे म्हणतात.
१) आधिभौतिक २)आधिदैविक ३) आध्यात्मिक
वेगवेगळ्या उपनिषदात वेगवेगळे शांतिमंत्र आहेत. इथे आपण ऐतरेय उपनिषदातील शांतिमंत्र घेणार आहोत.
ऐतरेय उपनिषद शांतिमंत्र
ॐ वाङ् मे मनसि प्रतिष्ठिता। मनो मे वाचि प्रतिष्ठितम।
आविराविर्म एधि। वेदस्य म आणीस्थ:।
श्रुतं मे मा प्रहासी: अनेनाधीतेनाहोरात्रान्सन्दधामि ।
ऋतं वदिष्यामि। सत्यं वदिष्यामि। तन्मामवतु। तद्वक्तारमवतु। अवतु माम। अवतु वक्तारामवतु वक्तारम॥ ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥
याचा अर्थ मी काव्यातून मांडला आहे.
ॐ माझी वाणी मनामध्ये, राहो दृढ, नि सुस्थिर,
सत्य शिवाचे विचार, मनी येवो निरंतर
वाणीमध्ये येवो नित्य, प्रतिबिंब ते मनीचे,
राहो सुस्थिर, सुंदर, शब्द शब्द अंतरीचे.
देई दर्शन ईश्वरा, देई वेदांचे ते ज्ञान
अहोरात्र अध्ययन, त्याचे न हो विस्मरण,
ध्यास घेईन ज्ञानाचा, मनोवाचेने वेदांचा,
नित्य सत्य मी बोलेन, नित्य सत्य आचरेन
कर रक्षण स्वसंवेद्या, कर रक्षण तू माझे,
कर रक्षण वक्त्याचे, कर रक्षण श्रोत्याचे.
ॐ शान्ति: शांति: शांति:..
खरोखर अतिशय सुंदर विचार आहेत या शांतिमंत्रात...!
प्रज्ञान आत्म्याला समजावून घेऊन आपल्या प्रत्येक कृतीतून, चालण्या - बोलण्यातून वागण्यातून आम्ही जगू. ही आत्म्याची शक्ती , स्वरूप वाणीमध्ये सतत जागृत राहू दे. वेदांनी सांगितलेले उत्तम ज्ञान चराचराकडून ग्रहण करावे. त्याचा अनुभव घ्यावा. मी संकल्प नव्हे, प्रतिज्ञा करीन, ‘सत्य बोलेन, ऋत बोलेन. जे सत्य, पवित्र आणि सनातन असेल, जे कधीही बदलणार नाही, तेच मी माझ्या शब्दातून व्यक्त करीन.’