Pitru Paksha 2019 : पितरांना भोजन कसे मिळते?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 08:54 AM2019-09-20T08:54:44+5:302019-09-20T09:00:16+5:30
श्राद्धाबाबत नेहमी एक प्रश्न विचारला जातो की पितरांना समर्पित केलेल्या वस्तू त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतात?
श्राद्धाबाबत नेहमी एक प्रश्न विचारला जातो की पितरांना समर्पित केलेल्या वस्तू त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतात? त्याबाबतही शास्त्रकारांनी सविस्तर विवेचन केलेले आहे. प्रत्येकाला कर्मांच्या भिन्नतेनुसार मरणानंतर वेगवेगळी गती प्राप्त होते. कोणी देवता, कोणी पितर, कोणी प्रेत, कोणी हत्ती, कोणी मुंगी, कोई वृक्ष तर कोणी तृण होतात, असे समजले जाते. याही ठिकाणी एक शंका उपस्थित केली जाते की छोट्या योनीत जन्मलेले पितर कसे तृप्त होतील? या शंकेचे सुंदर उत्तर आपल्याला स्कंद पुराणातील कथेमध्ये मिळते.
एकदा राजा करंधमने महायोगी महाकाल यांना विचारले की, मानव पितरांना उद्देशून जे तर्पण किंवा पिंडदान करतो त्यावेळी ते जल, पिंड तर येथेच राहतात. मग ते पितरांपर्यंत पोहोचतात, असे कसे म्हटले जाते? त्यावर भगवान महाकाल यांनी दिलेले उत्तर फार महत्त्वाचे आहे.
ते म्हणतात की, विश्व नियंत्याने अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे की, श्राद्धाची सामग्री पृथ्वीवरच राहिली तरी ती पितरांपर्यंत पोहोचते. पितर व देवता योनी अशी आहे की, ते दुरूनही बोललेल्या गोष्टी ऐकतात. दुरून केलेली पूजा ग्रहण करतात व त्यानेच ते प्रसन्न होतात. ते भूत, भविष्य व वर्तमान सर्व काही जाणतात व सर्व जागी पोहोचू शकतात.
५ तन्मात्रा, मन, बुद्धी, अहंकार व प्रकृती या ९ तत्त्वांनी त्यांचे शरीर बनलेले असते. त्यातील १०वे तत्त्व साक्षात भगवान पुरुषोत्तमाचे असते. त्यामुळे देवता व पितर गंध-रसतत्त्वाने तृप्त होतात. शब्द तत्त्वाने ते तृप्त राहतात व स्पर्श तत्त्वाला ग्रहण करतात. पवित्रतेने ते प्रसन्न होतात व वरही देतात. मानवाचा आहार जसे अन्न आहे, पशूंचा आहार जसा तृण आहे, त्याचप्रमाणे पितरांचा आहार अन्नाचे सारतत्त्व (गंध व रस) आहे. त्यामुळे ते अन्न व जलाचे सारतत्त्वच ग्रहण करतात. त्यातील भौतिक, स्थूल वस्तू येथे राहिल्या तरी त्या त्यांच्यापर्यंत अशा पद्धतीने पोहोचतात.
पितरांपर्यंत कोणत्या स्वरूपात पोहोचतो आहार?
नाम व गोत्र उच्चारून जे अन्न व जल पितरांना दिले जाते ते विश्वदेव व अग्निष्वात (दिव्य पितर) हव्य-कव्यला पितरांपर्यंत पोहोचवतात. पितर देव योनीला प्राप्त झाले असतील तर दिलेले अन्न त्यांना अमृत स्वरूपात मिळते. ते गंधर्व बनलेले असतील तर त्यांना अन्न भोगांच्या रूपात मिळते. ते पशू योनीत असतील तर ते त्यांना तृणाच्या रूपात मिळते. ते नाग योनीत असतील तर वायू रूपाने, यक्ष योनीत असतील तर पान रूपात, राक्षस योनीत आमिषाच्या रूपाने व मनुष्य झाले असतील तर भोगण्यायोग्य तृप्तीकारक पदार्थांच्या रूपात त्यांना प्राप्त होते.
ज्या प्रकारे बछडा गर्दीतून आपल्या आईला शोधून काढतो, त्या प्रमाणे नाव, गोत्र, हृदयातील भक्तीभाव व देश-काल आदींच्या सहाय्याने दिलेल्या पदार्थांना मंत्रांच्या साह्याने पितरांपर्यंत पोहोचवतो. मृतात्मा शेकडो योनी पार केलेला असला तरी तृप्ती त्याच्यापर्यंत पोहोचूनच जाते.
पितर प्रसन्न तर सर्व देवता प्रसन्न
श्राद्धाहून दुसरे कोणतेही मोठे कल्याणकारी कार्य नाही व वंशवृद्धीसाठी पितरांची आराधना हा एकमेव उपाय आहे. स्वत: यमराज म्हणतात की, श्राद्ध केल्याने पुढील ६ पवित्र लाभ होतात.
१) श्राद्धकर्माने मानवाचे आयुष्य वाढते.
२) पितृगण मानवाला पुत्र देऊन वंशविस्तार करतात.
३) कुटुंबाची धन-धान्याने समृद्धी करतात.
४) श्राद्धकर्म मानवाच्या शरीरात बल-पौरुषाची वृद्धी करतात व यश-पुष्टी
प्रदान करतात.
५) पितृगण आरोग्य, बल, श्रेय, धन-धान्य आदी सर्व सुख, स्वर्ग व मोक्ष प्रदान करतात.
६) श्रद्धापूर्वक श्राद्ध करणाऱ्या कुटुंबात कसलेही दु:ख राहत नाही.
- संकलन : सुमंत अयाचित