सुखदु:खे समे कृत्वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:54 AM2019-04-22T10:54:47+5:302019-04-22T10:54:52+5:30
मानवी जीवनात सुख आणि दु:ख सतत येतच असतात. अनुकूल विषय असला कि माणसाला सुख वाटत असते व प्रतिकूल विषय आला कि दु:ख वाटते
अहमदनगर : मानवी जीवनात सुख आणि दु:ख सतत येतच असतात. अनुकूल विषय असला कि माणसाला सुख वाटत असते व प्रतिकूल विषय आला कि दु:ख वाटते. वास्तविक पाहता सुख दु:ख हे बाह्य वस्तूवर अवलंबून नसते तर ते आपल्या अनुकूल प्रतिकूल भावनेवर अवलंबून असते . उदा. एखादा सर्प आपण बघितला तर आपल्याला त्याची भीती वाटते म्हणजेच प्रतिकूल भावना निर्माण होतात कारण तो सर्प आपल्याला अनुकूल नसतो म्हणून त्याची आपल्याला भीती वाटते परंतु एखाद्या गारुड्याला जर तो सर्प दिसला तर त्याला आनंद वाटतो कारण त्याला तो अनुकूल आहे म्हणजेच त्या सर्पावर तो पोट भरू शकतो म्हणून त्याला सुख उत्पन्न होईल .पत्नीला पाहून गृहस्थ मनुष्याला आनंद होतो त्याची वृत्ती सुखी होते. पण तीच स्त्री एखाद्या ब्रह्मचायार्ने जर बघितली तर त्याला घृणा उत्पन्न होते कारण त्याला ती स्त्री अनुकूल नाही किंबहुना त्याचें अध:पतन होऊ शकते याचाच अर्थ असा आहे कि सुख-समाधान हे बाह्य वस्तूवर अवलंबून नाही. सुख आणि दु:ख ह्या वृत्ती केवळ अंतरंग आहेत. एखाद्या श्रीमंत माणसाकडे मोठ मोठे महाल , बंगले असू शकतील आतमध्ये अति मौल्यवान वस्तू असू शकतील , खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या वस्तू असू शकतील , झोपण्याकारीता उंची पलंग,दिवाण, त्यावर भल्या जाड गाद्या असतील पण त्याला त्यावर झोप येईलच असे नाही .. कारण त्याला ते वैभव कसे टिकवावे याची चिंता झोपू देत नाही झोपेच्या गोळ्या खावूनही झोप येत नाही आणि एखादा गरीब मनुष्य जो रोज मजुरीवर आपले पोट भरतो तो मात्र झोपडीत राहतो आणि जमिनीवर साधे पोते टाकून झोपतो त्याला काही क्षणात झोप लागते कारण त्याला बाकीचे वैभव नसते , त्याला उपाधी नसते त्यामुळे त्याला साहजिकच चिंता नसते म्हणून त्याला झोपेसाठी काही कष्ट करावे लागत नाही याचाच अर्थ असा झाला कि ज्याला उपाधी नाही तो सुखी. उपाधी दोन प्रकारच्या असतात एक अंतर उपाधी आणि दुसरी बाह्य उपाधी, अंतर उपाधी म्हणजे अंतकरणातील विकार, अहंकार,भावना हे अंतर उपाधी आहेत . बाह्य उपाधी म्हणजेच प्रपंच व हे जगत , या जगातील वास्तूशी असलेले तादात्म्य हे माणसाला दु:खी करीत असते. जगातील प्रत्येक वस्तूला तीन प्रकारचा नाश असतो एक स्वभावत: नाश दोन आश्रय नाश तिसरा परत: नाश या तीन नाशाने कोणतीही वस्तू युक्त असते पण आपल्याला त्या नाशवान वाटत नाही व त्यामुळेच दु:ख होत असते. समजा जगतातील वास्तूशी जर आपले तादात्म्य नसेल तर दु:ख होत नसते.
सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पमवाप्स्यसि ॥ गीता. भगवत गीतेमधे अजुर्नाला जेव्हा मोह निर्माण झाला आणि त्याला काय करावे आणि काय करू नये हे सुचेना तेव्हा भगवंताने त्याला दुसर्या अध्यायामध्ये निक्षून सांगितले कि अनुकूल परिस्थिती आली तरी सुख मानू नको आणि प्रतिकूल परिस्थिती आली तरी दु:ख मानू नको असे समत्व जर तुला साधले तर पाप लागणार नाही व हेच खरे साधूचे लक्षण आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज हे सुरुवातीला श्रीमंत होते त्यांचा सावकारीचा व्यवसाय होता घरी उत्तम शेती होती, व्यापार होता सर्व काही अनुकूल होते पण दुदैर्वाने परिस्थिती पालटली आणि होत्याचे नव्हते झाले पण महाराज म्हणाले
बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥
अनुतापे तुझे राहिले चिंतन । जाला हा वमन संवसार ॥
बरे झाले देवा बाईल कर्कशा । बरी ही दुर्दशा जनामध्ये ॥
बरे झाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोरे गुरे ॥
बरे झाले नाही धरिली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥
बरे झाले तुझे केले देवाईल । लेकरे बाईल उपेक्षिली ॥
तुका म्हणे बरे व्रत एकादशी । केले उपवासी जागरण ॥
चित्ताचे समत्व झाले कि मग प्रतिकूल असले तरी त्याचा अनुकूल अर्थ करता येतो यालाच सकारात्मक विचार म्हणतात. असा महात्माच परिवर्तन घडवू शकतो.
सुफी संत राबियाचा जन्म हिजरी सन ९५ ते ९९च्या दरम्यान झाला होता. तिच्या प्रारंभीच्या आयुष्याविषयीची माहिती फरिद अल-दिन अत्तार या नंतरच्या सुफी संत व कवीकडून मिळते. राबियाचे कोणतेही लिखित साहित्य उपलब्ध नाही. तिच्या कुटुंबातील ती चौथी कन्या असल्याने "चौथी" या अथार्ने तिला राबिया हे नाव मिळाले होते. परिस्थिती गरिबीची होती पण ती डगमगली नाही वडील वारले सर्व विपरीत झाले लुटारूंनी तिला गुलाम म्हणून विकले, तिथे तिला सर्व कामे करावी लागत होते अशाही स्थितीत ती ईश्वराची आराधना सोडीत नव्हती एके रात्री मालकाने गुपचूप बघितले तर राबिया प्रार्थना करीत होती
ईश्वरा! नरकाच्या भयाने मी तुला पूजिले तर मला नरकात जाळ,
स्वर्गाच्या आशेने मी तुला पूजिले, तर मला स्वगार्तून काढून टाक,
पण तुज्याच खातर मी तुझी पूजा केली तर
तुझे शाश्वत लावण्य देण्यास कुरकूर करू नकोस.
तिची हि प्रार्थना ऐकून त्या मालकाच्या मनावर परिणाम झाला आणि त्याने तिची गुलामीतून मुक्ताता केली आणि तिचीच सेवा करू लागला . सर्वत्र ईश्वराची प्रतीती आली कि मग वेगळे काही राहत नाही, त्याला अनुकूल झ्रप्रतिकूल काहीही राहत नाही. सुख दु:खाच्या पलीकडे तो महत्मा जातो व असाच साधू-महात्मा जगात परिवर्तन घडवू शकतो.
भागावाताचार्य श्री अशोकानंद महाराज कडीर्ले,
गुरुकुल भागवताश्रम चिचोंडी(पाटील) ता. नगर ,मो. ९४२२२२०६०३