आनंद तरंग - होकाराचे बीज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 03:54 AM2019-12-27T03:54:48+5:302019-12-27T03:54:52+5:30
सुप्तशक्तीची ताकद ठिणगीतून लागलेल्या आगीसारखी असते.
विजयराज बोधनकर
सुप्तशक्तीची ताकद ठिणगीतून लागलेल्या आगीसारखी असते. फक्त ती ‘हो’ म्हणण्याची सुप्त अग्नी आहे की ‘नाही’ म्हणण्याचा सुप्त अंधार आहे यावर ते अवलंबून आहे. नकाराचा अंधार सर्व आयुष्य भस्मसात करून टाकते तर होकाराचा यज्ञ दिव्य दृष्टी प्रदान करून जाते. सकारात्मक विचार करण्याची एक कला आहे. ही कला एक अंगभूत कला असते. जी अभ्यास करून शिकविली जात नाही, प्रत्येक माणसाची विचारतरंगशक्ती भिन्न असू शकते. म्हणून तर प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. मग विचार करणे म्हणजे काय हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी नेमके एक उदाहरण म्हणून घेतले तर जसे, दहावीनंतर विद्यार्थी अवस्थेत आपण काय शिकले पाहिजे याचा विचार स्वत:च करणे योग्य मार्ग दाखवू शकते. याउलट ज्याला त्याला विचारून मग अभ्यासाची दिशा ठरविणे घातक ठरू शकते. म्हणजेच स्वत:ला विचारक्षमता वाढविण्याची इच्छाच नाही ही नकाराची भावना माणसाचे आयुष्य डळमळीत बनवू शकते.
ज्या व्यक्तीजवळ विचार ऊर्जाच नाही अशा व्यक्तीला करिअरसाठी कुणीही मदत करू शकत नाही. कारण आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा, स्वत:ची विचारक्षमता नसलेल्या व्यक्तीच्या वाटा सतत चुकत जाऊन शेवटी पदरी दु:ख पडत राहते. म्हणून सतत विविध स्तरांवरचे वाचन करणे गरजेचे असते. मग पुस्तके किवा अनेक घडलेल्या घटना जरी डोळसपणे वाचल्या तरी विचारक्षमता ही उत्तर प्रक्रियेला हातभार लावत असते. जो युवक सतत उत्तम काही ना काही वाचत असतो, निरीक्षण करीत असतो, त्याच्या विचारांचा पिंड तयार होत जातो. या वाचनक्षमतेतून विचार सामर्थ्य वाढत जात राहते. ज्यांनी ज्यांनी आयुष्यात सकारात्मक मुसंडी मारली त्यामागे केवळ अनुभवाची विचारऊर्जाच असते. ही विचारऊर्जा एखाद्या उंच उडणाऱ्या पक्ष्यासारखी असते जी गगनाला गवसणी घालू शकते.