Pitru Paksha 2019 : पितरांना तृप्त करण्यासाठी भोजनात अवश्य करा 'हे' पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 09:20 AM2019-09-15T09:20:12+5:302019-09-15T09:21:25+5:30
Pitru Paksha 2019 : ब्राह्मणपूजन, ब्राह्मणभोजन आणि पिंडप्रदान ही श्राद्धाची मुख्य कृत्ये आहेत.
ब्राह्मणपूजन, ब्राह्मणभोजन आणि पिंडप्रदान ही श्राद्धाची मुख्य कृत्ये आहेत. त्यातही ब्राह्मणभोजन व कुटुंबीय, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी भोजन घेणे महत्त्वाचे समजले जाते. श्राद्ध-पक्ष यांचा स्वयंपाकही शास्त्राने सांगितल्यानुसार असावा. त्यात भात, खीर, अळु, भाज्या, चटण्या, कोशिंबीर, पोळी, वडे, लाडू, तूप, वरण, जवस, तीळ यांचा समावेश असतो. काही ठिकाणी दुधात तांदूळ घालून त्याची खीर करतात तर काही ठिकाणी गव्हाची खीर करतात.
श्राद्ध-पक्षाच्या दिवशी घरच्या देवाचे नैवेद्य, देवस्थानचे ब्राह्मण व पितृस्थानचे ब्राह्मण यांना जेवायला वाढताना कढी, लिंबू व मीठ वाढत नाहीत. त्यामागेही हेच कारण आहे. पितरांना भाजलेले, तळलेले पदार्थ आवडतात. परंतु त्यांना उकळलेले, आंबट व खारट पदार्थ आवडत नाहीत, असे आपल्याकडे समजतात. त्याचमुळे कढी, लिंबू व मीठ हे पदार्थ आधी वाढत नाहीत.
पितृपक्ष भाद्रपद वद्यातच का?... शास्त्र काय सांगतं जाणून घ्याhttps://t.co/0p4Adyl4PW#PitruPaksha
— Lokmat (@MiLOKMAT) September 14, 2019
ब्राह्मण जेवायला बसल्यावर वाढण्याची प्रथा आहे, असे वेदशास्त्र संपन्न रामकृष्ण बाणेगावकर यांनी सांगितले. ब्राह्मणांच्या भोजनाबरोबरच स्वयंपाकाच्या सुवासानेही पितृ तृप्त होतात. स्वयंपाकात वापरले जाणारे पदार्थ भाजताना, तळतानाचा सुवास त्यांना आवडतो. फळांमध्ये केळी, आंबा, बोर, फणस, डाळिंब, खजूर, द्राक्ष, दधिफल (कपित्थ), नारळ आदी पितरांना आवडतात. काकडी, दोडकी, पडवळ, खजूर, चिंच, आले, सूंठ, मुळा, लवंग, वेलदोडे, पत्री, हिंग, ऊस, साखर, गूळ, सैंधव आदी वापरावेत, असेही शास्त्रकारांचे मत आहे. याबरोबरच गाईचे दूध, दही, तूप तसेच म्हशीचे लोणी न काढलेले ताक, तूप वापरावे, असेही सांगितलेले आहे. याबरोबरच ज्या मृतात्म्यासाठी श्राद्ध करीत आहोत, त्याचा एखादा आवडीचा पदार्थ असेल तर तोही भोजनात द्यावा, असे सांगतात. याशिवाय विविध प्रदेशानुसारही स्वयंपाकाच्या पदार्थांमध्ये थोडीफार भिन्नता आढळून येते. असे असले तरी पितर सर्वांत जास्त तृप्त होतात ते खीर व मधामुळे. त्यामुळे श्राद्धामध्ये या दोन्हींचा समावेश असलाच पाहिजे, असे उल्लेख अनेक ठिकाणी आलेले आहेत. श्राद्धासाठी तयार केलेले अन्न हे मधयुक्त व मधुर असावे. अत्यंत रुचकर असा स्वयंपाक करावा व त्याने ब्राह्मण तृप्त व्हावेत. ब्राह्मण तृप्त झाल्यानंतर त्यांच्या अनुज्ञेने मग उर्वरित स्वयंपाकातून पिंड करावेत व पिंडपूजन झाल्यानंतर श्राद्धकर्त्याच्या कुलामध्ये उत्पन्न झालेल्यांनी, नातेवाईकांनी, आप्तेष्टांनी, मित्रांनी उर्वरित अन्न सेवन करावे, असा शास्त्राधार आहे.
संकलन - सुमंत अयाचित