पितृपंधरवड्यास आजपासून प्रारंभ, पूर्वजांविषयी कृतज्ञता आणि भावनिक महत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 01:48 AM2020-09-02T01:48:36+5:302020-09-02T06:39:22+5:30
पितृपक्ष म्हटला की, मनात एक अनामिक भीती निर्माण होते. शरीर आणि मनाला जडत्व येते. तसे पाहिले तर पूर्वजांच्या स्मरणाचा हा काळ आहे.
- प्रसाद धर्माधिकारी
नशिराबाद, ता. जळगाव - दिवंगत व्यक्ती व पूर्वजांविषयी स्मरण व त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा पितृपक्ष महालयारंभ २ सप्टेंबरपासून सुरु होत आह. हिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्ष पंधरवड्याला भावनिक महत्त्व आहे. सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षाची सांगता होत असते.
भाद्रपद महिन्यातील वद्यपक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. दिवंगत व्यक्ती वाडवडिलांच्या पूर्वजांच्या मृत्यू तिथीला या पंधरवड्यात त्या त्या तिथीला श्राद्ध तर्पण केले जाते. तर्पण केल्याने पितरांना सुख लाभते व ते संतुष्ट होतात अशी भावना आहे.
पितृपक्ष म्हटला की, मनात एक अनामिक भीती निर्माण होते. शरीर आणि मनाला जडत्व येते. तसे पाहिले तर पूर्वजांच्या स्मरणाचा हा काळ आहे. पुढच्या पिढीला संस्कारित करण्याचे कार्य पूर्वीच्या पिढीने केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचा कालखंड आहे. तेव्हा मनात भीती न बाळगता पूर्वजांचे स्मरण व्हायला हवे.बदलत्या काळाची ती मागणी आहे.
श्राद्धाचे प्रकार...
श्राद्ध क्रियेत तत श्राद्धम म्हणजेच श्रद्धेने केलेले कार्य यालाच श्राध्द असे म्हणतात. और्ध्वद्देहिक श्राद्ध, संवंत्सारीक, पार्वणी, तीर्थ, त्रिपिंडी, हिरण्यश्राद्ध, महालयश्राद्ध आदी श्राद्धांचे प्रकार आहेत.
तिथींना महत्व ...
पितृपक्षात तिथींना अनन्य महत्त्व आहे. शस्त्राने मृत झालेले, संन्यास घेऊन मृत झालेले, माहेरपणी मृत्यू झालेले सवाष्णी वगैरेंसाठी ठराविक तिथीला श्राद्ध केले जाते. त्यात सर्वपित्री अमावस्या साऱ्या पितरांसाठी आहे.
स्नेह वृद्धीसाठी यांचा वापर...
गोपीचंदन, काळीतीळ, जानवे, पुष्प, तुळशी पाने, दर्भ, पवित्री, फुलहार, भात, श्राद्ध कर्मात वापरत असतात. काळे तीळ स्नेहाचे तर जव हे समृद्धीचे प्रतीक आहे. पिंडदानासाठी भातात तुळशीपत्र, तूप, मध, जव, तीळ, गोपीचंदन यांचा वापर करतात.
वैश्वदेव...असा करतात...
श्राद्ध कार्यात वैश्वदेवाला अनन्य महत्त्व आहे. केळीच्या पानावर भाताच्या आहुती देऊन अग्निपूजन करीत त्यात आहुती दिली जाते. शास्त्रवचन असले तरी रूढीनुसार अनेकजण जेवणाचे पान अग्नीत टाकतात. त्यास ग्रामीण भागात आगारी टाकणे असेही संबोधले जाते.
काव घासला महत्व
पितृपक्षात कावळ्याला महत्व असते. कावळा पिंडाला स्पर्श करणे अत्यंत महत्त्वाचे असते. श्राद्ध कर्म झाल्यानंतर काव घास ठेवला जातो. पितर जेवायला नाही मिळाला तर ते जेवणाचे पान पूजन करून गाईला अर्पण केले जाते.
तिथीनुसार श्राद्ध असे...
श्राद्ध हे तिथीनुसारच करावे, असे शास्त्रवचन आहे. २ सप्टेंबर रोजी महालय श्राद्धारंभ असून प्रतिपदा श्राद्ध आहे. ३ रोजी द्वितिया श्राद्ध, ५ रोजी तृतीया श्राद्ध, ६ रोजी चतुर्थी श्राद्ध, ७ रोजी पंचमी श्राद्ध व भरणी श्राध्द, ८ रोजी षष्ठी श्राद्ध, ९ रोजी सप्तमी श्राद्ध, १० रोजी अष्टमी श्राद्ध, ११ रोजी अविधवा नवमी अर्थात नवमी श्राद्ध, १२ रोजी दशमी श्राद्ध, १३ रोजी एकादशी श्राद्ध, १४ रोजी द्वादशी श्राद्ध, संन्यासिना महालय, १५ रोजी त्रयोदशी श्राद्ध, १६ रोजी चतुर्दशी श्राद्ध व शस्त्रादिहत पितृश्राद्ध, १७ रोजी सर्वपित्री दर्श अमावस्या श्राद्ध आहे. पौर्णिमेचा महालय ७, १०, १२, १४, १७ सप्टेंबर यापैकी कोणत्याही दिवशी करता येईल. १७ आॅक्टोबर रोजी मातामह श्राद्ध आहे.तर्पण कार्यामध्ये वडील, आजोबा, पणजोबा, आई, आजी, पणजी, आईचे वडील, आजोबा ,पणजोबा, आईची आई, आजी, पणजी, काका, मामा, भाऊ, सासू-सासरे, पत्नी, मुलगा, मित्र, गुरु, शिष्य, आदी दिवंगतांना गोत्रासह नामोल्लेख करीत पाणी दिले जाते.