पितृलोक नेमका आहे तरी कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 01:13 PM2018-09-30T13:13:58+5:302018-09-30T13:24:14+5:30
पितृलोक, पितृस्वरूप व पितरांच्या तृप्तीचे मार्ग, याबद्दल प्राचीन ग्रंथांतून सविस्तर माहिती मिळते. ऋग्वेदादि प्राचीन ग्रंथांच्या वेळेपासून पितृविषयक काही निश्चित कल्पना होत्या, असे स्पष्टपणे दिसते.
पितृलोक, पितृस्वरूप व पितरांच्या तृप्तीचे मार्ग, याबद्दल प्राचीन ग्रंथांतून सविस्तर माहिती मिळते. ऋग्वेदादि प्राचीन ग्रंथांच्या
वेळेपासून पितृविषयक काही निश्चित कल्पना होत्या, असे स्पष्टपणे दिसते. वैदिक साहित्यात शतपथ ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण, छांदोग्य उपनिषद आदी ग्रंथांत तो लोक अनुभवून आल्यासारखी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्यावरून त्यांच्या निश्चित कल्पना कोणत्या होत्या, हे समजावून घेता येते.
पितृलोक म्हणजे अंतरिक्ष स्थान होय. स्वर्ग व पृथ्वी यांच्यातील अंतरिक्ष स्थानास पितृलोक म्हणतात. निरुक्तकार यास्कांनी दैवत कांडात पितृ ही देवता मानून त्यावर वरीलप्रमाणे विवेचन करून पितर हे अंतरिक्षातील देव आहेत, असे म्हटले आहे.
माध्यमिको यम इत्याहु:
तस्मात माध्यमिकान्पितृमन्यते
यावरून पितृलोक म्हणजे अंतरिक्ष, हे निश्चित होते. यम हा पितृलोकांचा अधिपती आहे, असे ऋग्वेदात म्हटले आहे व निरुक्तकारांनी त्याचा पुनरुच्चार केलेला आहे.
द्युस्थ, अंतरिक्षस्थ आणि पृथ्वीस्थ, असे देवतांचे तीन वर्ग निरुक्तकार पाडतात. परंतु उपनिषदादि ग्रंथांत ही कल्पना स्वीकारलेली दिसत नाही. स्वर्ग, मृत्यू, मोक्ष अशी त्यांची विचारसरणी आहे, हे ध्यानात घेतल्याने पुढील विचार पटण्यासारखे वाटतात.
पितरांचे प्रकार
पितरांचे तीन प्रकार आहेत. त्याबद्दल ऋग्वेदात खालील ऋचा आहे-
उदीरतामवरउत्परास उन्मध्यमा: पितर: सोम्यास:
असुं य ईयुरवृका ऋतज्ञा:, ते नोवन्तु पितरो हवेषु
याचा अर्थ असा - मुक्त कंठाने स्तवन करा. पितृगण सोमप्रिय आहेत. त्यापैकी काही खालच्या लोकांत, काही मध्यम लोकांत तर काही वरच्या लोकांत वास करीत असतात. ते सरल वृत्तीचे, धर्म जाणणारे व प्राणरूप आहेत. हविदान करणा-या आमचे ते रक्षण करोत.
या मंत्रावरून अवर, मध्यम व पर अशा तीनही ठिकाणी पितर असतात, हे स्पष्ट होते. छांदोग्य उपनिषदात यांनाच पृथ्वीलोक, सूर्यलोक व ब्रह्मलोक असे म्हटले असून, ते त्या लोकी कसे जातात व परत येतात, याचे विस्तारपूर्वक वर्णन केलेले आहे.
तेथे पृथ्वी व चंद्रलोक यांमध्ये पितृलोक असल्याचे वर्णन आढळते- मासेभ्य: पितृलोकं पितृलोकात आकाशम
आकाशात च चंद्रमसम
यावरून पितृलोकाची स्थानकल्पना निश्चित होऊ शकते. सूर्यलोक, चंद्र व पृथ्वी या तीनही स्थानी आपापल्या कर्माप्रमाणे जाणा-यांना सामान्यत: पितर असे ऋग्वेदात म्हटले आहे. या तिघांची गती कोणत्या कर्माने कोणत्या ठिकाणी होते, हे छांदोग्य उपनिषदातील उपरोक्त उद्धरणात वर्णिलेले आहे. जे लोक पृथ्वीवरच सारखे फिरत राहतात, त्यांना दीर्घकाल स्थिती कोठेच नसते. त्यांची कर्मेही हीन प्रतीची असतात. त्यामुळे पृथ्वीला पितृलोक म्हणणे यथार्थ होणार नाही. त्याच्या उलट ब्रह्मलोक किंवा सूर्यलोक ज्याला ऋग्वेदात पर असे म्हटले आहे तेथे गेलेले लोक पुनरावर्तित होत नसल्यामुळे त्याला पितृलोक हा शब्द लावणे योग्य होणार नाही. म्हणून मध्यम स्थानालाच
पितृलोक म्हणणे योग्य ठरते. स्वर्ग व पितृलोक यांमध्ये विशेष फरक नाही, हे यावरून दिसून येते. आपण नेहमी बोलताना पितृलोक, असा उल्लेख करतो. परंतु वरील विवेचनाद्वारे पितृलोक नेमका कोठे आहे, हे स्पष्ट होते.
-संकलन : सुमंत अयाचित