आनंद तरंग- जाणतेया विखो सुखाते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 03:33 AM2020-01-17T03:33:27+5:302020-01-17T03:33:41+5:30
जगातल्या साऱ्या खुर्च्या सुखाच्या असल्या तरी खुर्चीतलं सुख संपण्याचंंं भय असतंच. त्या निर्भय नसतात. दु:खाचा अंश नसलेल्या सुखाला आनंद म्हणतात.
बा.भो. शास्त्री
स्वर्ग व नरक हे दोन शब्द सर्वांनाच ठाऊक आहेत. स्वर्गाची प्रीती तर नरकाची भीती वाटते. स्वर्ग हा शब्द सुख, तथा फळा वाचक आहे. तर नरक हा दु:ख व क्लेश वाचक आहे. एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. कमीत कमी दु:ख म्हणजे सुख आणि कमीत कमी सुख म्हणजे दु:ख असं सुखदु:खाचं स्वरूप आहे. गीतेने संसाराला ‘दु:खालय’, बुद्धाने ‘सब्बंंदु:ख’ म्हटलं आहे. सुख सर्वांनाच हवं असतंं. दु:ख कुणालाच नको असतं. पण हवं ते मिळत नाही. नको ते टळत नाही. कोण देतं ते? कुणी नाही. आपणच निर्माण करीत असतो. सत्कर्माने स्वर्गसुख, तर दुष्कर्माने नरकाची प्राप्ती होते, हे शास्त्र सांंगतंंं. स्वत:च्याच कर्माचंं बरंं-वाईटाचंं फळ स्वत:लाच भोगावं लागतं. ‘आम्ही सुखी आहोत’ असं म्हणणारे लोक खरंच सुखी असतात का? याचं उत्तर सर्वच साक्षात्कारी संंत व श्रीचक्रधरस्वामी नकारार्थी देतात. मग आपण सुख अनुभवतो ते काय आहे? ते दुधातल्या पाण्याला दूध समजतो, तसंं आपण दु:खालाच सुख समजतो. समजा सुख हे दु:खमिश्रित असतंं. सुखात धास्ती तर आनंदात मस्ती असते. जगातल्या साऱ्या खुर्च्या सुखाच्या असल्या तरी खुर्चीतलं सुख संपण्याचंंं भय असतंच. त्या निर्भय नसतात. दु:खाचा अंश नसलेल्या सुखाला आनंद म्हणतात. जगात आज तर शुद्ध काहीच भेटत नाही. कुठलाच खाद्यपदार्थ, पेण, पाणी, हवा, विचार, आचार, मित्र, सोयरे, केळंं, आंंंबा, किंबहुना विषातही भेसळ असते. म्हणून आमच्या सुखालाही वेदना असतात. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
‘‘जिये लोकिचा चंंद्रु क्षयरोगी
जिथंं उदयो होय अस्तालागी
दु:ख लेवून सुखाचा अंंगी, सळित जगाते’’
चांंगल्या कपड्यांमुळे माणूस सुखी आहे असं वाटतंं, असंच दु:खाने सुखाचा अंगरखा घातला की दु:खही मोहक वाटतं, पण सर्व जगाला छळत आहे.