तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार तर शुद्ध बुद्धीला परमार्थ कळतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 06:54 PM2019-07-22T18:54:07+5:302019-07-22T18:56:53+5:30

तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार कळतो, स्वार्थ कळतो पण परमार्थ कळेलच, असे नाही.

Practical wisdom can be understood as a way of thinking and pure intellect is considered to be divine | तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार तर शुद्ध बुद्धीला परमार्थ कळतो

तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार तर शुद्ध बुद्धीला परमार्थ कळतो

googlenewsNext

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

परमेश्वर हा महान कलाकार आहे. मानवी देह हीच त्याची सर्वांत मोठी कलाकृती आहे. या देहाचा अंतर्मुख होऊन विचार केला तर मन अगदी थक्क होऊन जाते. या जगात अनेक माणसं जन्माला येतात आणि मरतात. प्रत्येकाचे चेहरे वेगळे, रंग वेगळे, हुबेहुब एकासारखा दुसरा असे किती लोक सापडतील..? निराकार भगवंताने एवढे आकार कसे निर्माण केले असतील..? मनुष्यदेह तरी ईश्वराने का निर्माण केला..? राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी म्हणतात -
पशू देही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती
या लागी नरदेह हीच प्राप्ती, भगवंताची करावी

वास्तवात मानवदेह मिळणंच दुर्लभ आहे. पाप पुण्याचे पारडे समसमान झाले तरच हा देह मिळतो. आम्हाला मिळाला पण कळाला नाही. समर्थ रामदास म्हणतात-
सांगा नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले
ते मूर्ख कैसे भ्रमले मायाजाळी

परमार्थ तर फक्त शुद्ध बुद्धीलाच कळतो. आजच्या प्रगतीच्या अश्वारोहणात माणूस खूप बुद्धीमान झाला. आपल्या बुद्धीच्या जोरावर तो सूर्यचंद्रावर पोहचला पण ही शुद्ध बुद्धी नाही. फार तर याला तीक्ष्ण बुद्धी म्हणता येईल. कारण शुद्ध बुद्धीलाच परमार्थ कळतो. तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार कळतो, स्वार्थ कळतो पण परमार्थ कळेलच, असे नाही. जर शुद्ध बुद्धी नसेल तर जीव मायाजाळी गुरफटतो. माया ही जीवाला भगवंतापासून विन्मुख करते, उद्विग्न करते. माया ही छायेसारखी आहे. छायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. सूर्याच्या विरूद्ध दिशेला तोंड करून चाललो तर छायेचा अनुभव येतो. छायेच्या अनुभूतीचे कारण जशी सूर्याची विन्मुखता तसेच मायेच्या अनुभूतीचे कारण भगवंताची विन्मुखता. माया निर्मूलनाचा उपाय म्हणजे फक्त भगवत्सन्मुखता आहे. अशी सन्मुखता प्राप्त करणे म्हणजेच शुद्ध बुद्धी होय व त्यासाठी तर हा मनुष्य देह आहे..! समर्थ रामदास स्वामी म्हणतात-
या नरदेहाचेनि आधारे, नाना साधनाचेनि द्वारे
मुख्य सारासार विचारे बहुत सुटले

अग्नी हा अन्नही शिजवतो व घरही जाळतो. आपण त्याचा उपयोग घर जाळण्यासाठी करायचा का अन्न शिजवण्यासाठी करायचा.? हे विवेकबुद्धीने ठरवावे..! आणि हे कळणे म्हणजेच शुद्ध बुद्धी होय.

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांच्या संपर्क क्रमांक 9421344960 )

Web Title: Practical wisdom can be understood as a way of thinking and pure intellect is considered to be divine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.