तीर्थक्षेत्र ज्ञानमय ऊर्जाक्षेत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 01:54 PM2019-11-25T13:54:54+5:302019-11-25T13:55:04+5:30

तीर्थ आणि क्षेत्र निर्माण करण्याचे सामर्थ्य फक्त देव आणि संत यांच्याच ठिकाणी आहे.

Pilgrimage Knowledge Energy Field | तीर्थक्षेत्र ज्ञानमय ऊर्जाक्षेत्र

तीर्थक्षेत्र ज्ञानमय ऊर्जाक्षेत्र

googlenewsNext

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

तीर्थ आणि क्षेत्र निर्माण करण्याचे सामर्थ्य फक्त देव आणि संत यांच्याच ठिकाणी आहे. तीर्थक्षेत्रात आपल्याला प्रेरणा मिळते. तीर्थक्षेत्र ही ज्ञानक्षेत्र आहेत. तीर्थाला गेल्याने प्रथमत: पर्यटन घडते. वातावरणात बदल होतो. वातावरणातील बदलामुळे मनाची स्पंदने बदलतात. मनाच्या आरोग्यामुळे स्वत:चे आरोग्य निरोगी बनते. मनाची स्पंदने सात्त्विक बनतात. तीर्थात लोक स्नान करतात. कारण तेथील ऊर्जात्मक स्पंदने मनावर आघात करतात. सकारात्मकता निर्माण होते. तीर्थावर गेल्यास तेथील घंटा-शंख इत्यादींचा जो ध्वनी निर्माण होतो, चैतन्य लहरी निर्माण होऊन त्याचा हवेवर परिणाम होऊन मनुष्याला आत्मविश्वासाने जगण्यास मदत करतो. भारतीय परंपरेत तीर्थक्षेत्राला विशेष महत्त्व आहे. तीर्थक्षेत्र म्हणजे मनाची बॅटरी चार्ज करण्याचे ठिकाण. तीर्थक्षेत्र ही मनुष्याला सद्गुणी बनवतात. सात्त्विक जगण्यासाठी ती प्रेरणादायक ठरतात. मनाची अवस्था सतत बदलत असते. मन चांगले नसेल तर तीर्थावर जाऊनही मनाची मलिनता जात नाही. फक्त निर्मल, स्वच्छ हवा आपल्या अंगावर आदळते. त्याचा परिणाम शरीरासह मनावर होतो. काही दिवस तीर्थावर राहिलो तरी मन बदलत नाही. त्यासाठी मनाची अवस्था फार महत्त्वाची आहे. मनाची चंचलता घालवण्यासाठी साधन म्हणून तीर्थक्षेत्राचा आधार घेता येतो. तीर्थक्षेत्र मनाची मलिनता दूर करतात; परंतु तेवढी दर्जेदार तीर्थक्षेत्र असावी लागतात. आजकाल लोक कोणत्याही स्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देतात. देवाचे अस्तित्व व संतांची तपश्चर्या असलेली ठिकाणे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जातात. तीर्थक्षेत्र कोणत्या स्थानाला म्हणावे, तेथील ऊर्जा किती आहे, तेथे गेल्यावर तुमच्या मनाचे भाव बदलतात का? मनाची स्थिती तेथे बदलल्यास समजावे - येथे सात्त्विक ऊर्जास्पंदने खूप आहेत. ती ऊर्जात्मक शक्ती मनावर प्रभाव टाकीत असते. दुराचारी माणसालाही त्याचा अनुभव येतो. अनुभवाने सांगतो, मनाची परिपक्वता, मनाची स्थिती, गती याचाही परिणाम तीर्थक्षेत्रावर होतो. तीर्थक्षेत्र ज्ञानमय ऊर्जाक्षेत्र आहेत. म्हणून ज्ञानदेव म्हणतात,
तीर्थयात्रा जाया चुकू नको।
ठेवा आपले देह हे सुद्धा क्षेत्र बनेल।।
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

Web Title: Pilgrimage Knowledge Energy Field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.