Pitru Paksha 2019 : पितृपक्षात काकस्पर्श, काकदृष्टीचे 'हे' आहे महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 09:28 AM2019-09-16T09:28:53+5:302019-09-16T09:31:17+5:30
Pitru Paksha 2019 : पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्न ग्रहण करतात व त्याने पितरांना तृप्ती मिळते.
हिंदू पुराणांमध्ये कावळ्याला देवपुत्र मानले गेले आहे. एका कथेनुसार, देवराज इंद्राचा पुत्र जयंत याने सर्वांत प्रथम कावळ्याचे रूप धारण केले व माता सीतेला जखमी केले होते. तेव्हा प्रभू श्रीरामांनी ब्रह्मास्त्र चालवून जयंतच्या डोळ्याला क्षतिग्रस्त केले होते. जयंताने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली. तेव्हा रामचंद्रांनी त्याला वरदान दिले की, तुला अर्पण केलेले भोजन पितरांना मिळेल. तेव्हापासून काकस्पर्श, काकदृष्टी यांना महत्त्व आले व आजही पितरांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला पिंड, अन्न दिले जाते.
या काळात पितर हे यमलोकाहून पृथ्वीवर येतात. त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी हा काळ उपयुक्त आहे, असे मानले जाते. गरुड पुराणामध्ये कावळ्याला यमराजाचा संदेशवाहक म्हटले आहे. पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्न ग्रहण करतात व त्याने पितरांना तृप्ती मिळते. भारतात तर कावळ्याचे अनन्य साधारण महत्त्व आहेच. त्याचबरोबर ग्रीक कथांमध्ये रेवन (एक प्रकारचा कावळा) हा शुभसूचक मानला गेला आहे. नॉर्स कथांमध्येही रेवन हगिन व मुनीन यांची गोष्ट आढळते. त्यांना ईश्वराच्या जवळचे मानले गेले आहे.
कावळ्याला पितृपक्षात एवढे महत्त्व देण्याची आणखीही बरीच कारणे आहेत. माणसांना फक्त उजेडात दिसते. मांजराला उजेडात तसेच अंधारातही दिसते. वटवाघूळ व घुबडाला फक्त अंधारातच दिसते. यावरून स्पष्ट होते की प्रत्येकाला वेगवेगळी दृष्टी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी कावळ्यास मिळाली आहे, हे महत्त्वपूर्ण आहे.
पितरांना तृप्त करण्यासाठी भोजनात अवश्य करा 'हे' पदार्थ https://t.co/JQutaUAgIp#PitruPaksha
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2019
मृतात्म्याची इच्छा पूर्ण करण्याचे समाधान मिळेपर्यंत तो कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाही. मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते, असे मानले जाते. पण प्रत्यक्षात जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास पिंडाला स्पर्श करण्यास मज्जाव करतो. जीवात्मा दिसण्याची कावळ्याला मिळालेली दृष्टीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज आपण एवढी वैज्ञानिक प्रगती केलेली असली आणि त्याच्या डोळ्याप्रमाणे लेन्स तयार केली असली तरी जीवात्मा पाहू शकलेलो नाहीत. कारण लेन्स तयार झालेली असली तरी तिच्यात ती कावळ्याची दृष्टी पाहण्यासाठी प्राण नाहीत.
पितृपक्ष भाद्रपद वद्यातच का?... शास्त्र काय सांगतं जाणून घ्याhttps://t.co/0p4Adyl4PW#PitruPaksha
— Lokmat (@MiLOKMAT) September 14, 2019
कावळा वैवस्वत कुळात जन्माला आलेला आहे व सध्या वैवस्वत मन्वंतर सुरू आहे. जोपर्यंत हे मन्वन्तर आहे तोपर्यंत कावळा यमराजाचा द्वारपाल आहे. म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल, असे श्रीरामानी कावळ्याला वरदान दिले आहे. यासाठी कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्न रूपाने पापाचे भक्षण करतो व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पितरांना त्रास होत नाही, असे आपल्याकडे मानले गेले आहे.
- संकलन : सुमंत अयाचित