पेटवू मशाली, ‘कोण दिवस येईल कैसा। नाही देहाचा भरवसा।।’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 03:13 AM2020-04-13T03:13:23+5:302020-04-13T03:15:06+5:30
इंद्रजीत देशमुख कोरोना नावाच्या विषाणूच्या संक्रमणधास्तीने विस्कळित झालेलं समाजजीवन आणि विस्कळित होऊ पाहणारं मानवी मन. स्वत:च्या सामर्थ्याला अंतिम समजून ...
इंद्रजीत देशमुख
कोरोना नावाच्या विषाणूच्या संक्रमणधास्तीने विस्कळित झालेलं समाजजीवन आणि विस्कळित होऊ पाहणारं मानवी मन. स्वत:च्या सामर्थ्याला अंतिम समजून चालणाऱ्या गर्विष्ठ आणि अतिक्रमणशील प्रवृत्तीला आपल्या खºया अस्तित्वाची जाणीव करून देऊ पाहणारं हे वैश्विक संकट आणि त्या संकटात आपली होणारी तगमग. विविध माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या कानावर आल्या की, काळजात धस्स होऊन त्याचा ठोका चुकवू पाहणारं वातावरण. या सगळ्या भयप्रद आणि नकारात्मक वातावरणात आपण जगत आहोत.
‘कोण दिवस येईल कैसा।
नाही देहाचा भरवसा।।’
या न्यायाने आपला उद्याचा दिवस कसा आणि काय असेल, याचा कुणालाच आणि कसलाच भरवसा राहिलेला नाही. या सर्व अनिश्चिततेत जगत मिळालेल्या सर्व सूचनांचे पालन करून कितीतरी दिवस आपल्या घरट्यात राहून अंतर्मुख झाल्यावर आता आपल्याला कळतंय की, खरंच आपलं खूप काही करायचं राहून गेलंय. खºया अर्थाने जगायचंच राहून गेलंय. वास्तविक एका निश्चित यांत्रिक गतीने एका विशिष्ट चाकोरीतून पळणाºया जीवनात खºया अर्थाने जगणं समृद्ध करणाºया कितीतरी संधी आपण दुर्लक्षित केल्याचं आपल्याला जाणवत आहे. मनापासून प्रेम करणारी कितीतरी लोकं आपल्या भोवताली आहेत. आपण त्यांना कधी मनसोक्त वेळ दिला नाही. आपल्या आजूबाजूला कितीतरी संपन्न ठिकाणे आहेत की जिथं गेलं की जगण्याची नवी दिशा सापडते. आपण तिथं कधी शांतपणे गेलो नाही. आपण आपल्यावर प्रेम करणाºया घरच्या माणसांसोबत आपल्या गतिशील जीवनात कधीच मनसोक्त रमू शकलो नाही. हे चिंतन केलं की मनाला वेदना होते. म्हणूनच आता निश्चय करून घरीच राहून या संकटाला परतवून लावूया अन् जीवन समरसुन जगण्यासाठीची मशाल परत पेटवूया.