आनंद तरंग - भौतिक प्रकृतीपल्याड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 05:42 AM2019-11-06T05:42:23+5:302019-11-06T05:42:28+5:30
आनंद तरंग
सद्गुरू जग्गी वासुदेव
एक मनुष्य जर त्याच्या परम प्रकृतीच्या प्राप्तीसाठी इच्छुक नसेल, जर तो स्वत:ला एक स्वयं-सुखी मांसाचा गोळा बनविण्याच्या प्रयत्नात असेल, तर अशा प्रकारचे जगणे एक अगदी क्षुद्र पातळीचे जगणे आहे. आज जगात या प्रकारचं जगणं रूढ होत आहे. जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे. निसर्गापासून मनुष्य दूर जात आहे आणि कृत्रिम जगात, आभासी दुनियेत जगत आहे. अन्नापासून साऱ्याच बाबी बनावटी होत चालल्या आहेत. जगणंच भेसळयुक्त झालं आहे. आधुनिक काळात वावरणारा मनुष्य अशा कचकड्याच्या जीवनशैलीच्या मागे झटत आहे. उर फुटेपर्यंत धावत आहे. एखाद्या व्यक्तीत भीती, लालसा, राग, चिंता, न्यूनगंड, अहंकार असे अनेक दोष असू शकतात, पण जोपर्यंत तो भौतिक अस्तित्वाच्या वर उठण्यासाठी प्रयत्नशील आहे, तोवर त्याला वाव आहे. पण जर कोणी केवळ भौतिक प्रकृतीच्या समाधानाप्रती समर्पित असेल, तर त्याच्यासाठी कुठलाच मार्ग नाही. त्याचे परत मागे फिरण्याचे मार्ग संपलेले असतात. दोर नियतेने कापून टाकलेले असतात. जेव्हा एक मनुष्य असा विचार करतो, ‘मी म्हणजे सर्वस्व, मी जे काही आहे तेच सर्वकाही आहे.
मी जे काही जाणतो, ते परिपूर्ण आहे, माझं अस्तित्व म्हणजे सर्वस्व’ या प्रकारची मानवी अवस्था अगदी निकृष्ट आहे. ही भावनाच पूर्णपणे चुकीची आहे. त्यात अहंचा दर्प असतो. खोटा समज अधिकाधिक पोखरत जातो, हे त्याला कळतही नाही. जेव्हा त्याला हे कळायला सुरु वात होते की, आपल्याशिवाय या जगात विशाल असं काहीतरी प्राप्त करण्याजोगं आहे, हे आध्यात्मिक प्रक्रियेत पहिलं पाऊल आहे. जेव्हा मनुष्याला याची जाणीव होऊ लागते की, ‘मी जिथं आहे ते पुरेसं नाही, अस्तित्वात आणखी पुष्कळ काहीतरी आहे. फक्त माझं अस्तित्व म्हणजे सर्वस्व नव्हे,’ याची जाणीव होते, तेव्हा त्याची आध्यात्मिक प्रक्रिया आधीच सुरू झालेली असेल. हा उन्नत्तीचा मार्गच त्याला मोठ्या उंचीवर घेऊन जातो.