मन ठरवते माणसाची विचारशैली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 11:53 AM2018-11-26T11:53:56+5:302018-11-26T11:54:10+5:30
माणसाच्या मनात सतत विचारांचा गुंता सुरू असतो. शरीर व मन यांचा समतोल राखता आला पाहिजे. कारण मन चंचल, चपळ आहे. मनाला सतत सजग ठेवले पाहिजे. ‘मन’ प्रसन्न असले की अंत:करणातील भावही प्रसन्न असतात.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
माणसाच्या मनात सतत विचारांचा गुंता सुरू असतो. शरीर व मन यांचा समतोल राखता आला पाहिजे. कारण मन चंचल, चपळ आहे. मनाला सतत सजग ठेवले पाहिजे. ‘मन’ प्रसन्न असले की अंत:करणातील भावही प्रसन्न असतात. कारण मनाचे भाव आपल्या शरीरातील हालचालीवरून ओळखता येतात. अंत:करणातील चाललेली मनाची स्थिती-गती-लय ही स्वभावातून प्रकट होते. मनापासून हसणे व वरवर हसणे यातून त्याचे प्रात्यक्षिकीकरण आढळते. माणसाचे मनच आपली चांगली किंवा वाईट विचारशैली ठरवत असते. आपले मन कधीही दृढ असावे. त्यासाठी रोज सकाळी सूर्यस्नान केले पाहिजे. मनाला चेतना व स्फूर्ती देणारे सकाळीचे कोवळे ऊन मनाला प्रसन्न ठेवते. त्यालाच मनाची स्थिती कायम स्थिर ठेवता येते. थोडक्यात मनावर ताबा मिळवता येतो. मन सात्त्विक बनते. सात्त्विक मन भक्तिमार्गाचा अवलंब करते. मनातील वाकडेपणा दूर करण्यासाठी सात्त्विक मनाची गरज आहे.
सात्त्विक मन विचारांना शुद्ध करते. जीवन समृद्ध बनवून त्यातील वाईट विचारांना नष्ट करते. कारण आपल्या मनात जशी भावना असते तसेच त्याचे कर्म घडते. जसे कर्म घडते तसेच त्याला फळ मिळते. ज्याचे मन शुद्ध त्याची वाणी शुद्ध, विचार पवित्र असतात. म्हणून प्रत्येकाने दैनंदिन जीवन जगताना आपल्या नेहमीच्या व्यापातून एक-दोन तास तरी संतचरित्र वाचावेत. त्यामुळे ‘मन’ प्रफुल्लित होईल. प्रफुल्लित झालेले मन उत्तम कार्य करण्यास प्रेरणा देते. त्या मनाला बळही मिळते. कर्तव्यनिष्ठा व परोपकार वृत्तीवाढीस लागते. ज्ञानयोग-कर्मयोग व भक्तियोग यांचा सुंदर समन्वय त्या मनाला घडतो. त्यातून मनचिंतन केल्याने जीवन प्रकाशमान होते. मन आनंदी होते. आनंदी मन मानसिक शांती देते. समाधानी राहाते. समाधानी जीवन जगणे हीच खरी भक्ती किंवा उपासना ठरू शकते; पण त्यासाठी शुद्ध व सात्त्विक मनाची गरज असते.
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)