आनंद तरंग - कृत्रिम आणि उथळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:56 PM2020-04-16T22:56:25+5:302020-04-16T22:57:02+5:30

जग हे एक अस्वस्थ, चंचल वाऱ्यासारखं असतं, आता प्रश्न हा निर्माण होतो की, याला म्हणायचं तरी काय? त्यासाठी एक अभंग आहे

Pleasure waves - artificial and shallow | आनंद तरंग - कृत्रिम आणि उथळ

आनंद तरंग - कृत्रिम आणि उथळ

Next

विजयराज बोधनकर

एखादा सुशिक्षित तरुण पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊन टिळा, माळा घालून अभंगवाणी म्हणायला लागला, तर हे अज्ञानी जग लगेच त्याला म्हणेल, अजूनही अंधश्रद्धेच्या जगातच वावरतोय वाटतं! त्यानेच टाय, कोट घालून एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमधून मिटिंगचे फोटो फेसबुकवर टाकले, तर जग लगेच म्हणेल, व्वा प्रगती केली पोराने. तोच तरुण एखाद्या मोठ्या टॉवरमधल्या फ्लॅटमध्ये राहायला गेला तर जग म्हणेल, एकदम टॉवरमध्ये? काही तरी काळंबेरं दिसतंय! आला कुठून इतका पैसा? कुणी सुशिक्षित रिक्षातून फिरताना दिसला तर जग नक्की कपाळावर आठ्या घालून म्हणेल, जमली नाही वाटतं अजून करिअरची गणितं? अजूनही रिक्षानेच फिरतोय? कुणी युरोप, अमेरिकेवरून स्वत:चे फेसबुकवर फोटो आपलोड केले, तर मग त्याची आरती ओवाळून जग नक्की म्हणेल की, फारच मोठी भरारी घेतली बरं का?

जग हे एक अस्वस्थ, चंचल वाऱ्यासारखं असतं, आता प्रश्न हा निर्माण होतो की, याला म्हणायचं तरी काय? त्यासाठी एक अभंग आहे आणि तो म्हणजे, ‘का रे भुललाशी वरलीया रंगा?’ हे बेभरवशाचं जग वरच्या दिसणाºया आवरणावर भाळत राहतं, पण ते माणसाच्या अंतरंगी कुठला, किती ज्ञानी, सुसंस्कृत आहे याचा अभ्यास न करता वरवर दिसणाºया मृगजळाकडे बघून बोलत सुटतं. अशा उथळ बोलण्यावर, प्रशंसेवर, चेष्टा करण्यावर जो विचार करीत बसतो तो मानसिकदृष्ट्या खचतच जातो. असे समजावे हे बहुरूपी जग अजून त्याला उमजलेच नाही. इथे महत्त्वाचे हे आहे की, चंचल जगाचा विचार करून जगण्यापेक्षा बुद्धिमतेचा, आनंदाचा विचार करून आयुष्याचा प्रवास करणारा उज्ज्वल आयुष्य जगू शकतो, भ्रम निर्माण करणाºयाकडे, दु:खाकडे, सुखाकडे जो पाठ फिरवेल, त्याकडे सदैव आनंदाच्या उत्तरांचीच गंगाजळी असेल. या कृत्रिम जगापासून आणि उथळ समाजापासून जो मुक्त राहील, तोच अध्यात्माचा, आनंदाचा, यशाचा वारकरी होत जाईल.
 

Web Title: Pleasure waves - artificial and shallow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.