अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:54 AM2018-01-11T02:54:00+5:302018-01-11T02:55:36+5:30
माणसाच्या जीवनात ‘अभ्यास’ हा शब्द वेगवेगळ्या अंगाने जोडला गेला आहे. मुलाला शाळेत घातल्यापासून त्याचं आणि अभ्यासाचं नातं जडलं जातं. ‘तुला आता अभ्यास करायचाय, परीक्षा जवळ आलीय, काय करावं मुलगा सारं काही करतो पण अभ्यास मात्र करत नाही.
- डॉ. रामचंद्र देखणे
माणसाच्या जीवनात ‘अभ्यास’ हा शब्द वेगवेगळ्या अंगाने जोडला गेला आहे. मुलाला शाळेत घातल्यापासून त्याचं आणि अभ्यासाचं नातं जडलं जातं. ‘तुला आता अभ्यास करायचाय, परीक्षा जवळ आलीय, काय करावं मुलगा सारं काही करतो पण अभ्यास मात्र करत नाही. अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. ‘अभ्यास कर, मोठा हो’ ही अशी वाक्ये वारंवार पालकांकडून ऐकायला मिळतात. अगदी बालवयातील शालेय जीवनापासून ‘अभ्यास’ हा आपला पाठीराखा ठरतो आणि पुढे अभ्यासाने मोठा होऊन ‘मोठे अभ्यासक’ अशी बिरुदावली मिरवितानाही तोच अभ्यास आपल्या पाठीशी असतो. अभ्यास म्हणजे नेमके काय? संत तुकोबारायांनी नेमक्या शब्दात सांगितले आहे.
असाध्य ते साध्य, करिता सायास।
कारण अभ्यास। तुका म्हणे।
आपले ‘साध्य’ सिद्ध करण्यासाठी घेतलेले परिश्रम म्हणजे अभ्यास होय. तत्त्ववेत्त्यांनी ‘पुन: पुन: संशीलनम्’ म्हणजे ध्येयवस्तूच्या ठिकाणी मनाच्या स्थिरीकरणासाठी केलेला प्रयत्न म्हणजे अभ्यास होय, असे म्हटले आहे. तर ‘संस्कारबाहुत्यम म्हणजे विद्येचे, ज्ञानाचे सततचे संस्कार दृढ करणे म्हणजे अभ्यास होय. आरुणीने श्वेतकेतुला ‘तत्त्वमसि’ हे वाक्य नऊवेळा सांगितल्यावर त्याला ते पटले आणि त्या महावाक्याचे संस्कार दृढ झाले. मीमांसदर्शनात अभ्यासाला ‘प्रमाण’ म्हणून संबोधले आहे. दृश्य जगातील कोणतीही गोष्ट विज्ञानाच्या, पदार्थज्ञानाच्या किंवा प्रपंचज्ञानाच्या अंगाने प्राप्त होते. त्यासाठी अभ्यास लागतोच. पण ब्रह्मविद्येच्या आणि अध्यात्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्ञानदेव आत्मविश्वासाने सांगतात,
‘‘म्हणौनि अभ्यासासी काही।
सर्वथा दुष्कर नाही।
या लागी माझ्या ठायी।
अभ्यासे मिळ।’’
अभ्यासाला दुष्कर काही नाही. परमात्मासुद्धा अभ्यासात उभा आहे. या अभ्यासाचे ‘भवप्रत्यय अभ्यास’ आणि ‘उपायप्रत्यय अभ्यास’ असे दोन प्रकार सांगितले जातात. जन्म घेऊन स्वाभाविकपणे मिळणारा जाणतेपणाचा अनुभव हा भवप्रत्यय अभ्यास होय तर मानवी जीवनातील विविध ज्ञानसाधनांच्या योगे घ्यावयाचा अनुभव हा ‘उपायप्रत्यय अभ्यास’ होय. माणसाने विविध ज्ञानसाधनांनी अनुभव घ्यावा, त्याने समृद्ध व्हावे आणि शेवटपर्यंत अखंड ज्ञानसाधक राहावे हेच अभ्यासाचे खरे प्रयोजन होय.